आज कळलं कि हा थ्री इन वन ची भन्नाट संकल्पना माझ्या पुढ्यात का मांडली गेली त्या वेळी. आज मला एका ठिकाणी वर्ग घ्यायला जायचे होते. सकाळची गडबड होती, मुलीचा डब्बा होता, नाश्ता करायचा होता आणि बरेच काही. त्यात माझी खास काळजी घेणारी आहार तज्ज्ञ, तिच्या विचारपूर्वक तय्यार केलेल्या सूची नुसार भाजी आणि आमटी दोन्ही पानात वाढलेच पाहिजे, तितक्या प्रमाणात पोटात गेलेच पाहिजे. वेळेचे बंधन, आणि आहाराचा विचार, म्हटलं काय करावं? माझ्या शेजारच्या एक जबरदस्त व्यक्तिमत्वाची, त्यांच्या खास पदार्थाची आठवण झाली. त्या दुधीची आमटी / तडका डाळ करायच्या. म्हटलं चला हेच करूयात. मग काय मस्त झणझणीत पण कमी तेलाची फोडणी देऊन, कांदा, टमाटर, दुधी, तीन प्रकारच्या डाळी, कसुरी मेथी वगैरे घालून जमवला भन्नाट "थ्री इन वन" पदार्थ. वेगवेगळे दोन पदार्थ अशक्य होते त्या कमी वेळात करणे, त्यामुळे हा सुवर्णमध्य शोधून काढला आणि गरमागरम तव्यावरची वाफाळलेल्या भाकरीसोबत फस्त केला देखील. त्या सोबत पानात कोशिंबीरीने आणि चविष्ट ताकाने साथ दिल्यामुळे नागपूर, दिनशा, थ्री इन वन ची संकल्पना आठवली हो. मज्जा आली. हा बदल फारच भावाला मला.
मी बहुतेक दुधीची भाजी कधी सुकी, कधी रस्सा, हलवा, पराठे, मुठिया, कोफ्ता ई. पदार्थ करते. पण आज वेगळ्या पद्धतीने डाळ घालून एकत्र भाजीने जेवणाला चार चांद लावले हो अक्षरशः.
माझ्या दिनशा ला, त्यांनी ओळख करून दिलेल्या थ्री इन वन च्या संकल्पनेला मनःपूर्वक धन्यवाद.
"असे पदार्थ वाढले जाती आणिक स्मृती ठेवुनी / देऊनी जाती"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा