शुक्रवार, १८ मार्च, २०२२

एकमद्वितीय शबरी

माझ्या आईबाबांची अनुभवाची शिदोरी भली मोठी होती. त्यातून काही मोजके मोती / आठवणी / किस्से / गोष्टी काढून ते देत असतं मला आवश्यकतेनुसार आणि त्यांचा परीसस्पर्श अजूनही जाणवतो वारंवार. त्यातलंच एक येथे आज मांडते आहे. छोटी पण अर्थपूर्ण आणि स्वतः अनुभवल्यावर उमगणारी गोष्ट / अनुभव. दररोज सकाळी शाळेत / विद्यापीठात किंवा नंतर नोकरीला जातांना न चुकता स्पेशली ते निवृत्त झाल्यावर प्रकर्षाने छोटीशी पाण्याची बाटली भरून ठेवायचे किंवा हातात घेऊन उभे राहायचे गाडी जवळ. पाण्याची बाटली माझ्या सुपूर्त केली कि बाकी प्रश्नांची सरबत्ती सुरु, डब्बा घेतला का, पेट्रोल आहे का, किती वाजता परत येणार, आजचा दिवस कसा असणार आहे, काय काय अपेक्षित आहे ई.  पैसे बरोबर / सोबत आहेत का? हे बहुतांशी नाही विचारायचे, हातात ठेवायचे, २०-५० इतकेच पण ठेवायचे नक्की, "असू दे ग, लागतात कधी तरी" असं म्हणायचे. ते नोकरी करत असतांना भारदस्त / भक्कम हाताने आणि निवृत्त झाल्यावर सुरकुतलेल्या त्याच हाताने पण सातत्याने द्यायचेच हे सगळं, पाणी, पैसे वगैरे.

तशी तर दररोज त्यांची आठवण येतेच पण काल मी लॅब मधे शिकवतांना मला वेड्यासारखा ठसका लागला. थोड्यावेळाने वाटलं बरं, माझ्या कडे पाणी होत ते प्यायले, थोड्यावेळ वर बघितलं (त्यांच्याकडे), शांत बसले न बोलता आणि मग पुन्हा शिकवायला सुरवात केली. त्यावेळी अजून एक मॅडम देखील होत्या तेथे. त्यांनी पण मला पाणी ऑफर केलं. आवडलं मला.

मी काही जणांची, किंबहुना खूप जणांची सवय बघितली आहे कि ते त्यांच्याकडे असलेल्या पाण्याच्या बाटलीला तोंड लावून पाणी पितात. त्यांच्या दृष्टीने ते ठीक असेल, पण मला थोडसं वेगळं मांडायचं आहे येथे. घराबाहेर पडतांना जेव्हा जेव्हा मला माझे बाबा पाण्याची बाटली द्यायचे किंवा असंख्य प्रश्न विचारायचे, खूपदा चिक्की, सुकामेवा, चॉकलेट ई. ठेवायचे बॅगेत न विचारता मला तेव्हा तरुण रक्त असल्यामुळे कधी राग नाही म्हणणार मी पण वेगळं वाटायचं आणि मी विचारायचे त्यांना, कशाला ठेवता हे, आणि पाण्यासाठी कितीदा विचारणार
आहात, खात्री करून घेणार आहात? तर काय म्हणायचे माहिती आहे, "अगं कधीही कुठेही कोणालाही तहान लागू शकते, पाणी बरोबर असायला हवं. फक्त तुझ्यासाठी नाही तुझ्या सोबत / बरोबर जर कोणी असेल तर त्यांना देखील उपयोग होईल, म्हणून, असावं गं नेहेमीच".

घरी पेल्याने पाणी पितांना तोंड लावून पिणं ठीक आहे, पण बाहेर जमल्यास टाळावं, कारणं अनेक आहेत:

  • माना अथवा नका मानू पण पाणी उष्ट होतं
  • दुसऱ्यांना गरज पडल्यास देता येत नाही
  • प्रत्येक वेळी बाटली आणि झाकण स्वच्छ घासलं असेलच असं नाही 
  • शरीस्वास्थ्याच्या दृष्टीने देखील अयोग्य उष्ट पाणी 
  • उगाच आजाराला आमंत्रण
  • पेल्याच तोंड मोठं असत त्यामुळे पाणी सांडूनये म्हणून तोंड लावून पिणं योग्य
  • बाटलीचं झाकण पिटुकलं वरून पिणं सर्वार्थाने योग्यच
  • आणि बरीच आहेत ....


जमल्यास हळू, बसून, आणि वरून पाणी प्या ज्या वेळी बाहेर असाल तेव्हा. जास्त वेळ बाहेर राहणार असाल तर एक पेला ठेवा ऑफिस मधे, पेला असलेल्या बाटल्या पण उपलब्ध आहेत. पण पाणी उष्ट करणं टाळा जमल्यास. पाणी हे जीवन. गरज पडल्यास आपलं उष्ट द्यायची वेळ येऊ नये असं मला वाटतं. आणि नेहेमी त्या भाग्यवान, अद्वितीय भक्त शबरी ची उपमा द्यायला / वापरायला नको. 

घराबाहेर शिक्षणासाठी, कामासाठी किंवा अजून कशाही साठी बाहेर पडलात कि जे तुमच्या पाशी आहे, तुमच्या जवळ आहे ते फक्त तुमच्या एकट्यासाठी नसून गरज पडेल त्यांना द्यायसाठी असतं हे त्रिवार सत्य आहे. अनुभवा आणि स्वतः पडताळून बघा मंडळी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...