आमच्या सोसायटीत चार बोरवेल आहेत. त्यापैकी दोन चालत नाहीत, एक चालू आहे, आणि चौथ्याबद्दल मला फारशी माहिती नाही.
त्या बोरवेल खोदताना मोठमोठ्या तज्ज्ञांना बोलावण्यात आलं होतं. भूभाग, पाण्याची पातळी, जमिनीचा स्वभाव, अंदाज, मोजमाप… ह्या सगळ्याचा त्यांना प्रचंड अनुभव होता. तरीही प्रत्येक वेळी पाणी लागलंच असं नाही.
तेव्हा एक गोष्ट पुन्हा प्रकर्षाने जाणवली.
निसर्ग अजूनही काही गोष्टी स्वतःकडेच ठेवून आहे, आणि ते खूप आवश्यक आहे. नाहीतर माणूस प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात आणायला निघाला असता. विशेष म्हणजे हा काही अज्ञात प्रदेश नव्हता. शहराजवळचा परिचित भाग, कागदोपत्री माहिती उपलब्ध असलेली जागा. तरीही अंदाज पूर्णपणे जुळले नाहीत. आणि तेच कदाचित सुंदर आहे.
मागे एकदा अशीच एक मुलाखत ऐकली होती. दोन अतिशय नावाजलेल्या व्यक्ती उपस्थित होत्या. वयाने मोठ्या, अनुभवाने प्रचंड समृद्ध. एक मानसोपचारतज्ज्ञ आणि दुसऱ्या कौन्सिलर.
चर्चेचा विषय होता: “किती मुलं असावीत, कधी असावीत, का असावीत…”. क्षणभर विचारात पडले. माणूस खरंच किती काही ठरवायला निघालाय. अहो, जन्म, मृत्यू, योग, प्रारब्ध, नशीब, निसर्ग, शरीराची साथ, काळ, परिस्थिती… कितीतरी गोष्टी एकत्र आल्या तरच काही घडतं ना? दोन माणसं, एक घर आणि एक निर्णय म्हणजे परिणाम हमखास ठरतोच असं नसतं. विज्ञान कितीही पुढे गेलं, तंत्रज्ञान कितीही विकसित झालं तरी काही गोष्टी अजूनही आपल्या पूर्ण नियंत्रणात नाहीत. आणि कदाचित तेच योग्य आहे.
प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. सचोटीने काम करणं आपल्या हातात आहे. कोणालाही विनाकारण दुखावू नये, आभार मानावेत, नतमस्तक व्हावं, विज्ञान समजून घ्यावं… हे आपल्या हातात आहे. पण अंतिम तळ गाठणं? ते प्रत्येक वेळी आपल्या हिशोबानेच घडेल असं नाही.
काही दिवसांपूर्वी मानवी शरीरावर आधारित काही animations पाहिले. एखादा रोग शरीरात नेमका कसा तयार होतो, पेशी कशा काम करतात, शरीराची अंतर्गत रचना किती सूक्ष्म स्तरावर कार्यरत असते… ते पाहून अक्षरशः अवाक व्हायला झालं. अब्जावधी पेशींनी बनलेलं हे शरीर. श्वासासाठी हवा. गुरुत्वाकर्षण. पाणी. धरती. निसर्गाची अखंड साथ.
इतकं काही आधीच आपल्याला दिलेलं आहे. मग कदाचित प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण मिळवण्याच्या हट्टापेक्षा, प्रयत्न करत पुढे जाणं, स्वीकार करणं आणि आनंदी राहणं अधिक महत्त्वाचं असावं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा