माझी कन्यका अती उत्साहात नेहेमी प्रमाणे खरेदीला गेली. यथेच्छ खरेदी केली नेहेमी सारखी, घरी आली, संपूर्ण घर डोक्यावर घेत सगळं साग्रसंगीत दाखवलं, काय काय आणलं, कुठे कुठे गेली, कशी खरेदी केली, गर्दी किती होती, आधी काय आवडलं, काय काय आवडलं, आणि असे बरेच काही. बाप रे, लिहून मी दमले, हि मात्र इतके तास चालून, दुकानं पिंजून, खरेदी करून येऊन, इतंभूत वर्णन करून अजिबात दमली नाही. क्या बात है.
त्या नंतरचा टप्पा म्हणजे मग सगळं घालून दाखवलं. घालून दाखवलेला नवीन ड्रेस काढला तेव्हा एक माझ्या चार डोळ्यांना न दिसलेला डाग तिच्या नजरेस पडला. मग स्वारी थोडी नाराज झाली आणि तोंड पाडून मला आणून दाखवला तो डाग. तरी देखील मला तो काही स्पष्ट दिसला नाही, खरंच.
मी सहज म्हटलं "दाग अच्छे है". प्रश्नचिन्ह नजरेने माझ्या कडे बघितलं तेव्हा मी तिला समजावून सांगितलं. १. धुतल्यावर जाईल तो डाग, एवढासा तर आहे, २. नाहीच गेला तर? ज्यांना दिसेल आणि त्यांनी बोलून दाखवलं कि अरे तुझ्या ड्रेस वर डाग लागलाय तर तडक त्यांचा हात धरायचा आणि थेट दुकान गाठायचं, त्यांना नवा ड्रेस विकत घ्यायला लावायच, संपला विषय. त्यांच्या डोळ्यांना जर तुझ्या ड्रेस वरचा डाग आवडत नसेल, बघवत नसेल, काळजी वाटत असेल तर त्यांनी नवीन ड्रेस द्यायलाच हवा". हे सगळं ऐकून स्वारी खुश, विषय संपला. आणि मी माझाच हात उंच वर केला, मग तो कोपऱ्यात वाकवला / वळवला आणि माझ्याच पाठीवर थोपटल्यासारखं केलं. "दाग अच्छे है".
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा