बुधवार, ७ जून, २०२३

कृतज्ञता

वडिल ह्या शब्दाची उत्पत्ती / उगम कुठून झाला हे मला ठाऊक नाही, शोधलं पण खास काही सापडलं नाही. माझ्या मनाला जे पटतंय ते येथे मांडण्याचा हा पिटुकला प्रयत्न. 

वड हा वटवृक्ष. किंवा असं देखील म्हटलं जातं कि वडाच्या एकतर प्रत्येक भागाचा उपयोग होतोच. तो वृक्ष निरपेक्ष रित्या सर्वांना सगळं काही देत राहतो सातत्याने. शिवाय अशी पण आख्यायिका आहे कि त्या वृक्षाखाली बसून, जप-तप करून, साधना करून अथवा न करता देखील मागितलेली ईच्छा पूर्ण होते बहुतांशी प्रत्येकवेळा. अर्थात अजून असे बहू गुणी वृक्ष आहेत. पण एकंदरीत वडाच्या वृक्षाचा महिमा सर्वश्रुत असल्यामुळे मग जाणकारांनी पित्या ला ती उपमा दिली असणार आणि म्हणून वडिल ह्या शब्दाचे मूळ वड असणार. 

एक क्षणोक्षणी अनुभवलेले, अनेक वर्ष झाली किंबहुना तपें लोटली तरी देखील संपूर्ण न उमगलेले, दर दिवशी नवीन भासणारे असे एक वडिल. सुरवंटाचे फुलपाखरू झाले अचानक असे ते, पण येथे ह्या फुलपाखराच्या पंखात प्रचंड बळ आहे, कुठून आली हि शक्ती हे ठाऊक नाही. पण ज्या दिवशी ह्या मुलाचं शिक्षण पूर्ण झालं, नोकरीत रुजू झाल्यापासून प्रचंड जबाबदारी पेलली जी सहसा कोणी निभावत नाही. वरवर जबाबदारी घेतली असं दर्शवणं आणि ती निभावणं अनेक वर्ष सातत्याने हे महाकठिण किंबहुना अशक्य आहे. बरं फक्त अवलंबून असलेल्यांची जबाबदारीच नाही तर स्वतःला नोकरी पेशात पुढे न्यायचं आहे, समाजात स्थान निर्माण करायचं आहे, तब्बेत सांभाळायची आहे, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक ह्याच्या कडे प्रकर्षाने लक्ष आणि त्यांच्यासाठी वेळ द्यायचा आहे आणि अशी अनेक कार्य करता करता स्वतःच्या कुटुंबासाठी सर्व जबाबदाऱ्या हसत-खेळत पार पडायच्या आहेत, स्वतःच्या लेकरांसमोर आदर्श निर्माण करायचा आहे अनेक स्तरावर. नोकरी करता करता तरुण वय असतांना अगदी तो बाबा होणार ह्याची चाहूल लागली तेव्हापासून ते पुढे वीस वर्ष सगळ्या अमिनिटीज / पंचतारांकीत सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, मागायच्या आत सगळं हजर करणे, कधी मऊ तर कधी कडक शिस्तीत राहून मार्गदर्शन करणे हे प्रत्येकाच्या बसची बातच नाही आहे. विभक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे आजी होऊन जन्माच्या आधीच असंख्य गोष्टी ऐकवणे, खूप पौष्टिक खाऊ घालणे, त्याच्या बाळाचं मालिश शास्त्रोक्त पद्धतीने कसं करायचं हे शिकून सातत्याने करणे, जन्मलेल्या बाळाची जिवापाड काळजी घेणे, त्यांची सगळी कामे करणे, शिवाय शेकडो फोटो काढून सगळ्या आठवणी जपणे, शाळेचा अभ्यास, महाविद्यालयाची किचकट प्रवेश प्रक्रिया आणि अशी इतर सगळी कार्य सांभाळत कचेरीत गगनभरारी मारणे, सुधृढ राहणे आणि अशी इतर अनेक आव्हाने सहजी पार पाडणे म्हणजे दिव्यच. तर असे हे माझ्या दोन जुळ्या मुलांचे आदर्श वडिल. वडिल म्हणून मला देखील अभिमान वाटावा असे ते व्यक्तिमत्व. आम्हा तिघांना डोक्यावर आलिशान छत, ऐशोआरामात प्रवासासाठी चार चाकी, उत्कृष्ट खानपानाची ऐश आणि म्हणेल ते सातत्याने पुरवठा करणारे, वडिलांची भुमिका चोख पार पडणारे अश्यांना आंतरराष्ट्रीय फादर्स दे च्या हार्दिक शुभेच्छा आणि मनःपूर्वक शेकडो धन्यवाद.  खूप प्रचंड शिकण्यासारखं आहे ह्या व्यक्तिमत्वाकडून, प्रयत्न जारी आहेत पण ह्या उभ्या आयुष्यात त्यांच्या नखाची पण सर मला येणार नाही हे नक्की.     

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...