सोमवार, ४ मे, २०२६

2451: सूर तेच, स्पर्श वेगळे


मी नेहमीच Indian Idol आवडीने पाहत आले आहे. पण यावर्षी खास वेळ काढून ते खऱ्या अर्थाने अनुभवता आलं. प्रतिक्रिया देणं, हसणं, आनंद घेणं, कधी डोळ्यात पाणी येणं, कधी जुन्या आठवणींमध्ये रमणं… सगळंच मनापासून.

हा सिझन सप्टेंबर 2025 मध्ये सुरू झाला आणि अजूनही वीकेंडला पाहायला मिळतो. इतका मोठा कालावधी असल्यामुळे बदल होणं स्वाभाविकच आहे. त्यात कीबोर्ड वाजवणाऱ्या कलाकारांमध्येही काही बदल झाले.

त्यात दोन कलाकार विशेष लक्षात राहिले.

पहिला कलाकार खूप सातत्यपूर्ण. त्याची देहबोली, चेहऱ्यावरचे भाव, प्रतिक्रिया सगळंच सांगतं की तो पूर्णपणे त्या क्षणात आहे. तो हसतो, स्मित करतो, गायकांशी संवाद साधतो आणि तो संवाद फक्त औपचारिक वाटत नाही, तर एक जिव्हाळा जाणवतो. तो फक्त एक वादक म्हणून नाही, तर त्या सादरीकरणाचा भाग म्हणून उभा असतो. दोन्ही हातांनी, कधी दोन कीबोर्डवर सहज वाजवत, गायकांना प्रोत्साहन देत तो पूर्ण वातावरण जिवंत ठेवतो. अशा कलाकारांमुळे बँडला एक वेगळीच ऊर्जा मिळते.

दुसरा कलाकार अगदी शांत. त्याचं पूर्ण लक्ष समोर स्टँडवर ठेवलेल्या नोट्सवर. तो वाजवत असताना बाकी काही अस्तित्वातच नाही असं वाटतं. एकाग्रतेचं एक वेगळंच रूप.

आणि मग एक नवीन कलाकार दिसला. त्याचा अंदाज पूर्ण वेगळा. कीजवर ठाम प्रहार, बहुतेक वेळा एका बोटाने वाजवणं, आणि पूर्ण लक्ष फक्त वाद्यावर. कुठेही नजर नाही, कुठलाही बाह्य संवाद नाही. पण त्याचा आणि त्याच्या वाद्याचा एक वेगळाच संवाद जाणवतो, आणि तोही तितकाच आकर्षक वाटतो.

हे सगळं एकाच मंचावर, त्याच सिझनमध्ये, त्याच गायकांसोबत अनुभवायला मिळणं खूपच रंजक वाटलं. सगळे जवळपास एकाच वयोगटातील, पण अभिव्यक्ती आणि काम करण्याच्या शैली किती वेगळ्या.

गेल्या सिझनमध्ये, मी आणि माझी मुलगी एकाच सोफ्यावर बसून हा कार्यक्रम पाहत होतो. तेव्हा ती सहज म्हणाली, गायकासाठी सगळ्यात मोठं प्रमाणपत्र म्हणजे वादकांना त्याचं गाणं मनापासून आवडणं. जेव्हा वादक स्वतः गाण्याचा आनंद घेतात, तेव्हा त्याहून मोठं काहीच नसतं.

मला माहीत आहे की प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. तरीही त्यांना पाहताना हे लिहावंसं वाटलं. सगळेच उत्कृष्ट आहेत. हे फक्त एक निरीक्षण.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...