झ्यामते मला जे साधारणतः आठवतं ते २००५ पासून वगैरे मी एक जाहिरात बघते आहे वर्तमानपत्रात एका चेहेऱ्याच्या क्रिम ची. अगदी भक्तिभावाने दिलेली असते ती जाहिरात. माझ्या दृष्टीने थोडासा वेगळा असा रंग असतो, एक ठराविक चेहेरा असतो आणि त्या क्रिमची ट्यूब. नाव पण जरासं वेगळंच आहे, जे खूप काही प्रचलित नाही, किंवा मी तरी २००५ ते २०२३ पर्यंत कुठेही दिसेल अश्या ठिकाणी दुकानात ते क्रिम बघितले नाही. असो. ती जाहिरात आतल्या पानात आणि छोटेखानी असायची. २००५ ते आज पर्यंत एक मात्र आहे कि ती जाहिरात असतेच, सातत्याने. ह्याचा ढोबळ मानाने अर्थ असा कि कोणीतरी वापरतं आहे ते क्रीम आणि त्याचा फायदा पण होत आहे लोकांना. हळूहळू माझ्या हे निदर्शनास आलं कि त्या जाहिरातीची जागा बदलते आहे, हळूहळू ती पुढील पानांवर प्रकाशित होऊ लागली, अगदी तोच मथळा, तोच चेहेरा, बदल काहीही नाही, पण जागा बदल मात्र प्रकर्षांने जाणवला मला. आणि ह्या रविवारी तर कहरच झाला. मी काही महत्वाचं काम होतं म्हणून कचेरीत आले होते, घरी गेल्यावर वर्तमानपत्र हातात घेतलं वाचायला तर उडालेच जणू. संपूर्ण पानभर जाहिरात त्याच क्रिमची आणि तीच, फक्त स्वरूप फारच भलं मोठं. माझी दाही बोटं तोंडात. २००७ साली मी एकदा माझ्या कचेरीच्या जाहिरातीचे काम बघितले होते तेव्हा लाखात मोजली होती किंमत आता तर ती गगनाला भिडली असेल. त्यात जाहिरात फक्त एक दिवस झळकणार, त्यासाठी इतका खर्च? देवा. भल्या मोठ्या ब्रॅण्डच्या क्रिम ची जाहिरात अशी मोठी आणि साध्या लोकल कंपनीची वेगळी, नाही का? खूप प्रश्न उत्पन्न झाले डोक्यात, हा इतका मोठा खर्च कंपनी काही काय वसूल करणार? खरंच खप असेल का इतका? काय विचार केला असेल कंपनीने? असं पाऊल उचलायचं म्हणजे? इतकी वर्ष सातत्याने एकच जाहिरात देऊन देखील जर तो जिन्नस खपत असेल तर नक्कीच वापरून बघायला हवा. ई.
ह्यातून बोध एकच, प्रत्येकवेळा मोठाच ब्रँड हवा असं काही नाही, हळूहळू कासवाच्या गतीने लोकल ब्रँड देखील वेगळी मोठी उंची गाठू शकतो. मेहेनत घ्यावी लागते आणि खूप शांतपणे सगळं सातत्य टिकवून ठेवावं लागतं एवढंच.
माझे बहुतांशी विद्यार्थी, किंवा हि नवीन पिढी फक्त जगप्रसिद्ध कंपनी मधेच काम करायचं असा हट्ट धरून बसते. काही जण त्या करता लागणारी प्रचंड मेहेनत करतात, स्वतःला सिद्ध करतात आणि मोठ्या कंपनीत काम मिळवतात देखील. पण ते फार थोड्या प्रमाणात. मोठी स्वप्न बघावीत पण छोटी बघणारे पण तितकेच महत्वाचे असतात हे ध्यानात ठेवूनच. माझ्या हे देखील निदर्शनास आलं आहे इतक्या वर्षात कि फक्त विद्यार्थी नाहीत तर एकंदरीत समाजात वावरायचं म्हणजे प्रतिष्ठा आणि त्या करता सगळं म्हणजे सगळं साग्रसंगीत उत्कृष्टच हवं, मोठी नावाजलेली कंपनीत नोकरी, भली मोठी जगप्रसिद्ध कंपनीची गाडी आणि इतर अनेक. उत्कृष्ट ची व्याख्या प्रत्येकाची प्रत्येकाने ठरवावी नाही का? तुम्ही ज्यांना मदत करता पुढे जायला, मोठं व्हायला आणि सर्वतोपरी त्यांना च फक्त तुम्ही काही म्हणू शकता पण इतरांना नाहीच, तुमचं हक्क नाहीच. स्वतःच स्वतः बघा, सांभाळा आणि वाढावा, जसं ह्या छोटेखानी कंपनीने करून दाखवलं. मला अजून खूप जाणून घ्यायची इच्छा आहे ह्या क्रिम बद्दल आणि अर्थात एकंदरीत ह्या कंपनी बद्दल देखील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा