"जागते राहा" अशी आरोळी ठोकली जायची आमच्या लहानपणी आणि त्या सोबत शिट्टी पण वाजवली जायची. अर्थात ती शिट्टी नसायची पण शिट्टीचे धावते संगीत कारण गुरखे सायकल वर जेव्हा आमच्या सुरक्षिततेसाठी गस्त घालायचे तेव्हा शिट्टी आणि सायकल दोन्ही वेगात असायची. त्यामुळे म्हटलं असं. जे गुराखी पायी फिरायचे रात्रभर अक्षरशः तेव्हा ते काठी आपटायचे सातत्याने. अलार्म हा शब्द इटली ह्या देशातल्या सैनिकांनी सशस्त्र तय्यार राहावे ह्या साठी वापरला गेला होता. सर्व सामान्य जनतेला सांभाळण्याची, देशाचे संरक्षण करण्याची त्यांची जबाबदारी होती म्हणून जसे कि माझ्या लहानपणी हे आदरणीय गुराखी. सोप्पं नाहीच ते, आपल्या घरच्यांना सोडून, दूर राहून रात्रपाळी करणे.
अलार्म किंवा गजर हा शब्द वापरात आला तेव्हा फक्त घडाळ्यावर तो लावला जायचा आणि वाजायचा. सकाळी लवकर किंवा वेळेवर उठवण्याचे कार्य ह्या गजराने अथक कित्येक शतक केले आहे. आधी म्हणे खास वेळी म्हणजे सूर्य उदय झाला कि सर्वात पहिल्यांदा कोंबड्याला समजायचे आणि तो आरवायचा. त्याचे ते नीरव शांततेतले आरवणे ऐकले कि उठायचे सगळे तेव्हा. मंदिरात भूपाळी किंवा काकडआरती होत असे ती पण कानावर पडून उठणे व्हायचे. घरी जात्यावर दळण दळतेवेळी ज्या ओव्या गायल्या जायच्या त्यांनी पण गजराचे काम केले नकळत. अर्थात हे सगळं कदाचित घड्याळ नव्हतं तेव्हा होत असेल किंवा घड्याळ उठवेल ह्या वर जोवर सगळे अवलंबुन नव्हते तेव्हा.
सूत तय्यार करून, धागे विणून कपडे तय्यार करण्याच्या मिल होत्या तेव्हा माझ्या लहानपणी. ह्या शिवाय अनेक सरकारी कचेरीत किंवा बाकी ठिकाणी भोंगे लावलेले असायचे आणि ते ठराविक वेळेला वाजायचे. ते पण एका अर्थाने गजराचे काम करत होते.
अजूनही शारीरिक घड्याळाचे ऐकून बरेच जणं आपोआप जागे होतात आणि दिवसाची मस्त सुरवात करतात. बाकी मोबाईल नामक वस्तू वापरतात, म्हणजे मोबाईल मधे पण घड्याळ आहे, त्यावर फक्त अलार्म वाजवला जात नाही तर तो पाच मिनिटांकरता तात्पुरता बंद करण्याची आणि पुन्हा ऐकण्याची सुविधा पण आहे. आणि ते खूप जणं वापरतात सर्रास.
माझ्या शाळेच्या दिवसात आमच्या घरी एक पिटुकला पोपट होता, पोपटाचे पिल्लू होते. त्याची नजर आणि बुद्धी इतकी तीक्ष्ण, धारदार, भन्नाट, आणि तल्लख होती म्हणून सांगते. माझी आई माझा डब्बा करत करत, बाकी सकाळची कामे आटपत मला उठण्यासाठी आवाज देत असे. हे त्या पिल्लूने काही वेळा ऐकले आणि मग माझ्या आईला सुट्टी दिली. बास, तो इतक्या मोठ्याने अगदी आई जशी हाक मारायची तशीच हाक मारून मला उठवत असे. जो वर मी उठत नाही तो वर सातत्याने, विविध प्रकारे, आवाजाची चढ उतार करत पठ्या मला हाका मारत असे. बाप रे, दमत असेल नक्की, आणि रोज हो. मी कुठली सरळ, साधी आणि पट्टाकिनी उठणारी होते. बिच्चारा.
मी महाविद्यालयात होते तेव्हा माझे बाबा माझे गजर होते. मी निश्चिन्त झोप काढत असे आणि ते बहुतांशी रात्रभर जागून मी सांगितलेल्या वेळी मला न थकता, स्नूझ पद्धतीने फक्त उठवतं नसतं तर कधी चहा, कधी गरमागरम फेसाळलेली कॉफी पण आणून देत असतं कारण मी अभ्यास करण्यासाठी उठलेले असायचे. कधीच त्यांनी मला नाही म्हटलं नाही ह्या करता.
दिवसभरातल्या येणाऱ्या मिटिंग, काही महत्वाची कामे, आणि इतर गोष्टींची आठवण करून देण्याकरता, जागे व्हा, उठा, हे ठरलेलं काम तुमची वाट पाहत आहे हे दर्शवण्याचे काम पण मोबाईल मधला अलार्म करतो. सद्यस्थितीत माझ्याच मोबाईल वर बरेच अलार्म सेट करून ठेवले आहेत. वामकुक्षी ठराविक वेळेची व्हावी म्हणून देखील अलार्म लावला जातो, फक्त रात्री झोपून उठाय करता नाही.
मी "अबसेन्ट माईंडेड प्रोफेसर" म्हणजे विसरभोळी शिक्षिका म्हणून जेव्हा कार्यरत होते तेव्हा मला डायरीत टिपून ठेवून, मोबाईल वर नोंद करून कधी कधी भागात नसे कारण एखादे काम, मिटिंग इतकी महत्वाची असायची कि ते विसरून चालणे शक्य नसायचे. तेव्हा मग मी माझ्या सोबत विद्यावाचस्पती साठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कामावर लावायची. ते बिचारे त्यांच्या मोबाईल वर माझ्या साठी अलार्म लावायचे. हे काय कमी होतं, एकाच इमारतीत आम्ही सगळे असायचो त्यामुळे मला प्रत्यक्ष सांगायला पण यायचे.
माझ्या घराच्या अगदी जवळ एक शंकराचे मंदिर आहे. तिथली एक खास परंपरा आहे. सकाळी आणि संध्याकाळी आठ वाजता मोठ्याने आरती होते. एक वेगळी ऊर्जा देणारे स्पंदनं तर त्यामुळे पसरतातच, भक्तीमय वातावरण निर्मिती होते, आरती न चुकता कानावर पडते आणि माझ्या मते काही जणांसाठी अलार्मचे काम करते सकाळी.
मोती साबणाची जाहिरात मी कशी काय विसरले ज्यात "अलार्म काका" दाखवले आहेत, जे नरकचतुर्दशी दिवशी अगदी पहाटे सर्व चाळीला उठवायची जबाबदारी घ्यायचे.
तर अशी मी, कित्ती जणांची ऋणी आहे, कित्ती वेगवेगळे गजर वापरले आहेत, ज्यामुळे माझी कामे वेळच्या वेळेवर पूर्ण झालीत. शतशः धन्यवाद सर्वांना.
काय काय प्रकारचे अलार्म आहेत नाही आपल्या वापरात? मस्तच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा