आमच्या घरी काम करणाऱ्या मावशी गेली कित्येक वर्षे आमच्या सोबत आहेत. म्हणायला फक्त मावशी पण घरच्या सारख्याच आहेत, अगदी कुटुंब सदस्य जणू. त्या स्वतः पणजी आजी आहेत. अर्थात वय जास्त नाही कारण त्यांच्याकडे त्यांचं, त्यांच्या मुलींचं आणि नातींचं लग्न फारच लवकर उरकल्यामुळे त्या पट्टाकिनी पणजी आजीच्या गादीवर विराजमान झाल्यात.
पणजी आज्जी असल्या, मावशी असल्या, खूप कमी कमवत असल्या तरी त्यांचा उत्साह शिगेला पोचलेला असतो नेहेमीच, कधीच कुठंही कमी नाहीच. बारीक लक्ष असतं सर्वत्र, आधी माझ्या सासूबाई म्हणून मिरवत होत्या त्याच्या आई कधी झाल्या हे त्यांना आणि मला कधीच उमगलं नाही. अत्यंत हुशार, व्यवहारी, आणि दिलदार व्यक्तिमत्व. ठरावीक पैसे कमावतात, त्यांचे त्यांचे खर्च असतात तरी देखील दिलखुलास खर्च करून माझ्या साठी, माझ्या पिल्लांसाठी काही ना काही तरी सतत आणणार म्हणजे आणणारच. व्हाट्सअप अत्यंत पराकोटीच्या शिताफीने तर वापरतातच शिवाय फोन करणे, व्हिडीओ कॉल करणे, कुणाचे नंबर कुठल्या नावाने फोन मधे स्टोर केले आहेत हे लक्षात ठेवणे, फोन नंबर फोटोने शोधून काढणे आणि मग फोन लावणे, त्या करता फोटो काढणे, फोन मधे सेव्ह करणे आणि तो नंबर ला बरोबर चिटकवणे, अहाहा च, यादी भली मोठी आहे. आणि हे सगळं शाळा नावाची इमारत न बघितलेल्या मावशी करतात. देवाची गाणी लावतात काम करतांना, मला ऐकवतात शोधून प्ले करतात, तसेच व्हिडिओ चे देखील. बाप रे.
बारीक लक्ष आणि तल्लख बुद्धी ची देणगी, सतत शिकलेल्या इंग्लिश मधे बोलणाऱ्या कुटुंबीयांकडे काम करत असल्यामुळे परवा म्हणतात कश्या "मुलांचा वाढदिवस येतोय, कधी आहे ते सांगा, विश करावं लागेल ना". विश हा शब्द बरोबर कसा काय आठवला, कुणास ठाऊक, कमाल आहे, खूप शिकण्यासारखं आहे. आज सकाळी फराळाचं दिलं त्यांना आणि म्हटलं कि मला जिभेला सर्दी मुळे चव नाही आहे, कसं झालंय ते सांगा, तर म्हणतात कश्या टेस्टी. कॉल, व्हिडिओ कॉल, ट्यांनटाइन डे (व्हॅलेन्टिन डे), ओला, उबेर, लक्झरी (बस), चार्जर, यू ट्यूब, पॅक (मोबाईल डेटा), जी पे, ... ... ... बाप रे बाप भली मोठी यादी आहे मावशींना माहित असलेल्या शब्दांची. अर्थात हे सर्वांचेच रोजच्याच वापराचे जरी शब्द असेल तरी अशिक्षित व्यक्तीने ते लक्षात ठेऊन हवे तिथे हवे तेव्हा उत्कृष्ट पद्धतीने वापरणे म्हणजे महद आश्चर्य आहे माझ्या दृष्टीने.
ह्या मावशी माझ्या इतक्या जवळून संपर्कात आल्या म्हणून मला त्यांचे इतके सगळे गूण समजले. अजून असंख्य असे जेष्ठ नागरिक आहेत जे सातत्याने खूप काही भव्य-दिव्य करत असतात आणि काही रडत असतात, काहीही कारण नसतांना.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा