अनेक पालक, सवयीमुळे, तणावाखाली किंवा मुलांना शिस्त लागावी या हेतूने काही गोष्टी बोलून जातात, कधी कधी त्याला थेट धमकीचे स्वरूपही येते. काही आया तर मुलांना सतत धमकावत राहतात. त्यांच्या कोवळ्या मनावर या सगळ्याचा काय परिणाम होत असेल, हे कोणीच जाणत नाही. आज मी तुम्हाला अशाच एका सत्यकथेबद्दल सांगणार आहे.
एका आईची ही गोष्ट आहे, जी एकाच वेळी घर, नोकरी, पुढील शिक्षण आणि मुलांची जबाबदारी अशा अनेक आघाड्यांवर लढत होती, पण तिचे कशावरच फारसे नियंत्रण नव्हते. जेव्हा मुले हट्ट करायची किंवा तिला त्रास द्यायची, तेव्हा ती आई लगेच म्हणायची, "चला, आता तुमची बॅग भरते आणि थेट हॉस्टेललाच (वसतिगृहातच) टाकते तुम्हाला!"
मुले खूप गयावया करायची आणि काही दिवसांनी पुन्हा तेच. त्या वेळी त्या आईच्या मनात काय चालले होते? असे वागून तिला काय मिळत होते, कुणास ठाऊक?
ते दिवस सरले, मुले मोठी झाली आणि अगदी कोवळ्या वयातच, जणू पंख फुटल्याबरोबर, ती स्वतःहून हॉस्टेलला राहायला गेली. त्यानंतर काही प्रसंग असे घडले की आता ती आई एकटी वास्तव्याला आहे—जणू तिलाच कोणीतरी हॉस्टेलला टाकले आहे.
बघा म्हणजे! जी आई मुलांना हॉस्टेलला पाठवण्याची धमकी देत होती, त्याच आयुष्यात तिला आता एकटे राहण्याची पाळी आली आणि मनात एक कायमची सल लागून राहिली.
नवीन आई-वडिलांना माझी कळकळीची विनंती आहे की जर तुम्ही मुलांशी असे भावनिक व्यवहार करत असाल, तर कृपया सल्लागाराची (Counsellor) मदत घ्या. कारण, फार नंतर वाईट वाटून काही उपयोग होत नाही. एकदा हातातून गेलेला काळ आणि झालेले नुकसान कधीही दुरुस्त करता येत नाही.
इथेच हिशोब चुकते होतात, ताबडतोब. नंतर कितीही पश्चात्ताप झाला, तरी त्या गेलेल्या क्षणांना आणि दिवसांना परत आणता येत नाही. त्यामुळे, वेळीच सावध व्हा, जागे व्हा आणि अशा भावनिक चुका तुमच्या हातून होऊ देऊ नका.
अर्थात, त्या मुलांचे काहीच वाईट झाले नाही. खूप जण हॉस्टेलमध्ये मजेत राहतात, पण ते नक्कीच आव्हानात्मक असते. ही गोष्ट आता त्या आईला असे एकटे राहिल्यावर समजत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा