काल उत्साहात होळी साजरी झाल्यावर, पुरण पोळी - कटाची आमटी यथेच्छ फस्त केल्यावर आज धुलिवंदनची आठवड्याच्या अधे-मधे आलेली सुट्टी उपभोगते आहे मी. हि सुट्टी येणार हे आधीच माहित असल्यामुळे मग मी शांततेत फिजिओ थेरपी घेऊ असं ठरवलं आणि सकाळी क्लिनिक ला ड्रायव्हिन्ग एन्जॉय करत पोचले सुद्धा. मागे अनेक वेळा मी लिहिल्याप्रमाणे मी आज माझ्या पायांवर उभी आहे ह्याच सर्वात मोठं श्रेय माझ्या ह्या फिजिओ थेरपी डॉक्टर ना जातं. आज त्यांना खूप होम व्हिझिट्स होत्या, क्लिनिक मधे खूप जण येणार होती, दिवस सुरु झाला होता आणि संपूर्ण पॅक असणार होता, तरी देखील कुठंही घाई नाही, गडबड नाही, शांत पणे थेरपी दिली मला. मी अनेकदा ऐकलं आहे, कदाचित अनुभवलं पण असेल कळत - नकळत पण आज स्पष्ट पणे मनापासून जाणीव झाली स्पर्शाची, त्याच्या महत्वाची. फिजिओ थेरपी देतेवेळी त्या विशिष्ठ पद्धतीने त्यांच्या बोटांनी, हातानी दाब देतात, अंदाज यायला कि कुठे काय कितपत दुखतंय किंवा ट्रिटमेण्ट ची गरज आहे ई. आणि हि प्रक्रिया संपूर्ण वेळ, प्रत्येक वेळी अविरत सुरु असते. मी इतक्यांदा इतकी वर्ष गेले फिजिओ थेरपी घेण्यासाठी पण आज मला खूप वेगळं वाटलं, जाणवलं आणि थेरपी + मशीन ई. तर आहेतच पण मी बरी होण्यामागे हा प्रेमळ स्पर्श जास्त कारणीभूत आहे, किंबहुना तोच कारणीभूत आहे. त्याला टेक्निकल भाषेत ऍक्युप्रेशर म्हणा पण काही तरी ताकद, शक्ती, जादू आहे हे नक्की. त्यांच्या स्पर्शाचं महत्व आज खूप जाणवलं, अनुभवलं आणि आज मी ते मान्य केलं. मला आधी वाटायचं आपली माणसं आहेत / त्यांच्या अस्तित्वाची जाणीव किंवा फक्त आपल्या माणसांचा आवाज, शब्द, बोल, ध्वनी, ई. पुरेसं आहे, पण नाही, स्पर्शाची भाषा आणि अनुभुती घ्या, चाखा म्हणजे समजेल, ते शब्दात मांडण्यासारखं नाहीच, किंबहुना शब्द नाहीतच त्या करता. ह्या माझ्या डॉक्टर च्या हाताला प्रचंड गूण आहे, यश हमखास, त्यांच्या हातून आधीच खूप जण बरे झालेत, ह्या पुढे पण असंख्य जणांना त्यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा आणि स्पर्शाचा फायदा व्हावा हि ईशचरणी मनःपूर्वक प्रार्थना.
Love you Dr. Leena Auty.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा