काही वर्षांपूर्वी एक नवीन प्रकार चाखला मी, लाल पेरूचं तिखट पेरलेलं आईसक्रीम. फारच अप्रतिम भन्नाट चव. ध्यानी-मनी-स्वप्नी नसतांना आणि ते देखील गोड पदार्थात तिखट म्हणजे काय बोलायचं. लाल चुटुक पेरू वर जसे तिखट पेरून फोडी खातात त्याचीच हि प्रतिकृती हो थोडक्यात. आवडलं मला मनापासून हे पेरूचं व्हर्जन.
अगदी तस्सेच काहीतरी पुरण पोळी सोबत निघायला हवं. माझी मनापासून इच्छा आहे. कारण? सांगते ऐका.
आमच्या परिचयाचे एक गृहस्थ आहेत. खूप वर्षांपासून मी त्यांना ओळखते. त्यांचं आमच्या कडे येणंजाणं आहे, खाणंपिणं पण मग होतचं, आणि परिचय असल्यामुळे आमचं देखील त्यांच्या कडे जाणंयेणं आहेच. एक गोष्ट सातत्याने मला जाणवली ती अशी कि त्यांना काहीही खायला द्या, मग तो नाश्ता असो, पोहे / उपमा / सांजा किंवा साधं घरचं जेवण म्हणजे आमटी भात पोळी भाजी कोशिंबीर, सगळं म्हणजे सगळं, दररोज न चुकता प्रत्येक वेळी अतितिखट लागतंच त्या काकांना, इतकं कि घामाने डबडबतात काय, किंवा सतत तोंडाने आवाज करतात, शिव्या नाही अगदीच पण वाईट शब्द ऐकवतात. आणि हो मला इतकं लक्षात नाही आलं, आता ह्या नंतर मी व्यवस्थित निरीक्षण करीन जेव्हा ते जेवायला / खायला बसतील तेव्हा आणि आवर्जून गोड खातांना, बघू या बरं, सारखा सतत तोंडाने आवाज करण्याची फक्त त्यांना सवय लागली आहे का खरंच तिखट नसतांना देखील त्यांना पराकोटीचं तिखट लागतं ते. माझ्या मते पुरणपोळी खाते वेळी देखील ते सूर सूर असा तिखट लागतं तेव्हा करतात तस्साच आवाज करतील. कोणास ठाऊक. बरं अगदी सप्पक स्वयंपाक केला तरी त्यांना चालत नाही, साधं वरण म्हणजे दुश्मन, मग काय मार्ग अवलंबायचा ते त्यांच्या घरच्यांना आणि मला देखील अजून कळलं नाही. असो. त्यांच्या घरच्यांची हाजमोला गोळी आहे काकांचं जेवणादरम्याचं वागणं, बोलणं. जबरदस्त. तरी देखील काकू सतत प्रयत्नवादी असतातच, विविध पदार्थांची रेलचेल असतेच, दरदिवशीचं काकांचं बोलणं कधी टाळतात, कधी हसणेवारी नेतात, कधी रागावतात किंचित, तर कधी सोडून देतात. सातत्याचं अनोखं उदाहरण म्हणजे हे काका.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा