मी आता अनेक वर्ष अगदी लहानपणापासून सहशिक्षण असलेल्या शाळेत प्रशिक्षण घेतले. त्यानंतर महाविद्यालयत देखील तेच, नोकरी करते वेळी देखील मुलं, मुली, माणसं, बायका वैविध्य स्तरावरच्या ई. सर्वांशी मिळून मिसळून कामं केलं, गेली अनेक वर्ष, भारतात, भारताबाहेर, बऱ्याच ठिकाणी. माणसांची सहज बोलण्याची पद्धत असते घरी गेले कि मुलं कावकाव करतात, कित्ती काम असतात ई. आता मला हे अंगवळणी पडलं आहे. बऱ्याचदा मी मग माझा स्वर काढते आणि त्यांना ठणकावून सांगते कि आम्हाला पण भरपूर कामं असतात. घरी काम करणाऱ्या बायका असल्या तरी त्यांच्या कडून काम करून घेणं हेच एक भलं मोठं काम आहे. आला-गेला, पै-पाहुणा, सण -वार, मुलं - बाळं ई. सगळीकडे बघावंच लागतं भारतीय पद्धतीनुसार. कोणत्याही स्तरावरच्या स्त्रीला हे सुटलं नाहीच. हो बऱ्याचदा बायका कूटकूट / कुरकुर सातत्याने करतात, किती कामं पडतात ह्याचे पाढे वाचतात, पण माणसं कुठेही कमी नाहीतच. इतकी वर्ष वैविध्य भागातले लोक बघून हे समजलं आहे कि माणसांचे गॉसिप / गुजवार्ता / चर्चा करण्याची पद्धत, विषय हे किंचित वेगळे असतात पण प्रचंड प्रमाणात ते देखील करतात. ह्या सगळ्यांची आता पोटभर सवय झाली आहे.
आज असाच एक नवीन व्यक्ती सुरु झाला फोन वर, घरी गेल्यावर कामं ई. मला वाटलं ते नेहेमी सारखे / प्रत्येकासारखे बोलायचं म्हणून बोलताहेत. स्वप्नात / कल्पनेत देखील मी कधीच हे पाहू शकत नाही कि कोणाची सहचारिणी त्यांना सोडून गेली आहे ते. पण त्यांच्या बाबतीत म्हणे खूप काही घडून गेलं. लग्नानंतर दोन मुली झाल्या आणि काही वर्षातच त्यांची अर्धांगिनी त्यांना सोडून कायमची ह्या जगातून निघून गेली. आता हेच दुहेरी भुमिका निभावत आहेत. त्यामुळे एका आई सारखे पदर खोचून त्यांना ताबडतोब कामाला जुंपावं लागतंच. मला खूप लाजल्यासारखं झालं, माझ्या हातून नकळत खूप मोठी घोडचूक घडली होती. मी त्यांना सहज बोलून गेले "घरी गेल्यावर आम्हा स्त्री वर्गाला कित्ती कामं असतात ह्याची तुम्हाला काय कल्पना?" असं. त्यावर त्यांनी दिलेली माहिती मुळे माझ्या पोटात भाला मोठा गोळा आला.
बोलतांना भान ठेवलं पाहिजे हे पुन्हा एकदा मला प्रकर्षाने जाणवलं. मी ह्या पुढे सावध राहील हे निश्चित. माझ्या हातून कोणाला फायदा नाही झाला तरी चालेल पण नुकसान व्हायला अजिबात नकोच, मग ते कुठल्याही स्तरावरचं का असेना. इथे भावनिक ठेच पोचली आहे हे निश्चित. आधीच ते आपल्या व्यापात गढलेले आणि त्यात मी भर घातली उगाचच. कितीही माफी मागितली तरी वापरलेला शब्द परत येणे नाही. प्रत्येकाच्या डोक्यावरचे आभाळ अगदी वेगळे असते हे नक्कीच, भले हि आपल्याला सगळे सारखेच दिसते / भासते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा