माझ्या लहानपणीपासूनच अनुभवलेलं लिहायचा मला अधिकार आहे, त्या आधी काय होत होतं ते नकोच. तर मी नेहेमीच भल्या मोठ्या घरात वावरले. त्या वेळी गगनचुंबी इमारती असतात हे देखील मला ठाऊक नव्हतं. शहरात राहून सुद्धा बैठी घरं, बंगले त्या भोवती सुंदर फुललेला, सुगंधाने बहरलेला, सुशोभित, शानदार बगीचा. त्यात असंख्य फुलझाडं, फळांची झाडं, वेली, वृक्ष, भाज्या, दुर्वा, नक्की एखादं कडुलिंबाचं झाडं, आंब्याचं झाडं ई. लावलेले आणि जपलेले असायचेच. सगळंच घरी, हेच बाळकडू मिळालेलं. सर्वत्र हेच वातावरण आणि हिच प्रथा, एक सारखं सगळं आजूबाजूला, जमीन अस्मानाचा फरक नाहीच मुळी. त्यामुळे प्रत्येक धार्मिक कार्याला सगळं घरीच उपलब्ध असायचं, पत्री, फुलं, पानं, अगदी विड्याची पानं देखील. नसतीलच काही कारणांनी तर शेजार देखील बहरलेला आणि फुललेला. त्यात आई, आजी मंडळी घर उत्कृष्ट सांभाळणारी, त्यामुळे सगळं पुढच्या फाटकापासून ते मागच्या आंगणापर्यंत लखलखीत, सजलेलं, संभाळलेलं असंच. काहीच बघायला नको. प्रत्येक पूजा बहुतांशी घरचेच लोक करायचे, पण गुरुजी आलेच तर ते फक्त स्वतः यायचे, पूजा करायचे, दक्षिणा प्रसाद घेऊन निघून जायचे. आता फ्लॅट संस्कृती + घरची स्त्री उंबरा ओलांडलेली, त्यामुळे मग गुरुजी हा संदर्भ बदलला, पुरता बदलला. सगळे सामान गुरुजींनी आणणं जास्त सोयीस्कर झालं. आता यजमान फक्त बसतात तय्यार होऊन, बाकी सगळं गुरुजी घेऊन येतात. ३६० अंशाचा असावा हा बदल नाही. अर्थात पूजा होणं महत्वाचं, ते संस्कार, लहरी / तरंग (व्हाईब्ज) निर्माण होणं अत्यावश्यक, पूजेसाठी लागणारी प्रत्येक गोष्ट उपलब्ध होते त्यामुळे, काहीही कमी पडत नाही, सर्वांनाच समाधान आणि सुकर असा हा बदल.
माझ्या सोसायटीत एक मस्त-मौला काकू राहतात. त्या हाडाच्या शिक्षिका आहेत, एक वेगळं रसायन देखील आहेत आणि आता निवृत्त झाल्या आहेत. त्यांनी काल एक पोस्ट शेअर केली आम्हा सर्व मुलींसोबत. त्यात असं नमूद केलं होतं कि "स्वयंपाकाच्या मावशी सुट्टीवर आहेत? तर स्वीगी नकोच आता. शेफ ला कळवा तो / ती येऊन तुमच्या घरी स्वयंपाक करून खाऊ घालेल". अप्रतिम भन्नाट अशी कल्पना आहे हि. मला तर फारच आवडली. मी अजून त्या संकल्पनेचा व्यवस्थित आढावा घेतला नाही, चौकशी केली नाही किंवा चर्चा देखील. पण करीन म्हणते, लवकरच. असं काही उपलब्ध असेल तर कित्ती छान ना, अमृततुल्य असे घरचं खायला मिळेल, चव बदल आणि शिवाय दिज्जग व्यक्तीच्या हातचं जो ह्यात माहीर आहे, अहाहा च. वर नमूद केलेल्या गुरुंजी सारखा तो पण जर सगळं साहित्य, इंडक्शन कुकर, कुटुंब संख्येनुसार भांडे घेऊन आला तर फक्त घरच्यांनी वीज उपलब्ध करून द्यायची आणि यथेच्छ खायचं, बास. कित्ती मस्त ना, म्हणजे जे शेफ झालेत त्यांना खूप मोठी गुंतवणूक करून त्यांचे रेस्टॉरंट सुरु करायला नको, ते सांभाळायला नको, लोकं येतील कि नाही ह्याची चिंता तर नकोच, जाहिरातीचा खर्च नको, खुर्च्या, टेबल, वाट्या चमचे ई. काहीच पसारा नको. जशी गरज तसे घरोघरी जा मस्त स्वयंपाक करून खाऊ घाला आणि पैसे कमवा. मी तर अगदी फिदा च झाले हि संकल्पना ऐकून, ज्याच्या कोणाच्या सुपीक डोक्यातून हि आली असेल त्याला साष्टांग नमन. हो अर्थात माझ्या लहानपणीपासून लग्न कार्याला येणारे स्वयंपाकी बघितले आहेत मी, पण ते यायचे जेव्हा फार मोठ्या प्रमाणात आणि काही दिवस भरपूर करावं लागायचं तेव्हा. त्यांची पूर्ण चमू यायची. हे शेफ प्रकरण अत्याधुनिक आहे, एकट्याचा खेळ आहे.
आमच्या माहितीतले दोन गुरुजी आहेत ज्यांनी पूजा करून भला मोठा बंगला बांधला आहे पुण्यात, दुसरे गुरुजी होंडाची सर्वात मोठी गाडी मधून मिरवतात. ह्याचा अर्थ सरळ आहे कि हा दिसतो छोटा व्यवसाय, एकाने चालवलेला पण मस्त चालतो. प्रत्येक शेफ चे आपले दुकानचं असावे असं थोडीचं आहे.
सौंदर्य प्रसाधन गृहाचे पण अगदी तसेच आहे नाही का? भला मोठा खर्च, गुंतवणूक करण्यापेक्षा घरोघरी जाऊन सेवा द्यायची आणि कमवायचं, समाधानाने.
सरते शेवटी घरच्या खाण्याची सर कुठेच नाही. स्वस्थ खा आणि मस्त राहा. एकदा शेफ ला घरी बोलावून तर बघा, आवडेल तो बदल सर्वांना.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा