कधी कधी फार मोठं काही घडण्याची गरज नसते. दोन ओळींचा एक साधा मेसेजही मनाला दिलासा देऊन जातो. आज तसंच काहीसं घडलं.
आज अचानक फोनवर एक मेसेज आला. साधा मेसेज भलत्याच सोशल असलेल्या सोशल मीडियावर नाही. आणि कदाचित मी जेथे राहते त्या ठिकाणाचे महत्त्व असेल म्हणून तो मराठीत होता.
मी जेव्हा तो मेसेज पहिल्यांदा वाचला तेव्हा नीटसा समजला नाही. पुन्हा एकदा वाचला तेव्हा त्याचं महत्त्व उमगलं. त्या फक्त दोन-तीन ओळी आहेत; पण त्या वाचून जो दिलासा मिळाला तो मोजमापाच्या पल्याड आहे.
सद्य परिस्थितीत असा मेसेज वाचायला मिळणं खूप महत्त्वाचं आहे. मला हे ठाऊक नाही की हा फक्त दिलासा देण्यासाठी पाठवलेला मेसेज आहे, की ह्या मागे व्यवस्थित संख्याशास्त्राचा अभ्यास झाला आहे. हा मेसेज त्यांनी कसा तयार केला असेल? म्हणजे ह्या मागची आकडेवारी त्यांना कुठून मिळाली असेल? तंत्रज्ञानाचा नक्कीच पुरेपूर वापर केलेला दिसतो.
आपल्या कडे थेट युद्धस्थिती नसली तरी जगात काही ठिकाणी युद्धस्थिती आहे. आणि अशा देशांवर आपण स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इंधनासाठी बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहोत. वृत्तपत्रे, बातम्या आणि इतर ठिकाणी जेव्हा सतत असे ऐकायला मिळते की असं होणार, तसं होणार… ते काहींना घाबरवून टाकणारंही असतं.
अशा वेळी असा मेसेज मिळाला की "सगळं काही ठीक आहे, आटोक्यात आहे, तुटवडा नाही आहे" इतकं हायसं वाटलं की सांगता सोय नाही.
हा दिलासा फक्त माझ्यासाठी नाही, तर प्रत्येकासाठी आहे ज्यांना इंधनाची, गॅसची गरज आहे.
प्रार्थनेत बळ असतं यात शंकाच नाही. आणि त्याच वेळी तंत्रज्ञानाचा वापर करून काढलेली आकडेवारीही किती समाधान देऊन जाते हे लक्षात आलं.
आता इथून पुढे सगळेच जरा अधिक सांभाळून गॅस वापरतील यात दुमत नाही. पुरवून-पुरवून वापर केला जाईल सर्व स्तरांवर. कारण असा मेसेज प्रत्येकापर्यंत पोचला असणारच.
म्हणजे बघा, त्या दोन ओळींची कमाल!
तसंही सगळेच गॅस आणि जिन्नस जपून वापरतात. पण आता कदाचित अजून थोडी जास्त जागरूकता येईल.
दोन ओळी, चार शब्द पाठवावे असे ज्यांना सुचले त्यांना प्रणाम आणि मनःपूर्वक धन्यवाद.
तुमच्याही आयुष्यात असा एखादा छोटा मेसेज कधी दिलासा देऊन गेला आहे का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा