गुरुवार, २६ मार्च, २०२६

2411: कधीतरी थांबून बघू या

 माझ्या आईची एक खास मैत्रीण होती. ती आधी आमची शेजारीण होती, त्यामुळेच कदाचित आईची ओळख झाली असणार. काकांची निवृत्ती झाल्यावर त्यांनी गावाबाहेर एक बंगला बांधला. तरीसुद्धा, त्या काळात कुठलेही सोशल मीडिया नसताना देखील त्यांची मैत्री कायम टिकली.

त्या मैत्रिणीची तर होतीच, पण त्या वेळी हे एक अनोखं असलं तरी सर्वसामान्य सवय होती. सकाळी उठलं, सगळं आवरलं की लगेच कणकेत पाणी टाकून ठेवायचं, ती मुरायला ठेवायची. त्यानंतर डाळ (बहुतांशी तूरडाळ) पाण्यात भिजत ठेवायची. ज्यांच्याकडे शक्य होतं ते थर्मासमध्ये किंवा भांड्यात गरम पाणी करून ठेवायचे  म्हणजे ते डाळीत, कुकर लावताना, चहा करताना, भाजीत रस्सा करायचा असल्यास आणि इतरत्रही उपयोगात येईल.

माझ्या लहानपणी बहुतांशी बंगलेच असायचे, त्यामुळे मी चुली, बंब यांचा वापर जवळून पाहिला आहे. ते घराची आणि अंगणाची शान असायची, आणि त्याचा पुरेपूर उपयोग केला जायचा. एका चुलीवर दूध उकळत राहायचं, दुसऱ्या चुलीवर भात. ते झालं की मग राजमा/छोले आणि इतर वेळखाऊ पदार्थ चढवले जायचे ज्यांना शिजायला वेळ लागतो आणि धगही लागते.

या सगळ्या तयारीमुळे मुख्य स्वयंपाकाला लागणारा वेळ कमी व्हायचा, म्हणजेच इंधनाची बचत व्हायची. त्यात संपूर्ण लक्ष पदार्थ बनवण्यात असल्यामुळे तो चविष्ट आणि उत्कृष्ट होत असे, आणि गॅस किंवा इंधन वाया जात नसे. एक सुंदर सवय होती, स्वयंपाक झाला की लगेच पानं वाढली जायची, पहिल्या वाफेचं अन्न खाल्लं जायचं. पुनःपुन्हा गरम करण्याची सवय नव्हती. एक वेळ, एक जेवण.

अर्थात, सध्याच्या परिस्थितीत हे सगळं शक्य नाही. मग आज काय करावं? तर फक्त लक्ष देऊन स्वयंपाक केला, तरी गॅस हवा तेवढाच वापरला जाईल. उदाहरणार्थ, माझीच बाई कित्येक वेळा तवा किंवा कढई तापत ठेवते, का, हे विचारण्याची सोय नाहीच! आणि खरं सांगायचं तर ही सवय अनेक ठिकाणी दिसते. “गॅस आहेच, संपणार नाही” हा पवित्रा, किंवा सवयीचा भाग, कारणं अनेक असू शकतात.

झोपेच्या वेळा वेगळ्या, त्यामुळे खाण्याच्या वेळा सुद्धा बदलल्या आहेत. त्यामुळे गॅसवर किंवा मायक्रोवेव्हमध्ये वारंवार गरम करणं सर्रास चालू आहे.

नुसती डाळ शिजवण्यापेक्षा डाळीचा भरडा किंवा पावडर करून वापरला तर? वेळ आणि गॅस नक्कीच वाचेल. मायक्रोवेव्ह, एअर फ्रायर, सोलर कुकर, ओव्हन, राईस कुकर... यांचा योग्य वापर केला, किंवा फ्रिजमधून पदार्थ आधी बाहेर काढून रूम टेम्परेचरला आणून मग शिजवलं, तरी गॅसची बचत होईल.

एक वेळचं जेवण “वन डिश मिल” पद्धतीने केलं, तरीदेखील गॅस वाचेल, ही फक्त आताची गरज नाही, तर नेहमीच उपयोगी गोष्ट आहे. फळं, सॅलेड यांचा वापर वाढवला, तर पौष्टिकताही वाढेल आणि गॅसची बचतही होईल.

हे सगळे पर्याय नवीन नाहीत. सगळ्यांना माहितीच आहेत. पण कधी कधी विस्मृतीत जातात, म्हणून हा पंक्तिप्रपंच.

“गॅस न वापरता / इंधन न वापरता केलेले पदार्थ” हा एक छोटासा प्रयोग मी अनेक वर्षांपूर्वी, मुख्यतः मुलांच्या उन्हाळी सुट्टीत केला होता आणि खूप मजा आली होती! काही पदार्थ असे असतात, जे अधूनमधून गंमत म्हणून करता येतात. वेगळं काहीतरी करून बघायला काय हरकत आहे?

मोड आलेली कडधान्यं चुलीवर थोडी शिजवणं हा एक पर्याय, आणि ती पूर्ण शिजवण्याऐवजी हलकी ठेवणं हा दुसरा. मोड आलेल्या कडधान्यांचे सॅलेड्स तर जगप्रसिद्ध आहेतच!

एका सुप्रसिद्ध चित्रपटात दाखवल्याप्रमाणे: एकदा तेल तापलं की गॅस बंद करूनही पुऱ्या तळता येतात. म्हणजे शक्य सगळंच आहे.

गेल्या काही वर्षांत एक नवीन लाट आली आहे  अमेरिकेसारखी पूर्व-cooked पदार्थांची सवय, आणि थंड + गोड पदार्थांचं वाढतं आकर्षण. नवीन पिढीने हे फक्त स्वीकारलं नाही, तर अगदी उचलून धरलं आहे. वेळ, ऋतू, वातावरण काहीही असो  कोल्ड कॉफी, आईस्क्रीम बारा महिने हवेच!

मग विचार असा  कधीतरी याचाच उपयोग करून पाहूया का? कदाचित त्यातून थोडा व्यायाम वाढेल, स्क्रीनपासून थोडं दूर राहता येईल, आणि आणखी काही चांगले बदलही दिसतील.

नाही का?

सोयींच्या शोधात आपण सवयी गमावल्या, आता त्या परत आठवायची वेळ आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...