मूद ह्या सौज्ञेने मला कधी आकर्षित केले, भुरळ घातली हे मला समजलेच नाही. ती एक वाटी घ्यायची, अगदी पिटुकल्या प्रमाणात पाणी लावायचं तिला आतून, त्यात किंचित गरमच असलेला भात उत्कृष्ट पद्धतीने भरायचा आणि मग व्यवस्थित हलक्या हाताने हळुवार लागल्यास ताटावर आपटत ती मूद वाढायची. खरं तर आधी नैवेद्याच्या पानात, मग गरज भासली तर बाकीच्यांच्या पानात देखील. हि झाली साध्या भाताची मूद, मसाले भात असेल तर तीच किंवा तशीच वाटी, अगदी किंचित ओलसर करायची आतून, मग खोबरं कोथिंबीर पेरायची आधी आणि मग भात. खरं तर भात मस्त गरम वाफेचा असायचा, वाटी स्टील ची पण त्या वेळी, त्या भन्नाट वातावरणात ते जाणवायचं देखील नाही. ध्येय एकच गाठायचं असायचं कि मूद एकदम झक्कास आली पाहिजे, दिसायला एकदम उत्कृष्ट आणि ताठ मानेने उभी ठाकली पाहिजे त्या नैवेद्याच्या पानात. खायच्या आधी / तो मूद फॉर्म मधे असलेला भात सेवन करायच्या आधी त्या मुदिनेच मन जिंकलं पाहिजे असं काहीतरी माझ्या डोक्यात तेव्हा चालू असायचं. मला कधीही कोणीही सांगितलं वगैरे नाही पण मलाच वाटायचं कि मूद तय्यार करणे ते देखील फटाफट म्हणजे एक कला आहे, हात कसा भरभर चालला पाहिजे. त्या वेळी वर्षभर सण, समारंभ, उत्सव, आणि इतर बरेच प्रसंग साजरे होतं असतं, प्रत्येक वेळी नैवेद्य असायचाच आणि मी अग्रगणी सगळ्या ह्या अश्या कामांना. गोड साखरभात, नारळी भात किंवा शिरा ह्यांची मूद वाढायची असल्यास त्यात एक बेदाणा किंवा काजू ई. आधी पेरावे लागायचे. मी ते सगळं अगदी म्हणजे अगदी मनापासून उपभोगलं, मी जगले ते सगळे दिवस अक्षरशः. त्या नंतर आले मुदीचे चमचे / साचे, थोडेसे कांगोरे असलेले, कला जास्त प्रमाणात सिद्ध करणारे असे. मला तर मुदीच्या आकारात कोणी भात वाढला कि स्वर्ग चार बोटं दूर असल्यासारखं वाटतं, मी कोणी तरी असल्याचा भास होतो उगाचच.
ह्या माझ्या लाडक्या मुदीची परवा प्रकर्षाने आठवण झाली कारण मी एक नव्या ढंगाची मूद बघितली. अहाहा च. काय अनोखी कल्पना राबवली होती, ज्याच्या कोणाच्या सुपीक डोक्यातून हि आली त्याचे पाय धरणार आहे मी हे नक्की. चार चौघांसाठी घरच्या घरी मूद करणं वेगळं आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे खूप वेगळं वाटलं मला. अर्थात स्थळ माझ्या नागपूरचं मूळचं, सध्या वास्तव्य आहे पुण्यात. माझ्या लेकीने भेळ मागितली आणि आली कि भली मोठी मूद पुढ्यात, भन्नाट दिसणारी, प्रेमातच पडले मी डायरेक्ट, ते मोहक रुपडं बघून मी घायाळच झाले थेट. असं हि होऊ शकतं हे मला माहित नव्हतं, किंबहुना माझ्या देखत पहिल्यांदा होत होतं म्हणून असेल कदाचित. काहीही असो, इतक्या भल्यामोठ्या आकाराची पण मूद असू शकते, नैवेद्याच्या पानाव्यतिरिक्त, भात किंवा शिऱ्या शिवाय, वा वा चं. काय भलतं भारी होतं ते, शब्दात गुंफण अतिशय अवघड. पुन्हा एकदा निश्चित मी हल्दीराम च्या पुण्याच्या ठिकाणी जाणार आणि मूद आकाराची भेळ फक्त फस्त करणार नाही तर जे हे करतात, ह्या मागची कल्पना कोणची ह्याची चौकशी नक्की करणार. आणि हो, ह्या नंतर माझ्या घरी भेळ हि फक्त अश्या मूद फॉर्म मधेच वाढली जाणार हे पक्क, कारण ह्यात हाताला पोळणार पण नाही, सोप्प आहे. "हटके थिंकिंग" ला माझा सलाम, सरते शेवटी माझ्या नागपूरचं पाणीच वेगळं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा