काही दिवसांपूर्वीची गोष्ट. सहज आठवणी निघाल्या आणि मी माझ्या लेकीला एका जगावेगळ्या मुगडाळीच्या खिरीबद्दल सांगितलं. TCS चं एक उटीला पर्यटक निवास आहे, त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी खास. तेथे एक खानसामा आहे. त्याच्या हातची मूग डाळीची खीर नाही खाल्ली तर आयुष्यात काय खाल्लं? असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर ती कथा संपायच्या आत मॅडम तय्यार एका पायावर, आत्ता करूया ती खीर, म्हणून मागे लागली. मग काय पडत्या फळाची आज्ञा मी पण उत्साहाने मदतीला लागले, झाली खीर तय्यार आणि फस्त पण झाली लगेच. ती खीर फ्रिज मधे ठेवली होती थंड होण्या करता आणि बाबांना ऑफिस मधून आल्यावर गार मिळावी म्हणून. जेव्हा मी ती खीर वाढायला बाहेर काढली तेव्हा तिच्या कडे बघून, फक्त बघून, तिचं रूप, रंग, एकंदरीत दिखावा पाहिल्यावर तिसऱ्या माणसाला सांगता येणं अतिशय अवघड आहे कि हे नक्की काय आहे. चव घेतल्यावर निश्चित समजेल पण नुसतं बघितलं तर कदाचित रबडी वाटेल, गव्हाची खीर असेल असं भासेल, नरसोबावाडीची प्रसिद्ध बासुंदी असं दिसेल, किंवा तांदळाची गुळ घालून केलेली खीर ई. कारण सगळ्याच खिरी दाट असतात, गुळ + दूध ई. गोळाबेरीज म्हणजे साधारण सारखाच रंग येतो आणि त्यामुळे असं होऊ शकतं. प्रत्येक खीर अतिशय पौष्टिक आहे, घरी केली म्हणजे नक्कीच, गुळ घातला आहे म्हणजे सोन्याहून पिवळे, आणि आईचा मायेचा मसाला मग काय हवं. त्यामुळे एखाद्या खवैयाला कदाचित सगळ्याच खिरी सारख्या दिसतील, भासतील आणि हव्या हव्याश्या वाटतील. अगदी जसे आपले असंख्य मित्र-मैत्रिणी. प्रत्येकालाच बहुतांशी लहानपणीपासून, शाळा कॉलेज, नोकरी, शेजारी, गल्ली, हे-ते प्रकारचे मित्र असतातच. पण खोलात शिरल्याशिवाय समजत नाही, उमगत नाही कि कुठला नक्की मित्र आहे ते, अगदी जसे खीर चाखल्याशिवाय घटक पदार्थ कळत नाहीत अगदी तसे. त्यामुळे प्रत्येकाला मैत्रीचं लेबल नको मंडळी. जरा दमानं. फक्त बघून निर्णय नकोच. निरखून बघा, स्वाद घ्या, चव चाखा, फक्त रंग रूपावर जाऊच नका, फिदा होऊ नका, वाहत जाऊ नका उगाचच. प्रत्येक खीर दिसायला सारखी, स्वादीष्ट आणि पौष्टिक असली, प्रत्येक मित्र जरी फारच आवश्यक असला, भासला, दिसला तरी "ताक पण फुंकुनच प्यायलेलं बरं", नाही का?
ऋतू बघा, वेळ काळ बघा, कोणी केली आहे ती खीर ते बघा, भूक आहे का ते तपासा, आहे पुढ्यात म्हणून प्रत्येक वेळी फस्त नको करायला. मित्रांना देखील चाचपडावं हि माझी संपूर्ण लहान थोर व्यक्तींना नम्र विनंती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा