आज ज्वारी निवडताना एक सहज विचार मनात डोकावून गेला. हा विचार बऱ्याच वर्षांपूर्वी मी लिहिलेल्या एका निबंधावर आधारित आहे. तो निबंध मी एका स्पर्धेसाठी लिहिला होता, त्याला प्रथम क्रमांक मिळाला आणि नंतर तो आमच्या महाविद्यालयीन मासिकात प्रसिद्धही झाला होता. त्या निबंधाचं शीर्षक होतं "नो चॉईस लाईफ".
आज ज्वारीचे दाणे हातात घेताना त्या संकल्पनेची पुन्हा एकदा प्रकर्षाने आठवण झाली. एक-दोन किलो ज्वारीमध्ये असंख्य दाणे असतात. काही लहान, तर काही मोठे; काही उजळ, तर काही थोडे डावे; काही बसके, तर काही सडसडीत. या सर्वच दाण्यांचे शेवटी मिळून पीठ तयार होते, ज्यापासून आपण अत्यंत पौष्टिक पदार्थ बनवतो. काय शाश्वती की हे सर्व दाणे एकाच झाडाचे असतील, एकाच शेतातले असतील किंवा एकाच हंगामातले असतील? अमूलने दुधाच्या क्षेत्रात जी क्रांती आणली, तशीच प्रक्रिया इतर पिकांच्या बाबतीतही घडते. पण जोवर ते एका पोत्यात किंवा पिशवीत असतात, तोवर ते सगळे गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात. कदाचित काही दाणे कुरकुरत असतीलही, पण ते अगदीच थोडे असतात आणि खूप काळानंतरच त्यांची गडबड जाणवते; एरवी ते शांतच असतात.
या सजीव दाण्यांना स्वतःचा काहीच 'चॉईस' नाही, नव्हता आणि कधी असणारही नाही. तरीही ते एकत्र राहून स्वाद आणि स्वास्थ्य देतातच. आपणही अगदी त्यांच्यासारखेच आहोत ना? आपल्या पालकांनी न समजत्या वयात ज्या शाळेत घातलं, तिथे आपण निमूटपणे गेलो आणि नंतर ती शाळा आपल्याला आवडू लागली. सवंगडी, शिक्षक, कर्मचारी... सर्वच नवखे होते. महाविद्यालयात गेल्यावरही आपण ठरवत नाही की आपल्या वर्गात कोण असणार किंवा कोणते शिक्षक शिकवणार. नोकरीच्या ठिकाणीही तेच, शेजारीही तेच!
हे सगळं 'त्याने' लिहिलेल्या संहितेप्रमाणे आणि पटकथेप्रमाणे घडत असतं. आपण त्या सर्वांसोबत काम करायला सुरुवात करतो, त्यांच्या प्रेमात पडतो आणि स्वतःची प्रगतीही साधतो. सर्वांसोबत सूर जुळतात अगदी एखाद्या पट्टीच्या गायकाचे सूर लागतात तसे. पण ते सूर लावणारा तो 'वरचा' असतो. हे सगळं 'ऑटो पायलट' मोडवर सुरू आहे.
म्हणूनच, या पिटुकल्या 'मी' ला किंवा अहंकाराला बाजूला सारा आणि मुक्तछंदाने जगा. कारण शेवटी 'तो'च सर्वस्व आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा