बुधवार, ६ डिसेंबर, २०२३

डावी बाजू


माझी मुलं जेव्हा लहान होती, शाळकरी वयातील आणि सगळं खायला लागली होती, चव समजायला लागली होती किंबहुना शिंग फुटली होती तेव्हा हॉटेल मधे गेलो कि फक्त स्टार्टर्स आणि डेसर्टस ह्यावर ताव मारायची. अधलं - मधलं अजिबात शिवायची देखील नाहीत. 


महाराष्ट्रियन खाद्य संस्कृती नुसार माझ्या मते डावी बाजू ताटातली हिला अनन्य साधारण महत्व आहे. वैविध्य प्रकारच्या चटण्या (ओल्या आणि कोरड्या), कोशिंबिरी, वाटली डाळ (फोडणीची, परतलेली, कच्ची, आंब्याची), लोणची, तक्कु अहाहा च. त्या शिवाय पंगत असली तर पापड, कुरडया, सांडगे, भजे, वडे, आणि त्यानंतर गोडाचे प्रकार. भन्नाटच. अधलं - मधलं अजिबात नकोच. ह्याच्यावरच ताव मारावा वाटतो मला. आत्ता समजलं माझ्या मुलांमधे हे गूण कुठून आलेत ते. 


आमच्या नागपूरची खासियत सांगते. साग्रसंगीत पानात सगळं वाढलं असलं तरी देखील काही ठिकाणी मस्त लाल तिखट आणि त्यावर कच्च तेल (गोडेतेल) वाढायची प्रथा आहे.  मीठ तर असतंच त्यामुळे अगदीच कोणाला पदार्थ अळणी भासले तर हे असलं / अस्सल तिखट मीठ लावून यथेच्छ जेवता येतं, ताव मारता येतो. माझ्या घरी हिरवी भाजी, पातळ भाजी असली जेवणात कि आई तिखट तेलाची फोडणी करूनच बसायची जेवायला. आणि सांगायलाच नक्को कि मी तिच्याच पंगतीला. त्यामुळे त्या पौष्टिक भाजी भाकरी ची लज्जत आणखीनच वाढायची, काही पटीनं हो. त्यात जर डावी बाजू हिरव्या मिरच्या किंवा लाल मिरच्यांच्या ठेच्यानी सजली असेल तर विचारूच नका. आई शप्पथ. 


नंतर माझं वास्तव दक्षिणेकडे होतं काही काळ तेव्हा दाक्षिणात्य चटण्यांची / चटण्यांनी बहार आणली. कोरड्या आणि ओल्या, कित्ती ते प्रकार, खावे / चाखावे तेवढे नवलच. प्रत्येक पदार्थाच्या प्रकाराप्रमाणे चटणी बदल, माझ्या सारख्या तिखट्ट खवय्याला अजून काय पाहिजे. अगदी उपम्यासोबत देखील चटणी वाढतात.  


माझ्या आईकडची अजून एक पद्धत आज प्रकर्षाने आठवली आणि त्याचे महत्व कळले / उमगले, न्याहारीच्या पदार्थांसोबत किंवा पदार्थांवर ती कमीतकमी दोन किंवा तीन प्रकारची शेव पेरायची. क्या बात है. ते इतकं जगावेगळं लागायचं सांगते. म्हणजे आधीच आईच्या हातचे पदार्थ, ते देखील पहिल्या वाफेचे आणि त्यात "चेरी ऑन केक", असली तिखट मटकी + बेसन + रतलामी शेव. बासच. 


तोंडी लावण्याचे जे काही पदार्थ असतात आणि हि प्रथा किंवा हि गोष्ट ज्याच्या कुणाच्या सुपीक डोक्यातून आली आहे त्यांना माझा शिरसाष्टांग नमस्कारच. 


आज सकाळी सकाळी उपम्यासोबत झणझणीत चटणी खातांना मी माझ्या लहानपणीची, नागपूरची सहल करून आले, फेरफटका मारून आले. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ह्याचा अनुभव मी पुन्हा एकदा घेतला / उपभोगला आज, अगदी म्हणजे अगदी मनापासून. 


माझ्या संगणक क्षेत्रात देखील एक प्रथा आहे "add on" ची, तिचा उगम समजला आज मला इतक्या वर्षांनंतर हो. "add on" ची सुरवात करणारा, किंवा ह्या संकल्पनेची सुरवात करणारा नक्कीच महाराष्ट्रियन आणि त्यातल्या त्यात नागपूरकर असणार हे अगदी नक्कीच. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...