सध्या नेमका कुठला ऋतू सुरू आहे, याची सर्वत्र चर्चा आहे. कधी ढगाळ वातावरण, कधी पाऊस, तर दुपारी कडक ऊन आणि रात्री-पहाटे गुलाबी थंडीची चाहूल. आणि हे निश्चित नाही, कारण सध्या कधीही काहीही होतंय!
काल असेच झाले. काल माझा गजर म्हणजे तो थेट पावसाचा आवाज. 'पहाटे पहाटे हा नक्की पावसाचाच आवाज आहे का?' असा विचार मनात आला आणि मी खडबडून जागी झाले. तसेही मला काल लवकरच उठायचे होते.
सकाळी सात वाजता माझा ऑनलाईन क्लास होता आणि त्यानंतर नऊच्या सुमारास एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी पळायचे होते. मीटिंग कधी सुरू होईल आणि किती वेळ चालेल, याची कल्पना नसल्यामुळे मी स्वयंपाक करून ठेवण्याचे ठरवले. सोबतच नाश्ता तयार करणे, तो शांतपणे सेवन करणे आणि बाकीची घरकामं, माझे आवरणे हे सर्व होतेच.
बरेच दिवस झाले, मी सकाळी कोवळ्या उन्हात चालायला जाते आहे आणि अर्थातच, त्यामुळे मला हलकं-फुलकं वाटायला लागलंय. माझा उत्साह दुप्पट / द्विगुणित झाला आहे. चालून आल्यावर सोसायटीतील ओपन जिममध्ये थोडा वेळ घालवते. आमच्या सोसायटीतल्या 'आज्जी'सुद्धा तिथे येतात आणि मला सांगतात, "मला हे सगळे खेळायला आवडतात." त्यांच्या भाषेत बोलायचं झाल्यास, तिथे ८-१० प्रकारची 'खेळणी' आहेत. मीही त्यांच्यासोबत तिथे खेळते आणि मग दिवसभराच्या कामांना सुरुवात करते.
पण काल मला वेगळे वेळापत्रक पाळावे लागणार होते.
आणि का कुणास ठाऊक, पाऊस आला? हा पाऊस यावेळी, म्हणजेच अवेळी, का आला असेल? हा प्रश्न मी जेव्हा स्वतःला अनेकदा विचारला, तेव्हा मनातल्या मनात एक अप्रतिम उत्तर गवसले:
"अगं, तुला चालायला जायला काल वेळ नव्हता ना? तुझी एकापाठोपाठ कामे लागली होती. आणि मला हे ठाऊक आहे की तू एकदा घरातून बाहेर पडलीस की पुन्हा सहसा घराबाहेर पडत नाहीस. त्यामुळे आज तुझे चालणे संध्याकाळीही होणार नाही हे मला माहित होते. केवळ तुला वाईट वाटू नये आणि 'आज माझे चालणे राहून गेले,' अशी खंत वाटू नये, म्हणून मी हजेरी लावायचे ठरवले. पाऊस असताना सहसा कोणी मोकळ्या हवेत फिरायला जात नाही ना? म्हणजे मग तुम्हाला चालणे चुकल्याची खंत वाटणार नाही. बरोबर केले ना मी?"
हे असे विचार जेव्हा माझ्या कानावर पडले, तेव्हा मी निःशब्द झाले. बापरे! किती काळजी त्याला माझी! काल सकाळची ती बरसात माझ्यासाठी खास होती, क्या बात है! हे मला मनापासून भावले.
नकळत असेच काहीतरी इतरांसाठी करायला हवे, परतफेड म्हणून, जेव्हा जमेल, जितके जमेल, तेवढे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा