मंगळवार, ७ जून, २०२२

अनोखा स्मृतिदिन

ह्याच दिवशी १९९५ साली मी खऱ्या अर्थाने शिक्षिका झाले, किंबहुना शिक्षिकेचं शिकामोर्तब झालं असं म्हणायला हरकत नाही.  २७ वर्ष, विविध ठिकाणं, शहरं, देश, विद्यार्थी, संस्था ई. पण शिकवायची सुरवात अगदी मी ८ वीत असतांना झाली होती कदाचित. नागपुरात झालेली छोटीशी "संगणक शिक्षिका" पदाची सुरवात आज आंतरराष्ट्रीय विद्यापीठात प्राध्यापक म्हणून चालू आहे. त्यात मग कॉलेज मधे लेक्चरर, असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, प्रोफेसर अश्या पायऱ्या चढत चालू राहिली. ह्या संपूर्ण प्रवासाचं श्रेय माझ्या सहपाठींना, विद्यार्थ्यांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना, संस्थेच्या प्रमुखांना, पालकांना, मला दिलेल्या विविध संधींना जातं. प्रत्येक पायरी आव्हानात्मक होती, पण मी एक फक्त माध्यम होते / आहे, त्यामुळे सहज साध्य झालं सगळं. अर्थात अनेक जण ह्या पेक्षा जास्त वर्ष सातत्याने कामं करतात, खूप काही प्राप्त करतात, त्या सर्वांना नतमस्तक होऊन मी फक्त मनापासून धन्यवाद देते आहे, ह्या प्रेरणादायी वाटचालीसाठी. माझ्यासारख्या साध्या मराठी माध्यमाच्या मुलींसाठी, जुळ्या मुलांनघेऊन, फिरतीची नोकरी असणाऱ्या नवऱ्या सोबत हे सगळं सांभाळणं नक्कीच आवाहनात्मक होतं. माझ्या हातून हे सगळं घडवून घेतलं हे स्वप्नगत आहे.  खाली दिलेले फक्त दोन कागदाचे तुकडे पण ते कमावता आले “त्याच्या” मार्गदर्शनामुळे, सततच्या सहवासामुळे आणि भरभरून दिलेल्या आशिर्वादामुळेच. उगाचच ह्या तुकड्यांना "आयडेंटिटी कार्ड" अक्का ओळख पत्र / व्हिसीटींग कार्ड असं नाही म्हणत ना?.  मला आज समजलं / उमगलं कि मी जेव्हा शिकवायला सुरवात केली तेव्हा फक्तच मोठ्या पदावरच्या व्यक्तींना अशी कार्ड्स असायची. असोसिएट च्या आधी सहसा छापली जायची नाहीत कार्ड्स. आता काय करतात हे ठाऊक नाही पण माझ्यासाठी हि माझी संपत्ती आहे असं म्हणायला हरकत नाही. ह्या दोन कार्ड्समधला प्रवास, अंतर चित्रात जास्त दिसत नसलं तरी गाठावं लागलं आहे. असोसिएट झाल्यावर मिळालेलं कार्ड तर माझे बाबा दररोज कितीदा तरी बघायचे, का कुणास ठाऊक?. आज हि दोन कार्ड्स बघून त्यांना सार्थक झाल्यासारखं नक्की वाटलं असतं, उर भरून आलं असतं, पण मी सगळं कमवायला जरा उशीर केला. त्यांच्या इतकं मनमोकळं कौतुक करणारे अगदी बोटावर मोजण्या इतकेच आहेत आणि म्हणूनच माझ्यासाठी प्रचंड प्रेरणादायी असे.

तर एकंदरीत असा हा माझा छोटासा प्रवास कुठल्याही कार्ड शिवाय सुरु झालेला १९९५ साली आणि आज येथे मांडण्याकरता दोन कार्ड्स दाखवता आले, इथपर्यंत झालेला.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...