शनिवार, २३ नोव्हेंबर, २०२४

२१०३: दंत परी


खूप वर्षांनी पुन्हा एकदा कदाचित माझ्या घरी दंत परीचे आगमन होणार आहे. हळुवार, न कळत ती येऊन जाणार असं दिसतंय खरं. माझी मुलं लहान असतांना अनेकदा आली होती ती, हजेरी लावलीच होती, लावावीच लागली होती आणि काय काय म्हणून एक से एक बक्षिसं, भेट वस्तू आणल्या होत्या तिने, क्या बात है? मानलं बुवा तिला. कसा काय मस्त विचार करून जे त्या त्या मुलाला हवं आहे ते बरोबर आणून उशीखाली ठेवून, मस्त आणि भरपूर आशीर्वाद देऊन जाते नाही? गेली कित्येक वर्ष, दशकं, पिढ्या ती हे सातत्याने करतेच आहे. खूप अप्रूप वाटतं तिच्या बद्दल ऐकून, विचार करून, नेहेमीच. आणि बघा ना फक्त पहिला दात पडला कि फक्त येते असं नाही, ती दुधाचे दात सगळे पडेपर्यंत येतेच, अनेकदा. माझ्या कडे तर जुळे होते तेव्हा लहान त्यामुळे तिच्या चकरा खूप व्हायच्या.  आई गं. कित्ती मस्त आठवणी देऊन गेली आहे ती माझ्या मुलांसाठी, साधे पण मस्त गिफ्ट्स घेऊन आली होती तेव्हा. 


का कुणास ठाऊक पण तेव्हाची पद्धत म्हणा, शिस्त किंवा शाळेचे नियम, मुलींना व्यवस्थित तेल लावून घट्ट वेण्या घालणे अपरिहार्य होते. दोन वेण्या, रिबिन्स आणि वर बांधलेल्या. गळ्यात केस शाळेत तर नाहीच पण इतर कुठेही मी बघितल्याचं आठवत नाहीच. कोणतीच मुलगी तेव्हा असे गळ्यात केस पसरून वावरतांना कधीच नजरेस पडली नाहीच. त्यामुळे जे सर्वत्र बघत मोठे झालो तेच आता योग्य वाटतं सर्व तर्हेने आणि सोप्प सुटसुटीत देखील. अजूनही माझे केस वर बाधलेलेच असतात, कायम, का कुणास ठाऊक, नाही आवडतं मला ते मोकळे सोडलेले. आता अर्थात दोन वेण्यांऐवढे, आईच्या हातात होते तेव्हाचे घनदाट केस नाही उरले पण जे आहेत ते बांधलेलेच असतात हे खरं.  आताशा इतक्या अप्रतिम, रंगीबेरंगी क्लिप्स आहेत बाजारात उपलब्ध कि त्यांचा वापर करून फॅशन हि सांभाळली जाते आणि सोय देखील. मला हा ज्वलंत प्रश्न सतावतो कि मुली कसे काय ते गळ्यात केस घेऊन वावरतात, मग ते छोटे असो, मोठे, सोडण्या सारखे असोत किंवा नसोत. फॅशन च्या नावाखाली काहीही. असो. तो त्यांचा प्रश्न आहे. तर त्या ज्या क्लिप्स मी वापरते त्यांना क्रोकोडाईल असं पण म्हणतात कारण त्यांना मगरी सारखे दात असतात दोन्ही बाजूला आणि त्यांचा जबडा पण तसाच उघडतो, बंद होतो. त्यामुळे प्रेमाने तिला क्रोकोडाईल पिन किंवा क्लिप असे म्हटले जाते.  माझ्या कडे खूप पद्धतीच्या, आकाराच्या, रुंदीच्या ह्या क्लिप्स आहेत. लहान, मोठ्या, आडव्या, जाड सगळ्याच, त्यातली एक जी माझी सखी आहे, फारच आवडती तिचा बिच्चारीचा एक दात निखळून पडला हो काल, इतकं वाईट वाटलं मला, कारण ती माझ्या सोबत अनेक वर्ष आहे. तिची मला आणि माझी तिला फारच सवय झाली आहे, घनिष्ट आहोत आम्ही, सुचत नाही एकमकीं शिवाय आम्हाला, चुकल्यासारखं वाटतं सतत. आणि परिधान केलं कि कसं हायसं वाटतं. जरी एक दात निखळून पडला असला तरी बाकी शाबूत आहेत, पण मग खूप उत्साहात आहोत आम्ही कि आता नक्कीच दंत परी पुन्हा माझ्या घरी येणार, तिचे आगमन कधी होतंय ह्या कडेच आम्ही लक्ष देऊन आहोत. ये गं बाई लवकर असं म्हणावसं वाटतंय. माझ्या दातांच्या वेळी अशी हि परी आली होती का कोणास ठाऊक? आठवत नाही मला. त्यामुळे आता हिच्या दातांच्या वेळी तरी ये असं मी त्या परीला सांगते आहे, विनविते आहे. मज्जा येईल ना, एक अनोखा एक्सपीरियन्स.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...