नाटक हि एक फारच वाखाणण्यासारखी कलाकृती आहे. प्रेक्षकांसमोर प्रत्यक्ष सादरीकरण म्हणजे कस लागत असणारच. प्रचंड पाठांतर तर हवेच शिवाय तो अभिनय प्रेक्षकांपर्यंत पोचवता आला पाहिजे. त्या करता फक्त कलाकाराचं नाहीत तर अख्खी चमू अतोनात मेहेनत करतेच, नैपथ्य असो, स्टेज ची सजावट, संगीत आणि बरेच काही. असंख्य तालमी, वेशभूषा, केशभूषा, नाटकाचा विषय, तिकिटाचे दर, प्रवास आणि प्रयोगानंतर प्रयोग हे सगळं जेव्हा सादर होते प्रेक्षकांसमोर तेव्हा सगळ्यांनी अत्यादर राखलाच पाहिजे. आधीच्या काळी बरे होते. फोन नव्हते, दर्दी प्रेक्षक होते कारण बाकी खूप मनोरंजनाची साधने नव्हती आणि त्यांना तिकिटावर खर्च केलेल्या पैशांची जाणीव देखील होती.
पण आता चित्र किंचित बदलले आहे. मोबाईल फोन अगदी सर्वांकडेच असल्यामुळे बऱ्याचदा त्याची घंटी वाजण्याची शक्यता असते. प्रेक्षक फोन घेण्याकरता, किंवा बोलण्याकरता नाट्यगृह सोडून बाहेर जाणं येणं पण करातांना दिसतात. अश्या मुळे मग तो कलाकार विचलित होऊ शकतो पेक्षा निश्चितच त्यांना त्रास होऊ शकतो. नाटकाची लय बिघडू शकते, आणि जे खरंच नाटकाचा आनंद उपभोगायला आले आहेत त्यांना पण मग त्रास होतो. हे सगळं टाळण्यासाठी कदाचित तीनदा घंटी वाजवली जाते. ती फक्त प्रेक्षांसाठीच नाही तर कलाकार आणि चमू साठी पण असते. पण खास करून प्रेक्षकांना सांगण्यासाठी. बाहेर बसलेल्या वडापाव आणि तत्सम पदार्थ तय्यार ठेवण्यासाठी पण. पहिली घंटा कदाचित "तय्यार व्हा" असं दर्शवत असणार, दुसरी म्हणजे "जागी स्थानापन्न व्हा, मोबाईल चा आवाज शांत ठेवा", तिसरीला तर पडदा उघडतोच.
अगदी ह्याच धरतीवर जरी माझ्या लेकीने कधीही प्रत्यक्ष नाटक बघितले नाही, तिला ह्या तीन घंटा ठाऊक नाहीत तरी ती बहुतांशी दररोज तीच वापर करतेच. इतक्या वर्षांचा अनुभव कथन करते आहे मी. पहिली घंटा म्हणजे "चला पहाट झाली, उठायला पाहिजे" आणि "मी काही वेळेत उभी टाकीन तुझ्या समोर माते" असं दर्शवणारी, दुसरी जी काही वेळानी वाजते "उठायलाच हवं का? काय हे? का उठायचं? इतक्या लवकर?" असं काहीसं आणि त्यानंतर तिसरी च्या वेळी स्वारी हळुवारपणे भानावर येते, बसते / टेकते, उपयुक्त कामे आटोपते अगदी शिस्तीत, शांतपणे ई. अजूनही विद्यार्थी दशेत असल्यामुळे घाई नाही. त्यामुळे तीन घंटा अत्यानंदाने उपभोगणे सुरु आहे. दररोज आधुनिक नाटकाची सुरवात मला अनुभवायला मिळते त्या मुळे हो, मज्जा येतेच. असो, पण जेव्हा काम असते, परीक्षा असते, कुठे वेळेत जायचे असते तेव्हा घंटेची गरज पडत नाही, जबाबदारी डोकं निश्चित वर काढते आणि ताबडतोब कृती होते, हे कित्ती छान आहे बघायला. मस्तच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा