मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०२३

सदाची उपस्थिती

माझ्या मते २०१९ पर्यंत च्या काळात पाच वाजता संध्याकाळी कचेरी बंद होत असे. उरलेलं कामकाज मग दुसऱ्या दिवशीच. अर्थात हे एक उदाहरण दिलं मी. माझं म्हणणं एवढंच कि कचेरीची एक ठराविक वेळ होती, काही तासांची आखलेली, एक मस्त शिस्त होती प्रत्येक क्षेत्रानुसार. त्यामुळे घरच्या गृहिणीला देखील असंख्य दगडांवरची कसरत वेळेनुसार जमवता येत असे. तिची रोजनिशी, वेळापत्रक तसे ठरवता येत असे. संगणक, तंत्रज्ञान आणि सोशल मिडिया / समाजमाध्यमांचा सुकाळ झाल्यापासून, न्यू नॉर्मल दिवस आल्यापासून खूपच बदल घडले आहेत आणि ते टिकले आहेत. का  कुणास ठाऊक पण  सध्या असं भासतंय कि कामांना अंतच नाही आहे. अगदी त्या छोट्याश्या मोबाईल नामक वस्तूवर सगळे आपले सतत तय्यार. कोणीही कुठलीही बातमी टाकली, मेल केला कि ताबडतोब उत्तर हजर, क्षणात ती बातमी असंख्य लोकांपर्यंत पोचलेली असते. 

मी परवाच एका ठिकाणी वाचलं कि "मी माझ्या सोयीच्या वेळेनुसार मेल अथवा मेसेज पाठवतो आहे. ह्याचा अर्थ दुसऱ्याने ताबडतोब त्याला उत्तर दिलेच पाहिजे असं नाही, वाचणाऱ्याने त्यांना सोयीचं आहे त्यावेळी उत्तर द्यावे". इतकं सोप्प आहे. अर्थात जे अती महत्वाचं आहे त्याला कोणीही उत्तर देणारंच किंवा त्यावर कृती करणारंच, हे तर निश्चित आहेच. 

मग संध्याकाळ ची वेळ,  घरी पिल्लू आणि आई खूप तासाने घरी दिसलेली, स्वयंपाक, जेवण, अभ्यास, आराम ई. करण्या शिवाय आईच नाही तर घरचे सगळेच कुटुंबीय रंगलेत लाईक करण्यात अगदी मग्न होऊन. काही मिनिटाने, काही तासाने किंवा एक दिवसानंतर जर उत्तर दिले, फॉरवर्ड केले, लाईक केले तर काहीही म्हणजे काहीही बिघडत नाही, बिघडणार नाहीच.  त्यात काही वावगं नाही चुकीचं नाही पण का? इतकी घाई? टाकणाऱ्याने बातमी / पोस्ट टाकली, एक शिस्त, एक वेळ ठरवून त्यावर वक्तव्य करा, ताबडतोब नाही. कचेरीची कामे कचेरीत किंवा कधीतरी घरी आल्यावर करा, नेहेमीच नाही. शांत राहणे शिका, शांत राहायला / संयम बाळगायला शिका आणि  शिकवा. मानवाने तय्यार केलेली यंत्र पण थकतात मग मानव का नाही थकणार? प्रत्येकाला विश्रांती आणि बदल हवाच. आपल्यावर अवलंबून असणारे वाट बघत बसतात त्यांना लागणार वेळ द्यायलाच हवा. स्वतःला वेळ, घराला वेळ द्यायलाच हवा वेळच्या वेळी, वेळ निघून गेल्यावर नाही. जागे व्हा. यंत्र तुमच्या मदतीसाठी आहेत फक्त. आहारी जाऊ नका.  

हे सर्रास विस्मृतीत जातंय कि आपल्या नंतरची पिढी तेच शिकते आहे, सातत्याने उपस्थित राहायचंय. ताबडतोब उत्तर नाही दिल पोस्ट ला तर कदाचित गैरसमज होईल ई. गरजे पुरतं तंत्रज्ञानाचा वापर करा. घरच्या जेष्ठांना वेळ द्या, आतुरतेने वाट बघत असतील ते तुमची. उद्या तुम्हाला पण अशीच माणसांची गरज भासणार आहे, पेराल ते उगवेल मंडळी. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...