गुरुवार, १० मार्च, २०२२

समरसता

मी एकदा एका दिग्गज गायिकेचा कार्यक्रम तिकीट काढून बघायला, ऐकायला गेले होते. त्या कार्यक्रमात विविध गाणी, वाद्य, आठवणी, माहिती आणि गायिकेची मुलाखत देखील होती. त्यात विचारलेला एक मस्त प्रश्न असा होता कि "तुमचा अनेक देशात खाद्य पदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे, मग तुम्हाला अगदी मनापासून आवडणारा पदार्थ कुठला?नक्कीच विदेशी असणार ना?" त्यावर दिलेलं उत्तर जगावेगळं होत, फारच चविष्ट चवदार असं. चपराख उत्तर म्हणजे "तव्यावरची गरम तूप लावलेली पोळी, बास". मनापासून दंडवत घातलं मी त्या दिग्गज गायिकेला हे उत्तर ऐकून, क्षणभर तर माझा माझ्या कानांवर विश्वासच नाही बसला.

अगदी
मला चावता यायला लागल्यापासून आईने नेहेमीच्या पद्धतीने प्रमाणे हळू हळू पिठीसाखर तूप पोळी, गुळ तूप पोळी, शिंग फुटल्यावर ताज्या आंब्याच्या लोणच्याचे तेल / खार पोळी ई. मनापासून करून दिल, खाऊ घातलं आणि ते क्षणात संपत देखील असे. घरी असेल तर वाफाळलेली गरम तव्यावरची पोळी-रोल नाहीतर डब्ब्यात थोडीशी गार झालेली पण मायची उब असलेली, त्याने ओतप्रोत भरलेली.

आज मला लागोपाठ कामं होती कचेरीत. घरी नाश्ता करून च निघणार होते मी, पण मला माझी भूक ओळखीची असल्यामुळे माहित होत कि दोन मिटिंग च्या अधेमधे पोटोबा नक्की करावा लागणार आहे. त्यामुळे मावशींना एक पोळी जास्त करायला सांगितली, गुळ तूप लावून त्याचा रोल केला आणि फॉईल मधे घालून नेला, यथेच्छ फस्त केला. ताजी पोळी, गुळ आणि तूप जसे कि एकमेकात समरस होऊन गेले होते, त्यांची एकच चव उरली होती जणू. मज्जा आली, पोटाला निश्चितच किंचितसा आधार मिळाला आणि अर्थात प्रकर्षाने आईची आठवण झाली. तिचं स्वयंपाकघर, तिने केलेले / दिलेले रोल आठवले. "अन्न हे पुर्णब्रह्म..." आणि कुठलीही तुलना तर नाहीच नाही पण आईच्या हातच्या त्या साध्या रोलची सर ह्या आजच्या माझ्या रोलला नव्हती हे खरं. ती कित्ती मनापासून सातत्याने दही लावायची, लोणी काढायची, कढवयाची, गहू पाहून आणून-निवडून-दळून आणून त्याच्या पोळ्या असायच्या. गुळाची भली मोठी ढेप आणि त्याची चव फारच अप्रतिम असायची. आता हे सगळं भुतकाळात जमा झालंय. असो तरी "दुधाची तहान ताकावर" असं स्वतःला मी समजावलं आणि हे लिहायला घेतलं. 

साधा काही क्षणात तय्यार होणारा सोप्पा असा तो रोल, प्रचंड पौष्टिक असा, शिवाय घरचे सहज उपलब्ध असलेले जिन्नस वापरून केलेला पण आभाळाएवढ्या आठवणी ठेवून गेला आहे. 

आई पट्टाकिनी ये ना परत आणि खाऊ घाल पुन्हा सगळं म्हणजे सगळं पोटभर, अजून नाही गं भरलं पोट....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...