गेल्या काही वर्षांपासून दूरदर्शन, इंटरनेट, जाहिराती आणि इतर अनेक माध्यमातून बऱ्याच गोष्टी डोळ्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत. नको तितक्या गोष्टी माहिती होत आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीच.
पाश्चात्य संस्कृती म्हणा किंवा अजून काही काळानुरूप घडलेला बदल, पण पुष्कळश्या जाहिरातीत, माध्यमांमध्ये भारतीय पुरुष / वडिल घरची कामे करतांना दाखवली जातात आणि तश्या जाहिराती, माहितीपट ई. सर्वजण आवर्जून बघतातच. न बघणं शक्यच नाही कारण आताशा सर्वत्र झालंय ते, मग कुठलाही वयोगट असो, अगदी छोट्या कळत्या लहान मुलांपासून, मध्यम वयाच्या आणि म्हाताऱ्या पुरुषांपर्यंत सर्वजण अत्यानंदाने घरची कामे करतांना दाखवली जातात आणि हे सत्य असावं नाहीतर जुन्या जमान्यासारखं एकट्या मुलीला, बाईला नोकरी करून घरचं करणं जरा अवघडच.
त्यात भरीस भर म्हणजे ह्याच जाहिराती किंवा वैविध्य पदार्थ शिकवणारे कार्यक्रम ज्यात सातत्याने वापरला जाणारा शब्द म्हणजे "अगदी हॉटेल ची चव". मला अजून तरी हे समजलं आणि उमगलं नाही कि घरी कशाला हवी आहे हॉटेल ची चव आणि मुळात तुलना का? नाहीच होऊ शकत. असो, पण असंख्य पद्धतीने, सगळ्या भाषांमधे सध्या सगळ्या पाककृती उपलब्ध आहेतच. करणाऱ्यांनी सरळ सोप्प्या पद्धती सुद्धा सांगितल्या आहेत त्यात, अभ्यासपूर्वक.
ह्या व्यतिरिक्त सहज सहल म्हणून, किंवा कचेरीच्या कामानिमित्य असंख्य मंडळी परदेशात जात-येत असतात. काही चाकरमाने तर इतक्या ठिकाणी जाऊन, वास्तव्य करून, काम करून येतात कि बहुतांशी कुठलाही भला मोठा देश शिल्लक राहिला नसेल. आणि ह्या वाऱ्या सातत्याने होतात कारण ती गरज असते, तिथल्या लोकांना भेटण्याची, काम समजावून घेण्याची आणि केलेलं काम त्यांच्या सिस्टीम वर व्यवस्थित चालतंय का नाही हे बघण्याची.
अजून एक कंगोरा म्हणजे सर्वत्र, सर्व क्षेत्रात मुली अग्रगण्य आहेत, पुढे आहेत, प्रचंड काम करत आहेत फक्त भारतीय पुरुषांसोबत नाही तर जगभर. दररोज कचेरीत एकत्र सोबत काम करतांना देखील बऱ्याच गोष्टींची जाणीव नक्की होत असणार, असावी.
मग इतकं सगळं असतांना, स्वतःला अत्यंत जगावेगळे हुशार समजत असलेल्यांना एक प्रश्न आहे माझा, "सुट्टीच्या दिवशी तरी निदान स्वतःला खायला लागतं म्हणून, बदल म्हणून, मदत म्हणून किंवा अजून काही कारणांमुळे असं कधीच वाटत नाही कि आपण एखादा पदार्थ करावा, घर आवरावे ई. स्वतःहून, सरप्राईझ म्ह्णून, गम्मत म्हणून, काय हरकत आहे?" हे सोडून बाकी संवेदना कश्या काय जाग्या असतात कुणास ठाऊक. अर्थात काही मंडळी करतात सातत्याने घरी मदत, किंवा घरचं काम अत्यानंदाने मदत म्हणून नाही तर कर्तव्य म्हणून, मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून, पण अजून खूप मोठा निष्क्रिय वर्ग आहे, ज्यांनी त्यांच्या स्वतः साठी तरी स्वतःहून सातत्याने आपल्या घरचा आपला हिस्सा उचललाच पाहिजे, न सांगता, २०२३ मधे तरी. काय म्हणतात त्याला "फायर इन द बेली" असं काहीसं, नुसतं हाडं टाकून बसणं कसं काय शक्य होतं. मुलींसारखी (ज्या घरी काम करतात, किंवा ज्यांना काम करणं आवडतं) सुटीच्या दोन दिवस आधीच डोक्यात आराखडा मांडणं सुरु होऊन जातं, उत्साह असतो, हे करू ते करू, कारण बाकी दिवशी कचेरीच्या कामाचा भार त्यामुळे घरची, हातची चव, समाधान, आनंद ई. कुठे तरी लोप पावलं असं वाटतं म्हणून धडपड नुसती. "न्यू नॉर्मल" दिवस येऊन गेलेत, घरच्या पदार्थांची, घरच्यांची किंमत समजली आहे, पाश्चात्य संस्कृती भावते मग चला उठा आणि धम्माल करा. घरची कामं करा, व्यायाम म्हणून तरी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा