माझी दोघ जेव्हा ३-४ वर्षांची होती तेव्हा पासून मोठी होईस्तोवर ते घरातल्या प्रत्येक खोलीत पसारा मांडून मनापासून मनसोक्त खेळायचे, बागडायचे. कुठलीही म्हणजे कुठलीही जागा त्यांनी कधीच सोडली नाही, अगदी ओटा सुद्धा नाही. त्यांचा सगळा संसार एक एक करून ओट्यावर चढवायचा मग प्रत्येक ड्रॉवर च्या हॅन्डल ला पायरी म्हणून वापरून ओट्यावर बस्तान बसवत असतं. क्या बात है? तो नजारा इतका अप्रतीम असायचा कि ते वर्णन करण्या पल्याड आहे. मी ते असंख्य वेळा अनुभवलं आहे आणि माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले आहे. कित्ती गोड दिसायचे दोघे ओट्यावर त्यांच्या संपूर्ण परिवारासोबत अहाहा च. त्यात त्यांच्या छोट्या खुर्च्या, त्यांची मित्रमंडळी, खेळणी, सॉफ्ट टॉईज आणि बरेच असे काही. ते सगळं बघतांना मला माझं लहानपण आठवायचं. खास करून जेव्हा आई ओल्या नारळाच्या वड्या करायला घ्यायची तेव्हा माझी स्वारी ओट्यावरच स्थानापन्न असायची, वाटी चमचा घेऊन. नारळाच्या वाड्यांच्या प्रत्येक टप्प्याची चव घेणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार होता जणू. "झालं का?" "कधी होणार?" "कित्ती वेळ?" असे प्रश्न विचारून विचारून "दे ना थोडं" "अजून थोडं" असं म्हणत म्हणत माझ्या भल्यामोठ्या पोटात इतकं सामावून जायचं, कि पोट भरायचं नाहीच. इतक्या चविष्ट असायच्या त्या वड्या आणि त्याचे करण्याचे टप्पे, अहाहा.
आज पुन्हा एकदा मी माझं लहानपण अनुभवलं. माझ्या लेकाला भेटायला जायचं ठरतंय आमचं. त्यासाठी किंवा त्याच्या निमित्याने मस्त चिवडा केला. लाडू करण्याची प्रकर्षाने इच्छा होती, पण पायांमुळे इतका वेळ सगळं साग्रसंगीत भाजायला उभं राहणं होईल का नाही हि शंका होती मनात. फक्त भाजणं नाही तर पाक करायचा, वळायचे ई. अर्धवट राहायला नको, मग त्याच ओट्यावर बसलेली माझी लेकरं डोळ्यासमोर उभी ठाकली आणि हा हा म्हणता लाडू झाले देखील, तय्यार. वा म्हणजे वा च. मस्त पैकी वर्तमान पत्र अंथरलं ओट्यावर, सगळी सामग्री घेतली, जवळ फोन ठेवून घेतला, छोटेखानी खुर्ची घेतली आणि "जय श्रीराम", चढून ठाण मांडून बसले ओट्यावर. मस्त मज्जेत सगळं आठवत आठवत यथेच्छ भाजलं, पाक केला, वळले लाडू आणि लेकीला चाखायला दिले देखील. कोण म्हणत लहानपण पुन्हा एकदा अनुभवता येत नाही म्हणून? मला फक्त माझ्या मुलांचंच नाही तर आज चक्क माझं लहानपण देखील पुन्हा एकदा अनुभवता आलं. ओटा पण शाबूत राहिला बरं का मंडळी. "लहानपण देगा देवा..." क्या बात है ह्या वाक्यात. खरंच. म्हणजे माझ्या लहानपणी मी कितपत ओट्यावर बसणं एन्जॉय केलं होतं ते मला स्मरत नाही, पण आजचं नेहेमी करता लक्षात राहणारच.
माझ्या पाय दुखीवर आता मला मिळालेला एक पर्याय आहे, छोटासा. आगे आगे देखो होता है क्या? आता मागे वळून बघणे नाहीच. माझ्या आवडीचे, माझ्या आवडीसाठी आता खूप पदार्थ करण्याचा मानस आहे. आमेन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा