शनिवार, १८ जून, २०२२

नवा दागिना

म्हणजे तसा जुनाच आहे हा देखील दागिना पण जरा हटके असा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जरी कोणी तो मला दिला असला तरी त्याला एक चकाकी / एक झालर निश्चित आहे कि तो मी कमावला आहे कष्टाने, खूप वाट बघून, पेरून, शांत राहून ई. त्यामुळे मला प्रिय असा हा दागिना आहे. बहुमूल्य म्हटला तरी वावगं ठरणार नाही असा.

लहान बाळांच्या पायात पैंजण घालतात आवर्जून, कारण, ते नक्की कुठे खेळात आहेत, धडपडत आहेत हे सगळं दूर राहून देखील आईला, आजीला, घरच्यांना लक्षात येतं. थोडी मुलगी मोठी झाली कि पैंजण लाच एक प्रतिशब्द आहे तो म्हणजे छुमछुम. त्या अगदी पिटुकल्या घुंगरांचा आवाज इतका मधुर असतो कि त्याचमुळे त्याला हे नाव ठेवलं असणार. त्या छुमछुम मुळे त्या मुलीला एक नकळत सांगितीक साथ मिळते सतत, अगदी "जेथे जातो तेथे तो माझा सांगाती" अश्या पद्धतीची. छल्ला, कानातले झुमके, अधेमधे येणारे बांगड्यांचे, अंगठीचे आवाज ई. मुळेच मुलींचं विश्व एका वेगळ्या पद्धतीने व्यापलं आहे. आणि बाकीच्यांचं मला अजिबात ठाऊक नाही पण माझा तरी स्वयंपाक घरातला वेळ ह्या सगळ्या सूक्ष्म आवाजांमुळे खूप मार्गी लागतो, गती मिळते कामाला आणि कृतज्ञापूर्वक समाधान लाभतं ते वेगळंच "चेरी ऑन केक" जसं.

अगदी त्याच धरतीवर सध्या माझे प्रत्येक क्षण / तास आणि दिवस सुरु आहेत.

मला ओळख-पत्र = आयडी-कार्ड दररोज गळ्यात घालून ठेवायची सवय आहे, न चुकता. कारणं अनेक आहेत, 

  • एक म्हणजे ते मला कमावता आलं आहे, ती माझी एक ओळख आहे आणि ते बघून दररोज त्यामागची मेहेनत ह्याचा विसर पडत नाही मला. 
  • आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे त्या कार्डला मी माझ्या केबीनची चावी लावली असते, म्हणजे पुन्हा एकदा विसरायला नको, हातात बाळगायला नकोच ई. 

एवढ्यातच अत्याधुनिक वातानुकूलित अशी नवीकोरी केबिन लाभली आहे मला. त्या केबिनच्या ३ भल्यामोठ्या चाव्या आहेत, ज्या मी माझ्या कार्डला कालपासून लावल्या आहेत. आई शपथ, लहानपणी मी जेवढं पैंजण, छुमछुम, मग ओघाने आलेला छल्ला, झुमके, अंगठ्या, बांगड्या जितक्या एन्जॉय नाही केल्या तितक्या ह्या किल्य्यांचा सुमधुर आवाज करते आहे. त्यामुळे देखील मला अजून चालायची अवीट गोडी लागली आहे, पुन्हा एकदा, नवखी अशी. अहाहा च. शब्दात गुंफणे अतिशय अवघड आहे, कारण मी जे स्वतः अनुभवते आहे ते फारच उत्कृष्ट आहे आणि जगापल्याडचं. तर असा हा माझा नवखा दागिना, ज्याच्या आवाजात एक वेगळी सांगितीक भाषा आहे जी फक्त माझ्यासाठी च आहे, जी मलाच समजते अशी. "दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे", असं काहीसं अनुभवते आहे मी. 

त्या किल्ल्यांच्या जुडप्याला छे छे, माझ्या नवख्या दागिन्याला अतिशय मनापासून धन्यवाद आणि ज्याने त्या तय्यार केल्या आहेत त्यांना देखील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...