माझा दादा लहान होता, शाळकरी मुलगा होता तेव्हा तो शाळेत जातांना पेटी घेऊन जात असे, अल्युमिनियम ची छोटीशी चौकोनी. माझ्या दृष्टीत नेहेमी पडायची ती छोटेखानी पेटी आणि उत्सुकतेने मी अनेकदा विचारायची त्या बद्दल. मग माझी बारी आली, माझी शाळा सुरु झाली आणि मला पण एक अल्युमिनियम ची नवीन डिझाईन ची उत्कृष्ट दिसणारी अशी पेटी मिळाली. त्या शिवाय एक केशरी रंगाची प्लॅस्टिकची पेटी पण घेऊन दिली बाबांनी दप्तराशिवाय. चौकोनी पाटी मावेल असं दप्तर, दोन पेट्या आणि डब्बा असा तेव्हा माझा हक्काचा संसार होता. आलटून पालटून वापरात होते मी ते. ह्या तीनही दप्तरात कॅम्पस बॉक्स, त्यात पेन्सिल, पेन आणि बऱ्याच वस्तू, शिवाय जेवणाचा डब्बा, पाण्याची बाटली, लोखंडी किंवा लाकडी पट्टी ई. खूप काही असायचं. त्यामुळे शाळेतून येता-जाता मस्तीत चालतांना / धावतांना तो दप्तराचा संगीतमय आवाज / ते बोल म्हणजे अहाहा, थकवा संपून उत्साह द्विगुणित व्हायचा.
दोन एक दिवसांपासून माझ्या लॅपटॉप च्या ब्यागेत प्लास्टिक चा लॅपटॉप चा स्टॅन्ड आहे आणि त्या शिवाय बहुतेक अजून छोट्या छोट्या वस्तू ठेवल्या गेल्या आहेत चुकून घाईघाईत बहुतेक. ते काय आहे ते असो पण मला अगदी उंच आकाशात गेल्याचा परमानंद होतो आहे, कारण ऑफिस ला जाता-येता मस्तीत चालतांना शाळेच्या दप्तरातून यायचा तस्सा आवाज येतो आहे. आई शप्पथ भन्नाटच. अगदी लहान झाल्यासारखं च वाटतंय. गती वाढवली कि, दिशा बदलली कि, चढतांना, उतरतांना, वळून बघतांना, प्रत्येक कृतीनुसार तो आवाज बदलतो, अहाहा. शब्दात मांडणे अतिशय अवघड.
मला कधी म्हणजे कधी वाटलं नव्हतं मी पुन्हा एकदा दप्तराचा उपभोग घेऊ शकेन ते, आणि ते देखील ह्या वयात. पण पोटभर घेते आहे कारण तो सांगितीक आवाज अचानक उभा ठाकला माझ्या पुढ्यात. किंचित बदल एवढाच आहे कि पाटी दप्तरात आडवी ठेवण्याची पद्धत होती त्यावेळी, त्यामुळे दप्तरं आडवी असायची. आणि आता लॅपटॉप म्हणजेच आधुनिक पाटी उभी ठेवली जाते आणि त्यामुळे सॅक म्हणजे माझं दप्तर उभं आहे, बास. आईच्या हातचा डब्बा हवा होता, ती फक्त उणीव आहे. असो. असंच सतत मला अजूनही माझं लहानपण क्षणोक्षणी जगायचं आहे नेहेमीच. फार फार आवडतंय मला ते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा