रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१

फोन येणे

माझ्या घरी विविध प्रकारचे फोन येतात, नेहेमीच, सजीव व्यक्तींकडून तर अगदी सारखेच पण बाकी सगळ्यांकडून देखील. कसं? सांगते ऐका. 

आधी ताजी आजची गोष्ट आणि मग तुम्हाला भूतकाळाची सफर घडवते. सध्या माझी "बदली" झाली असल्यामुळे खूप दिवसांनी घरी आले आणि म्हणायला नको पण थोडीशी अवकळाचं आली होती घराला. रात्रभर झोप नाही मला, हे समजतंच नव्हतं कि कुठून सुरु करू आवरायला. मी काय आवरु, मावशींना काय सांगू, कसं सांगू ई. सरते शेवटी पहाटेच सुरवात केली एक एक कोपरा करत, थोडं बसत उठत मस्त लख्ख  दिसायला लागलं घरा, त्यामुळे अजून हुरूप वाढला आणि मावशींच्या मदतीने मज्जा आली. इतके म्हणजे इतके फोन आले त्यानंतर, कारने धन्यवाद दिले, स्वयंपाक घर, देव घर, न्हाणीघर ई. सगळेच बोलते झाले. इतकं म्हणजे इतकं समाधान वाटलं म्हणून सांगते, कोण म्हणतं घर आणि घरातल्या वस्तू निर्जीव असतात आणि ते फोन करत नाहीत, बोलत नाहीत ते, व्यक्त होत नाहीत. मला तर नेहेमीच जाणवतं प्रकर्षाने. आणि कोणी का म्हणे ना "आई कुठे काय करते" मला माझे "प्रशस्ती पत्र" मिळाले न मागता, समाधान लाभलं, अजून बाकीच्या सजीव प्राण्याने कशाला वेगळं सांगायला हवं, आणि का थांबायचं त्या करता? मी आपली अशीच पुढे जाणार ह्या विविध प्रकारच्या फोन च्या संभाषणांवर भर देऊन प्रत्येक ठिकाणी, घरी दारी. बास. असे अनोखे फोन अनुभवून / घेऊन तर बघा, जगावेगळी मज्जा येईल.

हि असली फोन संकल्पना माझी पिल्लं लहान असल्यापासून सुरु झाली खरं. त्यांना अभ्यासाचा फोन येत असे, जेवणाचा पण, पाण्याचा ई. पिल्लाना पण भलतीच मज्जा यायची आणि अडनेड वय असल्यामुळे ते ऐकायचे पण आणि पट्टाकिनी कामं व्हायची हसत खेळत.

त्यानंतर "मेरी बिल्ली मुझपर म्याऊ" पद्धतीने हिच माझी पिल्लं संगणकावर खूप वेळ मी काम करत बसले कि, फोन वर जास्त कामाचं बोलणं झालं कि, आणि अश्या टिपलेल्या आणि ज्याने मला कदाचित त्रास होईल अश्या वेळी मग म्हणायचे "मम्मा, तुझ्या संगणकाचा आत्ताच फोन आला होता बरं का". म्हणजे थोडक्यात "पुरे आता".

माझ्या मावशींनी घर नीट साफ नाही केलं तरी फोन येतो मला, झाडू चुकून जोरात आपटला गेला किंवा पडला त्यांच्या हातून, भांडे धुतांना आवाज झाला जास्त तर.....  त्यामुळे आता माझ्या अवतीभोवती सगळ्यांनाच हि अजिबोगरीब फोन संकल्पना माहिती झाली आहे आणि आवडली पण आहे.

असो, आज अनेक जणांचे आणि अनेक प्रकारे धन्यवाद देणारे फोन येऊन गेले म्हणून हा पंक्ती प्रपंच.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...