मंगळवार, ७ जून, २०२२

वास्तुशांती

नवीन घर बांधलं कि वास्तुशांती हि भव्य दिव्य पूजा केली जाते. कारण घर बांधणं हे पण भव्य दिव्य काम आहे, खूपच मोठी कामगिरी आहे / उपलब्धी आहे. प्रचंड केलेले कष्ट, बघितलेली स्वप्न आणि त्याचं ज्वलंत उदाहरण / प्रतीक म्हणजे स्वताःच घर / वास्तू. ह्या अश्या आशा, अपेक्षा, आकांक्षा, उत्साह आणि ऊर्जेने बांधलेलं घर नेहेमी शांत, समृद्ध असावं म्हणून केलेली आळवणी, त्या वास्तू पुरुषाची. खूपच सुंदर संकल्पना आहे ती आणि अजूनही बांगला, फ्लॅट, रो हाऊस, गाळा, दुकान ई. काहीही विकत घेतलं / खरेदी केलं तरी आपण निश्चितच वास्तुपूजन करतोच. त्यात अजून एक कंगोरा असा देखील आहे कि जर नवीन मजला बांधला तरी देखील वास्तू पूजा करावी, किंबहुना करतातच किंवा आमचे गुरुजी नेहेमी सांगतात कि दरवर्षी किंवा दोन वर्षातून एकदा तरी राहत्या घराची वास्तू पूजा करावीच. काही जण तर घराला संपूर्ण नवा साज चढवल्यावर देखील बऱ्याचदा वास्तुपूजन करतात. एकंदरीत काय तर मनापासून धन्यवाद देणे वास्तू पुरुषाला आणि सातत्याने आशीर्वाद लाभावे ह्या साठी नतमस्तक होणे.

मला एक साधा प्रश्न पडला आहे कि वास्तुपुरुष कशाने तृप्त होत असेल?, फक्त एकदा किंवा काही वेळा केलेल्या पूजनाने का त्या ठिकाणी जे वास्तव्याला आहेत  ते सगळे समाधानी असल्याने / राहिल्याने / एकमेकांशी जुळवून घेतल्याने / शांतता राखल्याने / सन्मान ठेवल्याने / आदर केल्याने / प्रेम बहरल्याने ...... ? बऱ्याच रिती आणि पद्धती आहेत ज्याचा तो वास्तुपुरुष भुकेला आहे. त्यामुळे "घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, येथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती", हे किती सार्थ आहे हे लक्षात येतं.

घर म्हणजे जेथे आपण वृद्धिंगत होतो, आपल्या डोक्यावर मायेचं प्रेमाचं छत असतं, जेथे आपली उपस्थिती प्रार्थनीय असते, जेथे आपली गणना होते, जेथे शांतता लाभते आणि जेथे आपण आपलं समजून वावरतो. दिवसातले सगळे ऊर्जेचे तास आपण जेथे घालवतो आणि सन्मानाने मार्गक्रमणा करतो असं ते ऑफिस, नाही का? काल मी एक अनोखी वास्तुशांती अनुभवली. माझी एक प्रिय सखी उच्च पदी स्थानापन्न झाली, तिला तिची वेगळी कक्षा / केबिन मिळाली कारण नवीन अत्याधुनिक मजला बांधला गेला ऑफिस मधे. हे तिच्या घरच्यांना समजलं आणि वेगळी कक्षा / केबिन मिळाली हि मोठी गोष्ट आहे कारण त्याकरता प्रचंड कष्ट करावे लागतात, खूप काही वर्षानु वर्ष पेरावं लागतं, सोप्प नाही ते. त्यामुळे तिचे अहो आणि बाबा ह्या तिच्या आनंदात सामील होण्याकरता आले. पण मोकळ्या हाताने नाही हो, तर एक प्रचंड मोठा गुलाबाचा / पुष्पगुच्छ घेऊनच. पुष्पगुच्छाची कमाल? का कमालीचा पुष्पगुच्छ? हे माहित नाही पण वास्तुपुरुष ह्या कृतीने नक्कीच प्रचंड खुश झाले असणार असा अनोखा आनंदाचा क्षण अनुभवयाला मिळाला म्हणून. नवीन मजल्यावर अजून कशी वेगळी वास्तुशांती व्हायला हवी हो?. "असे डा येति आणिक स्मृती ठेवुनी जाती".

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...