सोशल मीडिया भलतीच सोशल असल्यामुळे अनेक प्लॅटफॉर्म्सवर मी सातत्याने एक वाक्य वाचलं, ऐकलं आणि त्याबद्दलची चर्चासत्रंही पाहिली. या सर्वांचा गाभा म्हणजे 'मानसिक आरोग्य'. "जर कोणाला काही अडचण असेल तर बोला, व्यक्त व्हा," अशा संदर्भातल्या त्या सगळ्या चर्चा असतात. त्यावर माझं नेहमी असं म्हणणं असतं की, संवाद नेहमीच ठेवा मित्रांशी, आपल्या माणसांशी. अडचण येण्याची वाट का बघता? आपले सर्वात जवळचे किंवा मित्र म्हणावे असे कोण असतात? शाळेत एका बाकावर बसलेले, एकत्र मस्ती केलेले, की अजून कोणी?
माझ्या मते, आपले सर्वात जवळचे मित्र म्हणजे आपले 'अंतर्बाह्य अवयव'. अगदी पहिल्या क्षणापासून ते तुमच्या सोबत आहेत, त्यांनी साथ दिली आहे; किंबहुना त्यांची साथ आहे म्हणूनच आपण आहोत. ते सर्व कार्य करतात, पण नाव मात्र तुमचं किंवा माझं होतं. मेंदू विचार करतो, सगळं साठवतो, आठवतो, दिशा देतो आणि इतर अनेक कार्य करतो, पण नाव मात्र माझं होतं. हृदयाने धडधड सुरू केली म्हणून आपण म्हणतो की 'बाळ जन्माला आलं'. बघा ना, ना लाईक्स, ना शेअर, तरीही तो सातत्याने उत्कृष्ट कार्य करतोच आहे बिनबोभाट आणि निरपेक्ष! असा दोस्त या बाह्य विश्वात कधीतरी मिळेल का? मग या तुमच्यापाशी सतत असणाऱ्या मित्रांशी मनमोकळा आणि हळुवार संवाद साधा ना! ते नेहमीच उपलब्ध आहेत. त्यांना धन्यवाद द्या, त्यांची तारीफ करा आणि बघा व्यक्त झाल्यावर किती भन्नाट वाटतं ते. बाप्पाने कितीतरी मित्र दिले आहेत आपल्याला, एक-दोन नाही तर अनेक! मग काय कमी आहे? एक नवीन वीण विणून तर बघा या वेगळ्या प्रेमळ नात्याची.
माझ्या मते, असं साधारण कोणी करत नाही. मी देखील करत नव्हते, पण जेव्हापासून करायला लागले, तेव्हापासून यांच्या प्रेमातच पडले. आता त्यासाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही, ते अगदी नकळत, आपोआप आणि सहज होतं. इतक्या जवळ असणाऱ्या, माझ्यासोबत पहिल्या क्षणापासून वाढलेल्या या सर्व मित्रांना मी गृहीतच धरलं होतं. त्यांनाही पाठीवर थाप द्यावी, हे लक्षातच आलं नाही. आपल्याला जशी नेहमी शाबासकी लागते आणि ती मिळवण्यासाठी आपण किती वाट बघतो, आटापिटा करतो, कधी कधी तर त्रागाही करतो; मग जे तुमच्या नावाला नाव मिळवून देत आहेत, तुमची जीवनगाडी चालवत आहेत, त्या सर्वांना धन्यवाद नकोत? त्यांना शाबासकी नको द्यायला? आणि तुमच्याशिवाय त्यांना अजून कोण देणार? बोलीभाषेत तशी सोयही नाही की त्या अवयवांचं नाव घेऊन तुमचं कौतुक करावं, नाही का? त्यामुळे ही फक्त आणि फक्त तुमचीच जबाबदारी आहे अंतर्बाह्य ठणठणीत राहण्याची जणू ही गुरुकिल्लीच आहे.
माझी आई सांगते (कारण तिने ते दोनदा अनुभवलं आहे), की मी बाळ असताना माझेच हात हलताना बघून मला मजा वाटायची. तेव्हा समजायचं नाही की हे काय आहे, कसे हलतात, हे किती मजेशीर आहे. माझ्या मुलाच्या बाबतीतही अगदी तसंच घडलं, जे मी फोटोत कैदही केलं आहे. तो त्याचेच सुबक, सुंदर, गोरेपान हात आणि त्यांची हालचाल बघून तासनतास रमायचा. "आपला हात जगन्नाथ," मग चला सुरू करूया!
माझ्या त्या पिटुकल्या हातात जेव्हा छोट्याशा बांगड्या घातल्या होत्या, तेव्हापासून अनेक वेळा त्यांनी माझी शोभा वाढवली. कधी मेहंदीमुळे, कधी सुंदर हस्ताक्षरात लिहिताना, तर कधी अप्रतिम रांगोळी रेखाटताना. गोल पोळ्या लाटण्यापासून ते पहिल्यांदा अंगठी परिधान करण्यापर्यंत... तो दिवस जेव्हा मला पहिल्यांदा आईचं घड्याळ घालायची परवानगी मिळाली, मग माझं स्वतःचं मनगटी घड्याळ मिळालं. बॅडमिंटनची रॅकेट हातात घेऊन अनेक सामने जिंकले, याच हातांनी गाड्या चालवल्या. पहिल्यांदा माहेरच्या नावाची सही केली, मग सासरच्या नावाची सही नव्या पद्धतीने गिरवली. त्यानंतर याच हातांनी असंख्य सह्या केल्या, घास सांडवत खायला सुरुवात केली आणि मग इतरांना भरवले. टायपिंगची सुरुवात केली जी आजही अविरत सुरूच आहे... ही यादी न संपणारी आहे. असे प्रत्येक सुंदर प्रसंग आठवा, त्यात रममाण व्हा. संवाद साधा आपल्या बोटांशी, मनगटाशी, संपूर्ण हाताशी आणि मग बघा सर्वत्र फक्त आनंदी आनंदच असेल आणि तो द्विगुणित होईल.
हे सत्र इतर अवयवांसोबत, म्हणजेच तुमच्या हक्काच्या मित्रांसोबत नेहमीच सुरू ठेवा. गोड बोला मंडळी!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा