बुधवार, २२ जून, २०२२

घाम

दोन अडीच दशकां आधी अमेरिकेत एक नवी पद्धत मी बघितली होती, अनुभवली देखील जी त्या आधी मला माहित देखील नव्हती. भारतात असतांना वातानुकूलित यंत्रणा असते हे ठाऊक होतं, पण सर्रास सर्वत्र ती उपलब्ध नसल्यामुळे ती एक महागडी चैनीची न-लागणारी निरुपयोगी वस्तू आहे एवढंच माझं ज्ञान त्याबद्दल. असो.

अमेरिकेत अख्खी च्या अख्खी इमारत वातानुकूलित होती तेव्हा, म्हणजे ऋतुमानाप्रमाणे किंवा ज्या भागात जसं हवामान असतं त्या प्रमाणे सम्पुर्ण इमारत गार किंवा गरम ठेवली जायची. पहिल्यांदा अनुभवलं तेव्हा दाही बोटं तोंडात गेली माझी आपोआप. आताशा भारतात देखील हे फारच सर्रास सर्वत्र बघायला आणि अनुभवयाला मिळतं. बहुतांशी प्रत्येक घरात AC, प्रत्येकाच्या दारात एक किंवा अनेक चारचाकी त्यामुळे त्यात नचुकता AC, कचेरीत, भोजनालयात, बँकेत, दुकानात, टॅक्सी त, अगदी जगी-स्थळी-पाषाणी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही इतक्या सर्व ठिकाणी AC. अतिशयोक्ती झाली असं जाणवतच.

काल मस्त पाऊस पडून गेला, वातावरण बऱ्यापैकी गार झालं होतं, ह्या नव्या AC-पिढीतला एक तरुण बघून मी अवाक झाले. त्याच्या एका गाडीतून काही तरी दुसऱ्या गाडीत ठेवणं सुरु होतं त्याच पार्किंग मधे. मी सहज बघितलं, बोलले तर बघते काय तो संपूर्ण नखशिखान्त घामाने डबडबला होता, जसा कि विहीर खोदून आला आहे, किंवा डांबरी रस्यावर काम करून आला आहे अस्सा. मग लक्षात आलं माझ्या, काही क्षण AC नव्हता ना त्यामुळे.

एवढ्यातच मी एक दिवशीय कृतिसत्र / कार्यशाळेत सहभाग घेतला होता. ती कार्यशाळेत जे शिकवत होते ते खूप नामांकित व्यक्ती होते, खूप वर्षांचा अनुभव होता त्यांना. अशी अनेक कृतिसत्र आयोजित केली असतील त्यांनी ह्याआधी. हे सत्र एका वातानुकूलित स्थळी आयोजित केलं गेलं होतं. ती खोली इतकी प्रचंड गार झाली होती कारण एक तर वातानुकूलित यंत्रणा नवीन होती, आणि खूप AC लावले होते, लोकं कमी होती ई. म्हणजे काही वेळाने खरंच AC बंद करावा अशी प्रबळ इच्छा निर्माण झाली बहुतांशी सर्वांमधे. तरी पण ते शिक्षक अक्षरशः घामाने चिंब झाले होते. शिकवणे हि एक कला आहे, प्रत्येकवेळी वेगळं आव्हान असतं कारण श्रोर्तुगण बदलतो किंवा वर्ग संपेस्तोवर ची ती तात्पुरती स्थिती असू शकते, किंवा स्वभाव देखील. असो, पण हा पण घामाचा प्रकार झालाच.

प्रत्यक्षात उन्हातान्हात, रस्त्यावर, उन्हाळ्यात सतत शेगडी समोर / विस्तवासमोर जे काम करतात, कष्टकरी ह्यांचा काय तो खरा घाम, ज्याला स्वकष्टाचा वेगळा सुगंध असतो, दुर्गंधीची किनार देखील नसते, कधीच.

त्यामुळे गरज नसतांना अती AC मुळे लागलेल्या चुकीच्या सवयी काहींच्या शरीराला, किंचित गोंधळ / ताण / स्वभाव ह्या मुळे अनुभवलेला घाम आणि निरपेक्ष किंवा आखून दिलेली कामं प्रचंड कष्ट करून अवघड परिस्थितीत निभावतांना आलेला नैसर्गिक घाम असे अनेक प्रकार माझ्याकडून टिपले गेले.

जमल्यास कुठलीही गोष्ट अती करू नका, साधा पंखा असेल तरी आनंद माना, नसेल तरी अडू देऊ नका, कधीच. सरळ सोप्प सात्विक सहज समाधानाचे क्षण अनुभवा जमेल तेव्हा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...