शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१

ठेच्यावरचे प्रेम

माझी आई, माझ्या सासू बाई आणि मी आम्हा सगळ्यांना प्रचंड म्हणजे प्रचंड आवडतो मिरचीचा ठेचा. माझ्या नागपुरात तर दोन प्रकारचे ठेचे असतात, एक म्हणजे हिरव्या मिरचीचा आणि दुसरा लाल मिरचीचा पण वेगळा. अहाहा. हे लिहितांना सुद्धा माझ्या फक्त तोंडात पाणीच आलं नाही तर सगळे च्या सगळे सुंदर दिवस आठवले अगदी पाटा-वरवंट्यावर केलेला ठेचा ते सर्व काही. त्यामुळे मी सतत थोडा थोडा ठेचा करून मनसोक्त फस्त करत असतेच. पण गेले काही दिवस जरा पायांमुळे मी घरीच जेरबंद झाल्यामुळे प्रचंड आवडीचा ठेचा खाल्ला कि किंचित त्रास होऊ लागला आहे, हालचालीवर थोडे बंधन आल्यामुळे. त्यामुळे माझी लेक मला ठेचा अजिबातच खाऊ देत नाही. मग मी ठेचा करून इंडायरेक्टली ह्या त्या पदार्थात घालून माझी दुधावरची तहान ताकावर भागवते. असो. 

पण परवा मज्जाच आली. मला ठेचाच खायचा "च" होता. मग आता? लपूनछपून रात्री खाल्ला आणि थोडा उरला होता तो दुसऱ्या दिवशी एका पोळीच्या आत घालून आणला डब्ब्यात. ऑफिस ला पोचले, काम सुरु झालं नेहेमी प्रमाणे आणि जेवायची वेळ झाली. डब्बा खायला सुरवात केली. एक पोळी संपली. दुसरी खायला लागले तर ठेच्याचा स्वाद, मी अवाक झाले. म्हटलं संपूर्ण एक पोळी संपली ह्या भाजीमधे अचानक ठेच्याचा स्वाद कुठून आला आणि कसा? आणि मग काय चमत्कार, मी तो लपवलेला ठेचा माझ्या दृष्टीस पडला. इतका आनंद झाला, उरलेली पोळी आणि भाजी मग त्या ठेच्या सोबत फस्त केली, हा हा करत, कारण "रात्र थोडी सोंग फार" अशी काहीशी माझी अवस्था झाली होती "पोळी-भाजी थोडी आणि ठेचा फा$$$$र". घरी डब्बा भरला रे भरला कि आणि येथे ऑफिस च्या कामाला लागल्यावर संपूर्ण पणे मी लपवाछपवी विसरले होते. असो. पण हा लपंडाव मी फारच एन्जॉय करते आहे अगदी नाममात्र पण नक्की ठेचा खाऊनच. पहिल्यांदा मला विचार पडायचा, एवढासा ठेचा कसा करायचा? मग त्यावर उपाय / तरणोपाय पण सापडला. मी ठेचा खलबत्यात मावेल / लागेल तेवढाच करते, मी अगदी थोडासा ठेवते (मनावर मोठा दगड ठेवून) आणि बाकीचा ताबडतोब मावशींना देऊन टाकते. त्या पण खुश, मी पण आणि माझा सख्खा ठेचा पण. याहू..... 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...