आज माझ्या लेकीची परीक्षा होती त्यामुळे मला कालच सांगण्यात आले कि "उद्या सकाळी लवकर उठव, तू उठलीस कि, साधारण सहा वाजता किंवा लवकरच...".
"पडत्या फळाची आज्ञा," मला हे सहज शक्य होत आणि गजर असतोच माझा त्यानुसार आधी मी उठले, आटोपलं आणि मग म्हटलं तिला मिस्ड कॉल द्यावा, तसेच केले, मग उठल्या बाई साहेब. थोडेसे लाड झाल्यावर म्हटलं बैस मी चहा करते दोघींसाठी म्हणजे तू अभ्यासाला लाग मी कामाला. भन्नाट चविष्ट चवदार मसालेदार चहा दोघी माय लेकींनी एन्जॉय केला. तेव्हाच पुन्हा एकदा मला माझ्या दिवसांची आणि माझ्या बाबांची आठवण झाल्याशिवाय राहवलं नाहीच.
मी अशीच माझ्या बाबांना सांगून झोपत असे, ते साधारण एक तास आधीच गजर लावत असतं, मग उठून त्यांचं आवरायचे पहिल्यांदा आणि मग मला उठवायला यायचे. मिस्ड कॉल ची पद्धत नव्हती न त्या वेळी. त्यामुळे अगदी प्रेमाने उठवायचे आणि मी "अजून पा$$$$$च मिनिट फक्त बाबा..." असं म्हणून पुन्हा गुडूप. मग ते हि माझ्यावर छान पांघरूण घालून जायचे आणि यायचे पुन्हा दहा मिनिटाने. माझे पाढे पंचावन्न, तेच. मग मात्र काही वेळानी ते शस्त्र काढायचे आणि मी उठले रे उठले कि दोन-तीन कप चहा आणि कॉफि चे घेऊन यायचे. म्हणायचे जे हवं ते पी. बाकी मी आहेच. अभ्यास मस्त होऊ दे, बरं का? आणि स्वतः जागे राहायचे, काही तरी लिखाण करायचे, वाचायचे ई.
का आणि कुठे गेले ते दिवस आणि माझे बाबा? हा सदा अनुत्तरीत प्रश्न ठेऊन... आता पुढचं लिहिणं अवघड आहे, डोळे भरलेत, स्क्रीन दिसत नाही आहे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा