काही महिन्यांपासून खास विशेष लक्ष वेधून घेणारं असं घडलंय माझ्या बाबतीत. रस्त्यावर येता जाता तय्यार कपडे विकणारी बरीच दुकाने आहेत. दुकाने नेहेमीच रस्त्याच्या कडेला असतात म्हणजे गिऱ्हाईक सहज येऊ शकते आणि दुकान हे रस्त्याच्या कडेलाच असावं, मौक्याच्या ठिकाणी धंदा मस्त होण्यासाठी. त्या दुकानांच्या समोर पुतळे उभे ठाकलेले असतात. ज्या पद्धतीचे दुकान आहे, ज्या प्रकारचे कपडे विकत आहेत त्या पद्धतीचे पुतळे. आधी साधे, सरळ, योग्य आकाराचे पुतळे उभारायचे दुकानदार. किंबहुना लहान-सहान दुकानदार तर पुतळ्यांवर सहसा खर्च करतांना दिसतं नव्हते. पुतळे हि प्रकर्षाने भले मोठे दुकान, मॉल ई. नी उपभोगायची संस्कृती. पुतळ्यांनी परिधान केलेलं म्हणजे सगळ्यात खास पोशाख / नग. हे चित्र हळूहळू पालटलं आणि सर्रास सर्वत्र पुतळे दृष्टीस पडू लागले. त्या नंतर दुकानाबाहेर अगदी रस्त्यावर मांडू लागले दुकानदार हे पुतळे. पुतळ्यांचे असंख्य प्रकार, आकार मग अनुभवायला मिळाले, अर्धे, पूर्ण, डोकं असलेले, नसलेले, बसलेले, टेकलेले आणि इतर बरेच असे. बहुतांशी पुतळे हे टक्कल असलेले होते कारण पुतळ्यांना घातलेले कपडे जास्त महत्वाचे होते. माणसाने विकत घेण्याआधी अंगावर कसे दिसतील ह्याची पुसटशी कल्पना यावी म्हणून हे पुतळे. मग केसांचा टोप चढवला गेला पुतळ्यांना, काहींना तर पगडी, टोपी, फेटा असे देखील सजवले गेले. आणि आताशा तर पुतळ्याच्या शरीराच्या वजनाएवढे किंबहुना किंचित जास्त वजनाचे, आकाराचे असे डोके असलेले पुतळे नजरेस पडत आहेत. भले मोठे डोके, त्यावर भला मोठा कृत्रिम केसांचा टोप असा चित्रविचित्र पुतळा निश्चित, अगदी प्रत्येक गल्लीबोळातल्या दुकानांसमोर उभा ठाकलेला असतोच आताशा. गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी, मार्केटिंग करण्यासाठी किंवा लक्ष वेधण्यासाठी असेल हि क्लुप्ती. पण जर प्रत्येक कापडाच्या दुकानांनी हे असं केलं तर नक्की ग्राहक जाणार कोठे? आणि खरंच ह्या मुळे ग्राहक जातो का दुकानात?
पुतळे हळू हळू कसे बदलले ह्याचे थोडक्यात मी येथे वर्णन केले. ह्या पुढे काय मला कल्पना देखील करवत नाही.
एकाने केले म्हणजे दुसऱ्याने केलेच पाहिजे असं नाही. पुतळ्यावर चांगला दिसला म्हणजे घेतलाच पाहिजे असं नाही. बाजारात नवीन आला आहे, फॅशन आहे, चित्रपटातल्या नायकाने घातला आहे म्हणून, विदेशी चित्रपटात किंवा दूरदर्शन वर बघण्यात आला म्हणून घेऊ नका. कापडाची पोत, आपला खिसा, गरज, शरीरयष्टी, प्रसंग ई. चा पिटुकला विचार करा आणि मग कृती. मोठ्ठं डोकं ३६५ दिवस ऊन-वारा-पाऊस कधीही उभा असतो, तो त्याचं काम करतो, तुम्ही तुमचं करा.
तुमच्या आर्थिक गुंतवणुकीची जशी प्रोफाइल असते, ज्यात वैविध्य ठिकाणी गुंतवणूक करून उभारली असते, तशी कपाटाची स्थिती असावी. काही कपडे मॉल मधून, काही ह्या-त्या ठिकाणांहून, काही घराशेजारच्या दुकानातून, काही जत्रेतून ई. उचलावे. वैविध्यता राहते / सांभाळली जाते, शिवाय सर्वांना कणभर मदत देखील होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा