मंगळवार, २९ मार्च, २०२२

खरं कारण

मी कुठे तरी ऐकलं आहे कि ज्यांचे केस कुरळे असतात त्यांचं आयुष्य पण म्हणे गुंतागुंतीचं असतं, त्यांच्या केसाप्रमाणे. कुरळ्या केसांना सांभाळावं तर लागतंच, पण कंगवा करायला फार वेळ  लागतो, गुंता पण खूप होतो. असो.  अर्थातच ज्यांचे केस मुळात सरळ आहेत त्यांचं आयुष्य सरळच असणार नाही का. कित्ती भाग्यवान, गुंतागुंत नाही, म्हणजे ते सोडवणं नाही, आणि हि सततची / दररोज ची च गोष्ट हो, वारंवार गुंता होणारच आणि तो सोडवावा लागणारच. कुरळ्या केसांच्या लोकांना खरं पहिला गेलं तर अनेक वरदान असतात, एक म्हणजे ते जसे केस असतात ते त्यांना फार छान दिसतात, अगदी कंगवा केला नाही तरी. कसे पण बांधा, सोडा, वेणी घाला, मस्त दिसतात, घनदाट दिसतात. रोजचा गुंता सोडवल्यामुळे मस्त झालेला असतो त्यांचा स्वभाव, शांत, समजूतदार ई. असा माझा अंदाज आहे आणि हे मी कित्येकदा अनुभवलं देखील आहे. म्हणून येथे मांडते आहे, अपवाद असतील आणि ते असावे पण.

हे सगळं ऐकून मग मला लक्षात आलं कि आजकाल नैसर्गिक असलेले कुरळे केस सरळ का करून घेतले जातात, पैसे देऊन. आत्ता उलगडा झाला, म्हणजे ह्या पुढचं आयुष्य सरळ असणार, कुठल्याही गुंत्याशिवाय. आमेन, अगदी तसेच होवो.

चटके

अनेक वर्ष मी नागपूरकर होते, तेथे उन्हाळा म्हणतो मी. त्या उन्हाळ्यात देखील गरज असल्यामुळे गाडी चालवली, बस ने, इतरांसोबत प्रवास केला. त्यांनतर पुणेकर झाले, अतिशय वेगळ्या गार वातावरणापासून ते प्रचंड तळपता सूर्य हे बदल गेल्या अनेक वर्षात अनुभवले. इथे पण भर  उन्हात गाडी चालवली. पण कधीच माझ्या हे का नाही लक्षात आलं कुणास ठाऊक. आज मात्र प्रकर्षाने जाणवलं. गाडी जेव्हा संध्याकाळी ५ वाजता पार्किंग मधून काढली तेव्हा ती फारच तापली होती, प्रचंड ऊन होत आज. त्या तश्या तापलेल्या गाडीत बसल्यावर माझ्या मनात आलेले विचार इथे थोडक्यात मांडते आहे. पांढरी गाडी, झाडाखाली लावलेली जर इतकी तापत असेल ज्यात कापडी सीट कव्हर्स आहेत, तर तो डांबरी रस्ता कित्ती तापत असेल सांगा? फक्त विचार करा. आणि अश्या अनेक तास तापलेल्या रस्त्यावरून जेव्हा सगळ्या गाड्या जातात तेव्हा त्यांच्या टायर्स ना किती चटके लागत असतील. त्यात रस्त्यावर दगड, ठिकठिकाणी खोदलेले, त्याच्या जखमा वेगळ्याच. तरी देखील आपण ज्या गतीने गाडी चालवतो त्या गतीने टायर्स धावत राहतात आपल्यासाठी, आपल्याला / गाडीत बसणाऱ्याला त्याच्या जागी सुरक्षित पोचविण्यासाठी. कमाल कमाल आहे माझ्या दृष्टीने हि. ह्यातून बोध मी तरी असा घेईन कि आई-वडिल देखील असंख्य चटके सोसत मुलांना मोठे करत असतील, सगळेच नाही पण बरेचसे.  अगदी तस्सेच ऑफिस मधे वरिष्ठ, जमेल तस्स बहुतांशी प्रत्येक वेळी प्रत्येकाला सांभाळून घेतात, त्यांना त्यांच्या परीने चटके खावे लागत असतील संस्था चालवायची म्हणजे. पंतप्रधान देश चालवायचा म्हणजे कमी चटके असतील का? त्यामुळे सजीव किंवा निर्जीव कोणी असो, जे आपल्यासाठी कष्ट करतात, धावपळ करतात, मदत करतात प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष रित्या त्या सर्वांना मनापासून दंडवत घातलं राहा, नतमस्तक व्हा आणि असेच जमेल तसे, जमेल तेवढे, जमेल तेव्हा दुसऱ्या साठी काही तरी छोटसं करून बघा, किती समाधान मिळतं ते. माझ्या गाडीच्या आणि समस्त टायर परिवाराची माफी मागते मी मनापासून, पण त्यांनी जे मला सुचवलं, दाखवलं, ते अनोखं आहे. टायर काय, आई-बाबा काय कुठलीही, कधीही तक्रार नसतेच, पण तरीही तुम्हाला पुढे घेऊन जातातच, न कंटाळता. मी तर निःशब्द झाले पुरती. धन्य ते टायर धन्य त्यांचे कार्य, परिश्रम, सातत्य. 

मी माझ्यातचं गुरफटले

२३ वर्षांपूर्वी व्हाट्सअँप, इन्स्टा, फेसबुक ई. काय साधं मोबाईल नावाचं खेळणं हातात नव्हतं त्यामुळे पत्र लिहिणं किंवा STD फोन ते देखील बूथ वर जाऊन हेच काय ते साधन संवाद साधण्याचं. बास. लग्न झालं, दुसरं शहर, दुसरे राज्य, सगळंच नवीन / नवख आणि त्यानंतर तर नवीन देशचं, मग लेकरं, PhD, पूर्णवेळची नोकरी, घर ई. मधे जे मी गुरफटले कि हवा तेवढा वेळ माझ्या जन्मदात्यानां अजिबातच देता आला नाही. तेव्हा हि उणीव भासत होती, पण आज ते टोचतंय, फार भयानक पद्धतीने जाणवतंय. अर्थात मुद्दाम केलं अशातला भाग मुळीच नाही, पण एखाद्याची, फोन ची, त्याचा आवाज ऐकण्याची वाट बघणं म्हणजे काय हे आता समजतंय. जेव्हा मी ह्या वाट पाहण्याच्या फेज मधून जाते आहे तेव्हा, फार वाईट अनुभव आहे हे नक्की. मी सध्या माझ्या दादाच्या खुशालीची वाट बघते आहे कारण तो श्री. नर्मदा परिक्रमेला गेला आहे, माझ्या भाऊरायाची / त्यांचा आवाज फक्त ऐकण्यासाठी वाट बघते आहे कारण ते मागील दोन आठवड्यापासून प्रचंड कामात आहे, दिवस रात्र एक करून काम चाललंय, खाण्या पिण्याकडे नक्कीच दुर्लक्ष झालं असणार, त्यांचा आवाज ऐकायचा आहे. अशीच माझी आई माझी वाट बघत असणार आणि आता फक्त फोटोत उरली आहे, माझ्या डोळ्यात पाणी, असंख्य आठवणी ई. देऊन फार दूर निघून गेली, कायमची.  माझी सर्व जणांना हि कळकळीची विनंती आहे पुन्हा एकदा कि थोडासा तो फोन बाजूला ठेवा, ऑफिस च्या कामातून अगदी ५ मिनिटं वेळ काढा आणि आपल्या लोकांशी संवाद साधा, बोला, भेटा नुसतं टेक्स्ट नको. माझ्या सारखं फक्त ऑफिस आणि घर करू नका, स्वतःला अनुभव येईल तेव्हाच माझ्या सारखे जागे होऊ नका. कोणासाठी दुःखाचं तुम्ही कारण होऊ नका, कोणालाही (आई वडिल, भावंडं, आई-वडिलांसारखे, तुमच्यावर प्रेम करणारे ई. ) वाट बघायला लावू नका.

सोमवार, २८ मार्च, २०२२

मी आणि लिखाण

माझ्या शाळेतल्या दिवसांमधे मी हवं तेवढं म्हणजे भन्नाट मार्क्स मिळतील इतपत अगदी अलंकारिक भाषा वापरून निबंध, पत्र आणि बाकी लिहीत असे. पण त्यापुढे काही नाहीच. मला माझा मोठा भाऊ नेहेमी फार रागवायचा सतत. म्हणायचा कसा जसं हवं तसं, गरजे नुसार, रागरंग बघून लिहिता आलं पाहिजे, स्वतःहून, कोणाची मदत न घेता. आणि त्याच्या सततच्या ह्या टोकण्यामुळे, वय पण अडनिडं, त्यामुळे अजूनच घट्ट झाला राग लिखाणावरचा आणि ठरवलं देखील, झालं पण लिखाण वगैरे मला करायचं नाहीच, मला लिहिता येत नाही, मी लिहिणार नाही, बाकी सगळं करणार पण लिहिणार नाही. असं काहीस. असो. आणि हो, त्यावेळी शिक्षकाला शिकवता येणं, समजावून सांगता येणं, प्रश्न पत्रिका तय्यार करणं, तपासणं ई. आलं कि पुरेसं होत. आणि आता. संशोधन हा अविभाज्य घटक झाला आहे साधारणतः २०१३ पासून, ९-१० वर्ष झाले. संशोधन करून फक्त चालत नाही ना, काय शोधलं हे जगाला सांगावं लागतं लिखित स्वरूपात. बरं संशोधन मांडण्याचे असंख्य प्रकार, पेपर्स, पेटंट्स, प्रोपोझल्स, ग्रँट्स आणि बरेच काही. प्रत्येक वेळी अश्या पद्धतीचं लिखाण म्हणजे तांत्रिक नावीन्य पूर्ण काम केल्याची गोष्ट रंगवून सांगणे. बास. इतकं ते अविभाज्य घटक असल्यासारखं झालाय, अंगवळणी पडलंय कि सर्वत्र सदानकदा आता फक्त गोष्टीच दिसतात आणि मांडता येतात. आताशा तर दररोज भरभरून लिहिल्याशिवाय चैन पडत नाही, सुचत नाही, अगदी लेखिका वगैरे नाही, पण मनात आलं ते उतरवायचं हे घडतंय. त्यामुळे मलाच माझ्यातला बदल / प्रचंड बदल, कधीही स्वप्नात देखील न पाहिलेला बदल अनुभवतांना समाधान वाटतंय हे नक्की. अशीच अविरत सेवा घडो माझ्या हातून सरस्वती देवीची हि तिच्याकडे प्रार्थना. त्यामुळे मला हि / अमुकतमुक गोष्ट आवडत नाही, ती मी करणार नाही ई. वाक्य उच्चारू नका कधीही, नाहीतर माझ्या सारखे सतत तेच कराल हि शक्यता नाकारता येत नाही. 

ग्रास ऑन दी अदर साईड

अगदी आज झालेली छोटीशी घटना आणि खरंच माझे डोळे उघडले. मी हे अनेकदा माझ्या चार डोळ्यांनी बघितले आहे, पण भिडलं आजच, डायरेक्ट थेटच. तर त्याचं असं झालं, एकापाठोपाठ बरं का मंडळी, जसं कि त्या छोटेखानी घटना मला काही तरी खुणावत होत्या. मी ज्या रस्त्यावरून येणं - जाणं करते ती एक बारीक बोळ आहे. त्या रस्त्यावर अगदी त्यांच्याच फक्त मालकीचा आहे असं समजून माझे चार पायांचे दोस्त मस्त पहुडले होते आरामात. आणि हे दोस्त पण ह्याच कलियुगातले ना, मग काय, गाडी आली काय गेली काय ते ढिम्म हालत नाहीत. त्या गाडीवानाने न्ह्यावी गाडी जमेल तशी. देवा. असो. तर माझ्या समोर एका डॉगी ला त्याचा मालक दुचाकी वरून घेऊन चालला होता आणि त्याच्या पाठोपाठ दुसरा मालक भल्या मोठ्या चारचाकीतून डॉगी ला नेत होता. सगळ्यांची नजरानजर झाली आणि त्याचं सर्वांनाच मनोगत मला समजलं असं झालं अचानक, काही सेकंदात. रस्त्यावर च्या ना वाटलं कि कित्ती सुखी आहेत, गाडीवर फिरत आहेत, मालक आहे, खाऊ-पिऊ घालतो, गादी झोपायला, गारवा, डोक्यावर छत, स्पेशल खेळणे, कौतुक आणि काय काय. त्याच वेळी गाडीतून प्रवास करणाऱ्यांना जाणवलं असेल कि हे सगळे कित्ती मोकळे आहेत, मित्र-मैत्रिणी आहेत, कुठलीही बांधिलकी नाही, पिंजरा नाही, हवं तस्स वागा, हवं तिथे लोळा, काय मज्जा आहे नाही, गळ्यात पट्टा नाही, कि गुळगुळीत फरशी नाही, मस्त रेती-माती-चिखल अहाहा . म्हणजे बघा आता "जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे". "कोणाचं काय तर कोणाचं काय". मंडळी हि त्या संपूर्ण चार पायांच्या मित्रांची नजरानजर खूप काही सांगून / शिकवून गेली मला आणि समस्त मानवजातीला. आहे त्यात नक्की खुश राहा, तुलना फक्त स्वतःशी करा कि काल मी काय होतो आणि आज बोध घेऊन काय प्रगती केली ते बास, आपल्याला लाभलं आहे ते मोजा नाही ते सोडून द्या, प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या भाग्या प्रमाणे, कृती प्रमाणे, विधिलिखिताप्रमाणेच स्वास्थ्य, संपत्ती, प्रकृती, आणि इतर गोष्टी मिळतात / दिल्या जातात. आहे ते मनापासून आनंदाने सांभाळा आणि पुढे व्हा.

अत्याधुनिक रुमाल

माझे आई-बाबा आणि सगळेच मोठे नेहेमीच सांगत आले आहेत कि उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात स्वतःची / दुसऱ्याची (आपल्या मुलांची / आई वडिलांची ) कान आणि मान सांभाळा. थोडक्यात म्हणजे दुचाकी वर जात-येत असाल तर रुमाल बांधा, झाका कान आणि मानेला, ऊन लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच थंडी बाधते. अनेक जणं आवर्जून ते सांभाळतात, रुमाल बांधतात कारण त्यांना ते सगळे अवयव हवे आहे, त्याचं महत्व त्यांना पटलंय. काही जणं मात्र आधुनिक पद्धतीने कान झाकण्याचा प्रयत्न करतांना दिसतात. आधी वायर वापरून करत होते कारण तशाच पद्धतीचे यंत्र म्हणायला हरकत नाही उपलब्ध होते, आणि आता वायर शिवाय आहेत, हाच काय तो फरक. अश्या यंत्रांचा वापर करणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस फारच वाढते आहे. त्या मुळे मला प्रश्न पडला आहे कि हा आधुनिक रुमाल कितपत उपयोगी? तो कान झाकतो पण जेव्हा रुमाल वापरला जातो तेव्हा कान मान एकत्र झाकली जाते, कान झाकलेले असले तरी ऐकू येत कि रस्त्यावर / आजूबाजूला काय चाललंय, वाहनं कुठून येत आहेत, कोणी आवाज देत असेल तर आणि बरेच काही. साधा रुमाल अनेकविध काम करतो, बहुउपयोगी असा आहे. माझ्या दुर्ष्टीने ह्या यंत्राने नुकसानच जास्त आहे फायद्यापेक्षा. पण फॅशन आहे ना, प्रवाहपतीत व्हायलाच हवं नाही का? असो, मंडळी ब्लु टूथ इअर फोन हे रुमाला ऐवजी वापरता येत नाही, रस्त्यावर वापरू नयेच शहाण्या माणसाने. टाळा आणि स्वःताला वाचावा दुष्परिणामांपासून हि कळकळीची विनंती.

हुषार गुगल बाबा

आई शपथ, तशी पण मी गुगल ची फारच मोठी फॅन आहेच, सगळेच आहेत, पण मी जरा जास्त मोठी पंखा हो. एवढ्यात मला एक मेल आला. त्यात एक गुगल फॉर्म ची लिंक दिली होती. वरिष्ठांचा मेल असल्यामुळे युद्ध पातळीवर हवी ती माहिती ताबडतोब भरून दिली, मेल पाठवला आणि मला ताबडतोब गुगल बाबांनी म्हटलं पण कि तुमची माहिती मिळाली ते. पण त्यानंतर अनेक / असंख्य लोकांचे त्या वरिष्ठांच्या मेल ला भरभरून उत्तरं येत होती. म्हटलं काय करावं, मी पण करू का मेल? आधी माझ्या काही तरुण मैत्रिणींना विचारलं कि काय केलंय त्यांनी, त्या म्हटल्या कि फक्त गुगल फॉर्म भरला तरी पुरेसा आहे, पुन्हा मेल ची जरुरत नाही. मग डोक्यात किडा वळवळला कि मी फॉर्म नक्की भरला ना? काय करावं? म्हटलं एकदा का मी फॉर्म उघडून बघितला कि मला खात्री होईल. म्हणून पुन्हा एकदा त्या दिलेल्या लिंक वर क्लीक केलं तर गुगल बाबा म्हणतो कसा, तू आधीच हा फॉर्म भरला आहेस. हायस वाटलं आणि कमाल वाटली त्या बाबाची, माझ्यासारखीला आवश्यक अशी सुविधा दिल्या बद्दल. आजकाल विसरायला फार होतं, कामात काम, काय केलंय काय राहिलंय हे आठवे पर्यंत  ........  जाऊ दे. असो. त्यामुळेच तर मी ह्या गुगल बाबाला स्मार्ट आणि हुशार म्हणते ना.  

धन्यवाद खरोखर, माझ्या सारखीची गरज ओळखून सुविधा उपलब्ध करून दिल्या बद्दल.

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...