माझी पहिली नोकरी एका छोटेखानी पॉलीटेकनिक कॉलेज मधे शिक्षक म्हणून सुरु झाली १९९५ साली. त्या नंतर १९९८ डिसेंबर पर्यंत मग मी त्याच संस्थेच्या इंजिनीरिंग कॉलेज मधे शिकवलं. त्यावेळी / त्याकाळी आम्हा शिक्षकांना एक मोठी खोली दिली होती बसायला आणि त्यात प्रत्येकी एक टेबल आणि खुर्ची. होत एक कपाट. त्या आमच्या शिक्षकांच्या खोलीत मी, वानकर मॅडम, पद्मा मॅडम, भोयर सर, कराळे सर आणि सिद्गगी सर ई. मंडळी असायची. कांबळे मॅडम आल्या होत्या पण अगदीच काही दिवसांकरता. मी, वानकर मॅडम, पद्मा मॅडम, भोयर आणि वडस्कर असे मिळून दररोज न चुकता एकत्र डब्बा खात असू. पाच डब्बे म्हणजे पाच भाज्या आणि विविध प्रकार. माझी आई त्यात बहुतेक प्रत्येक दिवशी तूप कालवलेला आमटी भात देत असे भरपूर डब्ब्यात. फक्त विचार करा इतके टेबल भरून पदार्थ रोज असायचे जेवतांना. "आयसींग ऑन केक" म्हणजे त्या जेवणाची वैविध्यता, एक ब्राह्मणी, एक साऊथ इंडियन, एक होस्टेलचे तर बाकी दोन भन्नाट तिखट / चमचमीत, शिवाय पोटभर गप्पा आणि दिलखुलास हासणं. मला नाही वाटत इतकी मज्जा रोज कोणी उपभोगली असेल. आमचे भोयर सर नेहेमी म्हणत असत कि हे तर पंचतारांकित हॉटेल पेक्षा जास्त असतं दररोज आणि ते देखील घरच/ स्वच्छ / प्रेमाचे मसाले घालून केलेलं. कुठेही कधीही कसलाही भेदभाव नाहीच. पद्मा मॅडम इतक्या मानाने मोठ्या, कल्पना मॅडम वयाने थोड्याश्या मोठ्या माझ्या पेक्षा, तरी देखील सगळे जेवणाच्या टेबलावर सारखेच.
आणि हे पुन्हा छोट्या प्रमाणात मला पुन्हा एकदा २०२१ मधे अनुभवायची संधी मिळाली आहे. पुन्हा एकदा पद्मा मॅडम च्या हातच अप्रतिम जेवायला मिळणार आहे लवकरच. तेव्हा त्या दिवसांसारखे ते सगळे जण एकत्र नसू आम्ही पण आठवणीत आणि हास्यात नक्कीच भेट होईल, लवकरच. आणि ते दिवस पुन्हा अनुभवता येणार हा विचारच मला उत्साह देऊन जातोय.
सध्या नागपूर मधे वास्तव्य आहे माझं काही दिवसांकरता कचेरीच्या कामानिमित्य, त्यामुळे म्हटलं हे जुने बंध पुन्हा प्रत्यक्ष अनुभवावेत. त्याकाळी आमची फक्त सहपाठी म्हणुन ओळख नव्हती तर अगदी घरच्यासारखी.
"अशी माणसे येती आणिक स्मृती देऊनी जाती".
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा