रविवार, २० मार्च, २०२२

वरईचे तांदूळ अक्का भगर

माझ्या आईने सांगितलेला एक किस्सा मला आठवला आज. त्या वेळी / काळी अनेक उपास असतं आणि आईबाबा ते मनापासून करत पण होते, त्यामुळे माझ्या सारख्या लहान मुलांची चंगळ होत असे आणि आत्ता कळतंय मला कि मी एवढी खवैयी कशी झाले ते. तर बाबांच्या डब्यात भगर - आमटी आईने दिली होती असंख्य वेळा आणि ती बाबांच्या एका अमराठी मित्राने चाखली, त्यांना ती प्रचंड आवडली देखील. त्या मित्राने मग त्याच्या बायकोला सांगितले कि देशपांडे साहेब असा असा डब्बा आणतात, मॅडम ना विचार तो पदार्थ कसा करायचा ते. एकदा आईची त्या मॅडम शी भेट झाली प्रत्यक्ष आणि त्यांनी विषय काढला. आईने पण मग दोन पर्याय सुचवले, एक म्हणजे घरी या पोटभर खा, मी तुम्हाला करून दाखवते, चव घ्या म्हणजे पुढल्या वेळी घरी तुम्हाला करता येईल, दुसरं म्हणजे नीट व्यवस्थित कृती समजावून सांगितली. त्यावर त्या मॅडम चा प्रतिप्रश्न, "हा पदार्थ का खायचा उपवासाच्या दिवशी?", आई: " कारण त्याला वरईचे तांदूळ असं म्हणतात, म्हणजे एक प्रकारचा भाताचं ना, पोटभरीचे होते आणि भात आमटी खाल्याचं समाधान देखील".  त्या बंगाली असल्यामुळे आईने पुन्हा एकदा खात्री करून घेतली कृती समजली कि नाही ह्याची, आणि त्या हो म्हटल्या.  मग काय त्या लागल्या कामाला ताबडतोब, केली भगर आणि त्यानंतर बघतात तर काय संपूर्ण दगड. सर परेशान आणि म्हटले "देशपांडे मॅडम ची अशी नाही होत भगर", त्यावर मॅडम च उत्तर "त्यांनी जशी सांगितली तशी मी केली".  पुन्हा आईची भेट आणि त्या भेटीत समजलं कि मॅडम नी भगर चक्क कुकर मधे लावली, शिट्ट्या येऊ दिल्या भातासारख्या, कारण आईने फक्त समजावून सांगतांना म्हटलं होत कि ह्याला तांदूळ असे म्हणतात. देवा.

आधी भगरीत निवड फार असायची. भगर आधीच फार बारीक, त्याचे दोन प्रकारची निवड म्हणजे डोळे गरगरायचे. माझे बाबा निवृत्त झाल्यावर आणि माझं लग्न झाल्यावर मी जेव्हा अमेरिकेत गेले तेव्हा भजन गुणगुणत कधी अंगणात तर कधी सोफ्यावर तर कधी कुठे बसत उठत अगदी वर्षभर पुरेल इतकी निवडून तय्यार ठेवायचे. मी आले कि आधी माझ्या ब्यागेत टाकायचे / ठेवायचे मस्त पॅक करून आणून. किती कष्ट ते, पण कित्त्ती आनंद होत असे त्यांना ते करण्यात. आणि भजनासोबत सारखा जप, ह्या दिवशी येणार माझी माय तो पर्यंत मी सगळं निवडून ठेवणार ई.

मग माझी पिल्लं झाली. जेव्हा जेव्हा उपवास तेव्हा तेव्हा भगर हे समीकरण ठरलेलं, आणि प्रत्येक वेळी सुरवातीला वेद लहान असतांना विचारायचाच "आज काय आहे डब्यात मम्मा?", "भगर" म्हटलं मी कि त्याचे डोळे मोठे व्हायचे, चमकायचे आणि अत्यानंदाने म्हणायचा कसा "बर्गर, व्वा, मज्जा आहे". भगर कुठे बर्गर कुठे, काय हे.

पुण्यासारख्या ठिकाणी राहून देखील अनेक वर्ष वर्गमित्र बदलत असतं मुलांचे आणि भगर डब्यात दिसली कि चर्चेला उधाण डब्बा खातांना, कि हे नक्की काय आहे, का आणलंय डब्यात, कसं करतात ई. मुलांना समजावून सांगता सांगता लंच ब्रेक संपून जायचा.

तर अश्या ह्या काही माझ्या गोड आठवणी भगरी सोबतच्या. आज श्री. गणेश चतुर्थी, ह्यांचा उपवास, म्हणून
पहाटे करत होते भगर, निवडत होते, तेव्हा सगळं डोळ्यासमोर उभं ठाकलं. आज अजिबात काही म्हणजे काही निवड नव्हती हो भगरीत, तंत्रज्ञान फारच प्रगत झालेलं दिसतंय. निवडून आयती दिली आहे भगर मला. तंत्रज्ञानाला देखील कळलेलं दिसतंय कि निवडणारे माझे बाबा आता नाहीत त्यामुळे मला त्रास नको. किती विचार माझा आधी बाबांना आणि आता ह्या नवीन आधुनिक पद्धतींना. पण का कुणास ठाऊक, कदाचित हा सगळा माझ्या मनाचा खेळ असेल, पण बाबांनी निवडून दिलेली भगर जेव्हा मी माझ्या घरी तय्यार करत असे तेव्हा आणि त्यांनतर किंवा आज मी केली त्या चवीत जमीन अस्मानाचा फरक जाणवला मला, मी तीच, भगर तीच पण चव निघून गेली / हरवली कुठे तरी, हे निश्चित.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...