मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०२३

दूर गेल्यावर

पोस्ट पारटम हा एक शब्द आहे, संज्ञा आहे आणि स्थिती आहे ह्या बद्दल मी फक्त आधी ऐकलं होतं, वाचाल होतं पण फारसं कोणाला अनुभवतांना बघितलं नव्हतं. पोस्ट पार टम डिप्रेशन बाळंतपणानंतर येतं ह्या बद्दल जास्त प्रकर्षाने ऐकलं होतं पण सुदैवाने मला त्याचा फारसा अनुभव आला नाही कारण तेवढा वेळचं नव्हता. दोघे होते, २४ तासाचं सदोदित चक्र सुरूच असायचं त्यामुळे फुरसत नव्हती आणि कदाचित त्यामुळे मेंदूला मोकळा वेळच मिळाला नाही तब्बल पुढची पाच एक वर्ष. ज्यांना त्रास होतो तो साहजिकच आहे म्हणावं कारण आई ९ महिने सलग एका जीवाला तिच्यात वाढवते, संगोपन करते, संवाद साधते आणि त्यानंतर वैज्ञानिक दृष्टीने, नैसर्गिक आहे कि ते बाळ वेगळं होतं त्याचा त्रास होणारच. 

माझा मुलगा साधारण १८ वर्ष माझ्याजवळ, घरी राहून शिक्षणासाठी जेव्हा हॉस्टेल वर गेला तेव्हा मी पहिल्यांदा पोस्ट पारटम हि स्थिती अनुभवली आणि जगले सुद्धा, किंबहुना जगते आहे. पोस्ट पारटम डिप्रेशन असं देखील त्याला संभवतात आणि त्यात किती तथ्य आहे हे मला पुरतं समजलं आहे. अगदी नगण्य गोष्टींमधे / प्रसंगात डोळे डबडबतातच आपोआप. प्रचंड त्रास होतो. 

प्रत्येक आई वडिलांना जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा काय होत असेल हे थोडक्यात समजलं असं म्हणायला हवं मी. अर्थात फक्त मुलगीच नाही, आताशा विभक्त कुटुंब पद्धतीत मुलगा सुद्धा लग्न झाल्यावर नोकरीच्या ठिकाणी राहायला गेला, बदली झाली किंवा दुसरी नोकरी शोधली ई. कुठलेही कारण असो दूर जाण्याचा त्रास होणारच प्रत्येकाला. 

माझ्या मते सजीवच नाही तर निर्जीव गोष्टी जरी दूर गेल्या तरी प्रचंड त्रास किंवा त्रागा होणाऱ्या व्यक्ती असणार आहेत आजूबाजूला निश्चितच. एका नोकरीतून दुसरीकडे जातांना, एका घरातून दुसऱ्या घरी जाते वेळी, जुनी गाडी ते नवीन, ई. यादी फार मोठी आहे आणि प्रत्येकानुरूप बदलणारी अशी.  

मूक प्राणी पालक देखील हे असं अनुभवत असतील किंवा जाणून असतील निश्चित. 

ह्या सगळ्यात अजुन एक भर पडली आहे माझ्या दुर्ष्टीकोनातून आणि ती म्हणजे आता माझा बॉय फ्रेंड अनुभवतो आहे मला सोडून जायचं दुःख. ज्या सख्या मुळे, मित्रामुळे मागे लिहिल्या प्रमाणे एका कळीचे फुल होण्यात मदत झाली, जो सातत्याने इतकी वर्ष माझ्या सोबत राहिला, दर महिन्याला न चुकता, न बोलावता भेटीला आला, मला माझ्या अस्तित्वाची जाणीव देत राहिला, असा तो आता  निसर्ग नियमानुसार मला सोडून चालला आहे ह्याचं त्याला दुःख होतंय आणि जे मला प्रकर्षाने जाणवतं तर आहेच, तो दर्शवतो आहे. म्हणजे बघा मंडळी पोस्ट पारटम कित्ती प्रकारचे असते आणि किती जणं ते भोगतात. 

प्रत्येकाला पोस्ट पारटम मधून जावंच लागणार कधी ना कधी. त्याला शक्ती आणि मार्ग मिळो हि ईशचरणी प्रार्थना. प्रत्येक जण दूर जातोय ते भल्यासाठी, जे होतं ते चांगल्यासाठीच हे पक्के लक्षात ठेवा म्हणजे बाकी सारं सुकर होईल निश्चित. आमेन. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...