बुधवार, ८ फेब्रुवारी, २०२३

गरमागरम कोशिंबीर

तर त्याचं असं झालं कि माझ्या कडे स्वयंपाकाचं काम करणारी मावशी हि एक अनोखं रसायन आहे. ती कधी तरी पुण्यात आणि माझ्या स्वयंपाक घरात असते, नाही तर जग हिंडून येते, कुठेही असते, तिचा तिलाच पत्ता नसतो ती त्या वेळी कुठे असते ते. मला आताशा समजायला लागलंय त्यामुळे मी तिला परत आणण्याचा अथक प्रयत्न करते, कधी सफल होते कधी असफल. आजचीच गोष्ट घ्या. आज मॅडम ना एका मुंजीचं आमंत्रण होतं. ती ज्यांच्याकडे कामाला आहे त्यांच्या लेकाची मुंज आहे. मॅडम आधीच पोचल्या देखील मुंजीत, ती सुरु व्हायच्या आधीच, माझ्या स्वयंपाक घरात उभ्या उभ्या. अश्या वेळी मग मॅडम ची गती कमी होते, पसारा मस्त होतो, सुचत नाही ई. आज माझी संपूर्ण तय्यारी झाली कचेरीला जायची तरी देखील कणीक पण कोरड्याच स्वरूपात पसरलेली होती. म्हटलं आज माझं काही खरं नाहीच. सरते शेवटी माझ्या पुढ्यात झक्कास काही तरी देण्यात आलं न्याहारी म्हणून. सेवन करते वेळी मला खूप म्हणजे खूपच मज्जा आली, ना भूतो ना भविष्यती अशी. मला कच्च काहीच खूप आवडत नाही खायला जसे कि सलाड, कोशिंबीर ई. आणि त्यात माझी आहारतज्ञ सातत्याने मागे लागलेली असते असं खा तसं खा वगैरे. आज पोटभर मी सलाड अक्का एका वेगळ्या प्रकारची कोशिंबीर अत्यंत आवडीने फस्त केली कारण ती गरम होती, त्यात मसाले होते आणि मला घाई झाली होती, भूक पण लागली होती. 

आज माझ्या आहारतज्ञानुसार मला सगळ्या भाज्यांचा साग्रसंगीत पराठा खायचा होता. सगळ्या भाज्या एकत्र मस्त किसून, त्यात लागतील ते मसाले पेरून, भरून आणि त्या  भरण भरलेल्या पराठ्याला तापलेला तवा दाखवून मग माझ्या पानात दिला गेला. मॅडमना घाई, त्यात मुंजीची सनई-चौघडे-वाजंत्री ई. कानावर पडत असल्यामुळे आज कणकेला जास्त चटके लागू दिले नाहीत. मी पण चिडी चूप कारण मला मॅडमची सद्यस्थिती माहिती होती. आणि अर्थात मला काही तरी भन्नाट नवीन आयतं खायला मिळालं होतं. काही हरकत नाही, ह्या अनुकथेबद्दल विचार करता करता ती गरमागरम कोशिंबीर अक्का सलाड वेगळ्या स्वरूपातली कधी पोटात गेली समजलं देखील नाही. 

त्यामुळे मंडळी अश्या प्रसंगी अत्यानंदाने वेळ निभावून नेणे जास्त सोयीचे, बोलून किंवा चिडून नव्हे नाही का? चला तर मग सगळ्याचं क्षणाचा आनंद उपभोगुयात नेहेमीच. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...