परवा का माहित नाही पण मला श्री तिरुपती बालाजी संस्थानचा प्रासादिक लाडूच खायचा होता, तेव्हाच्या तेव्हाच. नंतर नाही. इतके डोहाळे देखील नव्हते लागलेले मला, इतक्या प्रकर्षाने ते खायचेच होते, ताबडतोब. कितीही तंत्रज्ञान पुढे सरकले तरी माझी अशी हि हटके इच्छा पूर्ण होणे त्या वेळी शक्य नव्हतेच. हे मला ठाऊक होते. मग माझी धडपड सुरु झाली, काय काय करता येईल हे विचारचक्र सुरु झाले आणि मार्ग मिळत गेले, ताबडतोब. अनायसे दुसऱ्या दिवशी रविवार होता. म्हटलं चला, हि पर्वणी साधून घेऊ या. केतकावळे, श्री बालाजीचे देवस्थान तेथे जायचे मनात आले. चौकशी सुरु केली, अगदी वाहनचालक बघितले, किती खर्च होतील ह्याचा अंदाज घेतला, वेळ किती लागेल हे पण बघितलं आणि मग माझा मोर्चा माझ्या लेकीकडे वळला. तिला हे सगळं सांगितलं आणि तिला यायला भाग पाडलं माझ्या सोबत. अर्थात ती जगावेगळी माझी मैत्रीण आहे, त्यामुळे कुठलेही आढे वेढे न घेता ती तय्यार झाली, ह्या सगळ्यात कुठलाही रस नसतांना, बिच्चारी. बाकी दोन एक ठिकाणी पण तस्साच प्रसादाचा लाडू उपलब्ध असतो हि पण नाविन्यपूर्ण माहिती समोर आली आणि अख्खा प्रोग्रॅम आखला गेला. आम्ही दोघी निघालो. श्री कृष्णाचे मंदिर आमच्या घरापासून खूप दूर आहे. त्यामुळे पुणे दर्शनच घडले ह्या निमित्याने. मग फक्त माझ्याच साठी नाही तर अनेकांसाठी लाडू आणले आणि भरपेट फस्त केले.
ह्या पिटुकल्या प्रवासात मला असं जाणवलं कि सिमेंटचं जंगल फारच वेगाने वाढते आहे. इतके कि महाराष्ट्र राज्यात जे नव्हतं ते माझ्या चार डोळ्यांना दिसलं. माझे वडिल स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात अनेक वर्ष कार्यरत होते, त्यामुळे काही नियम माझ्या कानावर पडले होते. आणि अर्थात आपल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने, हवा खेळती राहावी म्हणून ते आखले गेले होते. प्रत्येक घराच्या आजूबाजूला ठराविक जागा मोकळी सोडायचीच. आता फ्लॅट्स आहेत जागोजागी. तेथे पण तो नियम लागू असावा. पण ते दुर्श्य आता संपूर्णपणे बदलेले दृष्टीस पडले. इतके चिटकून चिटकून गगनचुंबी इमारती उभ्या केल्या आहेत कि ज्याचं नाव ते. मग माझ्या मनात एक विचार आला. महाराष्ट्रात मी राहिले असल्यामुळे फक्त तेच अनुभवले, कि आपल्या घरात झालेला एखादा मस्त पदार्थ आपण शेजारी देतो, चव बदल म्हणून, किंवा खास म्हणून. हे कुठेतरी लोप पावत चाललं होतं, दुर्मिळ झालं होतं. पण ह्या अश्या इंच इंच जागेचा सदुपयोग करून बांधलेल्या इमारती बघितल्या आणि त्या मागचं खरं कारण उमजलं. अच्छा, म्हणजे हि आपली जुनी पद्धत लोप पाऊ द्यायची नाही आहे तर? मस्त. आणि त्यात आता सगळ्या प्रांतांचे लोक आले आहेत आजूबाजूला वास्तव्याला, त्यामुळे हा तर दुग्ध शर्करा योगच जणू. क्या बात है? ज्यांनी असा विचार करून हि घरं बांधली त्यांना शिरसाष्टांग नमन. आवडलं मला. जेथे माझी नजर जात होती तेथे असेच दृश्य बघायला मिळाले त्या दिवशी. आणि अर्थात पुढे येऊ घातलेले नवीन बांधकाम देखील अगदी त्याच धरतीवर सुरु असलेले देखील बघितले. किती मस्त ना? फक्त आपल्या स्वयंपाक घरातून हात बाहेर काढायचा कि दुसऱ्याचेच घर, पदार्थ अगदी सोप्प्या पद्धतीने सुपूर्त. देवाण घेवाण परंपरा सुरु राहील सहज. पण मंडळी हे सर्व साधतांना स्वतःच्या प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष असू द्या. सकाळच्या रम्य वातावरणात बाहेर पडा. स्वच्छ हवेचा आस्वाद दररोज घ्यायला अजिबातच विसरू नका. मोकळ्या ठिकाणी व्यायाम करा म्हणजे मज्जा येईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा