मला फक्त महाराष्ट्रीयन चालीरीतींबद्दल ठाऊक आहे, पण भारतात बहुतांशी सर्वत्रच असे आढळते, काही किंचित बदल इकडे तिकडे, एवढेच. लहान बाळ जन्माला आलं की त्याच्या हातात काळ्या मण्यांची वळी घातली जातात. काही घरांमध्ये परंपरागत चालत आलेले वळे घातले जाते आणि शिवाय त्याच्यासाठी खास नवीन पण केले जाते. असंख्य प्रकाराने ती वळी नटलेली, सजलेली असतात, पण बहुतांशी एक सोन्याचा मणी आणि त्यानंतर काळा मणी अशी ती वीण असते. थोडक्यात काय, तर काळे आणि सोन्याचे मणी विणून तयार केलेला सुबक सुंदर दागिना त्या नवीन बाळासाठी.
माझ्या माहितीप्रमाणे हा असा दागिना मुलगा झाला तरी केला जातो अगदी कौतुकाने. बऱ्याच घरी आजी-आजोबा करून आशीर्वाद म्हणून बारश्या दिवशी भेट देतात. नाहीतर आई-वडील नक्कीच करतात. त्यात सोनं किती घातलंय हे महत्त्वाचं नसतं. ते काही जणांच्या मतांप्रमाणे नजर लागू नये म्हणून घालतात, किंवा बाळाच्या गुटगुटीत हातात सौंदर्याची भर पडावी म्हणून घालतात किंवा सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सोन्याचे पाणी जावे म्हणे अंगावरून, ते चांगलं असतं. त्याला कोणी बचत ह्या आरशातून बघतात, तर कोणी शान म्हणून पण. असो.
तर असं आपण मानलं की हा उत्कृष्ट दागिना मुलगा आणि मुलगी दोघांसाठी सारख्याच पद्धतीचा केला जातो, भेदभाव न ठेवता, तर मग एक यक्ष प्रश्न मला पडला आहे आता. तो विचारण्याआधी थोडंसं अजून काही ह्या दागिन्यांसंबंधी.
आताशा गेले काही वर्ष हातात परिधान करण्याच्या मंगळसूत्राची फॅशन आली आहे. बहुतांशी सर्वजणी, मुख्यतः ज्या नोकरी करणाऱ्या मुली आहेत, त्या ह्याला पसंती देतात आणि परिधान करतात देखील. ह्या नाविन्यपूर्ण दागिन्यांसंबंधी मी ह्या आधी लिहिलं आहेच. आता एका वेगळ्या अर्थाने येथे मांडते आहे. पाश्चात्त्य पद्धतीचा ड्रेस जर घातला, तर त्यावर पारंपरिक भारतीय मंगळसूत्र बरं दिसत नाही, पण घालावं लागतं, घालावंसं वाटतं म्हणून हा पिटुकला बदल. तुम्ही ह्या नवीन दागिन्याला नीट बघितलं आहे का हो? असेल तर तुम्हाला तो लहान मुलांच्या वळ्यासारखा नक्कीच दिसेल/भासेल. मला तरी अगदी तसेच वाटले जेव्हा मी हातातले मंगळसूत्र पहिल्यांदा बघितले. माझ्या दोन मुलांची वळी एकत्र करून घालण्याचा मोह आवरता आला नाही मला. फक्त लांबीमध्ये बदल आहे आणि अर्थातच फॅशनमध्येसुद्धा. दोन्ही दागिन्यांमध्ये प्रचंड विविधता उपलब्ध आहे. खूप सुंदर प्रकार दुकानात पाहायला मिळतात.
मुलं लहान असताना, अगदी शाळेत जाण्याच्या वयापर्यंत जर ती वळी घालतात दोघांना (मुलाच्या हातात देखील), मग लग्न झाल्यावर फक्त मुलींनाच हे बंधन किंवा अट्टाहास का? असे हातातले मंगळसूत्र मुलांनी पण घालावे. कळू दे ना समाजाला ह्याचं पण लग्न झालंय ते. अर्थात काही फरक पडणारच नाही आहे, पण सक्ती नको. बचत म्हणून बघताय तर, किंवा रूढी परंपरा ज्या आधुनिक होत चालल्या आहेत, आणि अश्या पद्धतीने ह्यात भरच पडणार आहे, काही कमी होत नाहीच आहे. किंबहुना मुलीच्या एका टिपिकल मंगळसुत्रात दोघांची हातातली होतील, बघा विचार करून.
नाहीतर आताशा बरीच मुलं मुलींसारखी वेशभूषा, केशभूषा, आणि आभूषणं परिधान करतातच, मग अजून एक भर त्यात? काय म्हणताय मंडळी? सर्वसमभाव किंवा दोघे महत्त्वाचे, किंवा लग्न झाल्याची पावती/निशाण इत्यादी. तुम्हाला हवे तसे बघा आणि जमल्यास आचरणांत आणा. सहज सुचलं म्हणून हा पंक्ती प्रपंच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा