आमचा छोटेखानी फ्लॅट वय वर्ष १६, आमचं त्यात अनेक वर्ष वास्तव आणि त्यानंतर दोन भाडेकरू त्यामुळे त्याचं रंगरूप पालटणे अत्यावश्यक होते. वास्तविक स्थिती हि जाणवली कि १. छोटेखानी जागा असल्यामुळे त्याला अजून मोकळं कसं करता येईल? २. डायनींग टेबल, भले मोठे पलंग नेहेमी जागा व्यापणारेच असले पाहिजे असं कुठे लिहिलं आहे? ३. मुंबईची पद्धत अंगीकारली तर? ह्या सर्वांचा आणि इतर काही बाबींचा विचार करून माझ्या ह्यांनी भिंतीवरचे डायनींग टेबल आणि पलंग करण्याचा निश्चय केला आणि तसं केलं सुद्धा. त्यामुळे पसारा होत नाही टेबल आणि पलंगावर आणि खोली मोकळी दिसते ते वेगळंच. आमच्याकडे काम करणाऱ्या मावशी आता आमच्या घरच्या सदस्य झाल्या आहेत, कारण गेली अनेक वर्ष सातत्याने काम करत आहेत. त्यांना हे असं भिंतीवर पलंग जाऊ शकतो हे स्वप्नवत वाटत अजून देखील. आणि खूप सोयीचं असल्यामुळे खूप उत्साह देखील असतो, त्यांना सरकावायचा असतो पलंग भिंतीवर. दर दिवशी सकाळी फक्त एकच प्रश्न विचारतात "खाट उचलू?". मला तरी खाट हा शब्द प्रचलित असल्यामुळे काही वाटलं नाही आणि अर्थात खूप मज्जा आली पण ह्यांना आणि माझ्या लेकरांना तो शब्द माहित नसल्यामुळे काहीच प्रतिउत्तर देता येत नाही, किंबहुना काय द्यावं हे समजत नाही. मला मज्जा ह्या साठी येते कारण:
- १. खाट कुठे आणि हा अत्याधुनिक भिंतीवर चढणारा पलंग
- २. खाट साधारण खेड्यात, अंगणात ठेवलेला पलंग
- ३. खाट सुतळीने तर वॉल माऊंटेड बेड हैड्रॉलिक पद्धतीने तय्यार केलेला
- ४. खाट कदाचित खूप जुन्या जमान्यातील आणि हा पलंग अत्याधुनिक
- ५. खाट स्वस्त आणि मस्त, हा पलंग अतिशय महाग, मस्त आणि बहुउपयोगी, नावीन्याने भरपूर
कुठलीही खरं तुलना नाहीच, पण वर्षानुवर्षे मावशींना तोंडात बसलेला शब्द, त्यांना त्या पल्याड काही दिसत नाही माहिती तर नाहीच नाही. खाट उचलून भिंतीशी ठेवतात, अगदी तस्सा हा पलंग, खाट उचलून ठेवल्यामुळे जागाच जागा होते, अगदी तसे ह्या पलंगामुळे घडते, खाट उचलणं जसं सोप्प अगदी तसे ह्याचे देखील ई.
मला दोन्ही शब्द आणि वस्तू माहित असल्यामुळे, वापरल्या असल्यामुळे असेल मला जबरदस्त मज्जा येते, अगदी दररोज.
मावशींचा प्रश्न यायच्या आधीच जर मी सगळं आवरलं तरी देखील म्हणतात कश्या "आज खाट लवकर सावरली".
ती खाट काही माझी पाठ सोडत नाही हेच निश्चित आणि खाटेशिवाय माझा दिवस सुरु होत नाही हे पक्के.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा