मंगळवार, ११ जून, २०२४

इडियट बॉक्स

 दूरदर्शन, दूरचित्रवाणी किंवा इंग्लिश भाषेत टेलिव्हिजन हा संच माझ्या घरी खूप म्हणजे खूपच लवकर आला, आमच्या कुटुंबाचा भाग झाला. त्या वेळी अगदी ठराविक वेळेपुरता तो चालत असे. त्यामुळे त्या वर कार्यक्रमांची मेजवानी सुरु झाली कि पडद्यावर मुंग्या दिसेस्तोवर आमची त्याला चिटकून बसत असू. तो काळच फार वेगळा होता. तेव्हा ह्या संचाला "इडियट बॉक्स" असे संबोधले जायचे प्रेमाने. पण माझी आई म्हणायची कि घर बसल्या मला सगळ्या दिग्गज कलाकारांना ऐकता येतं, सगळे कार्यक्रम बघता येतात, माहिती मिळते, मुलाखतींचा आनंद उपभोगता येतो मग हा नक्कीच बहू उपयोगी असा संच आहे. हा नसता तर घराबाहेर पडा, कार्यक्रमास्थळी जा, वाहन शोधा, तिकीट काढा आणि परत यावेळी या हे सगळं जमवावं लागलं असतं. पण टीव्ही मुळे हे काहीही न करता अनुभवता येतं. 


एवढ्यातच सतत वर्तमानपत्रात एक जाहिरात झळकते आहे एका मस्त कार्यक्रमाची. खूप विचारपूर्वक आखलेला नजराणा आहे तो माझ्या दृष्टीने. संगीत उपचार ह्या विषयावर उहापोह आहे थोडक्यात त्या ठिकाणी. पण एक तर कार्यक्रमाचे ठिकाण खूप दूर आहे, अवेळी आहे, परत यायला वाहन मिळेल कि नाही अश्या विचारात तो कार्यक्रम उपभोगता येणार नाही. त्यामुळे मग मी ठरवलं कि वाट बघायची, काही दिवस, महिने. कधी ना कधी तरी तो टीव्ही वर प्रसारित होईलच ना? आणि आताशा टीव्ही म्हणजे फक्त एक वाहिनी नाही तर असंख्य पर्याय आहेत. कोणी ना कोणीतरी माझ्या सारख्या प्रेक्षकांसाठी हे सोया निश्चित करेलच. त्यामुळे वाट बघणे हेच काय ते माझ्या हातात आहे आणि ते मी आनंदाने स्विकारले आहे. कुठेही काहीही तक्रार नाहीच, यत्किंचितही. 


मी अनेक वेळा माझ्या विविध कार्यशाळेत गम्मत म्हणून हा प्रश्न विचारते सर्वांना, कि संगणक किंवा तंत्रज्ञान म्हणजे काय? एका शब्दात उत्तर द्या. किंवा संगणक किंवा तंत्रज्ञान ह्याला एक सामानार्थी शब्द काय? लोकं विचारात पडतात आणि बरेच पर्याय सुचवतात जे त्यांना योग्य वाटतात. माझ्यामते फक्त एक पर्यायी शब्द आहे आणि तो म्हणजे संयम / पेशन्स. तसं पाहायला गेलं तर सगळंच आपल्या हातात आहे असं आपल्याला वाटतं तंत्रज्ञानामुळे. पण छे हो मुळीच नाही. संगणक चालेल, वाय फाय चालेल, पट्टाकिनी गुगल उत्तर देईल किंवा सगळी कामे ठरल्यावेळी होतीलच असे नाहीच. काय खात्री आहे कितीही महागडी यंत्रणा असली तरी शाश्वती नाहीच. त्यामुळे मी ह्या क्षेत्रात राहून पेशन्स टिकवणे, ठेवणे अगदी मनापासून एन्जॉय करते, नेहेमीच, आज तागायत. त्यामुळे हा मला मनापासून बघायचा जो कार्यक्रम आहे तो देखील घर बसल्या दिसेस्तोवर संयम बाळगणार आणि मग त्याचा पुरेपूर आस्वाद घेणार, त्यातून खूप काही शिकण्याचा प्रयत्न करणार, भाष्य करणार आणि त्याची आठवण / स्मृती जपणार, खूप जणांना त्या बद्दल सांगणार, मला काय आवडलं ते, का तो कार्यक्रम बघावा ते, किंवा तो का आखावासा वाटला हे पोचवेन ई. 


आज २०२३ चा दिवाळी पहाट हा कार्यक्रम आणि त्या नंतर एक भन्नाट मुलाखत ऐकली यूट्यूब वर आणि मला अगदी धन्य झाल्यासारखे वाटले. त्याचे नियोजन इतके अप्रतिम होते कि मला असं वाटलं कि मी गुलाबी थंडीची मजा घेत पहाटे एखाद्या भव्य पटांगणातल्या सोफ्यावर बसून तो बघते आहे. जून महिन्यात पुन्हा एकदा दिवाळीचा आनंद खऱ्या अर्थाने उपभोगता आला मला. "काय वर्णू तव गूण..." असं म्हणावसं वाटतं ह्या टीव्ही संचाबद्दल आणि त्या अख्या चमू बद्दल ज्यांनी हे माझ्या समक्ष मांडलं / पेश केलं. अहाहा च.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...