मंडळी तंबू म्हटलं कि तुमच्या डोळ्यासमोर काय उभं राहत बरं सांगा? मला तरी अनेकविध प्रकार येतात डोळ्यासमोर. अमेरीकेत तंबू मधे जाऊन राहायची पद्धत आहे,उन्हाळ्यात. सहकुटुंब सहपरिवार मित्र मैत्रिणींसोबत जाऊन राहायचं आणि मस्त एन्जॉय करायचं. तंबू स्वतःचे विकत घ्यायचे किंवा तेथे भाड्याने पण मिळतात. मग काय कॅम्प फायर, मस्त खाणं पिणं, आणि संपूर्ण व्यवस्था असते. आता येथे सुद्धा तंबूत राहायला जाऊ लागले आहेत लोक... असो.
घरी लहान मुलांसाठी आणलेले रंगबिरंगी तंबू, आपल्या जवानांचे तात्पुरते उभे केलेले तंबू, आमच्या लहानपणी उहाळ्यात मोठ्या आकाराच्या छत्र्या जवळ जवळ ठेऊन त्यावर आईची जुनी साडी किंवा चादर घालून उभारलेले तंबू आणि बरेच काही.
अजून एक तंबू संदर्भात म्हण आठवते आहे मला "एक खांबी तंबू"...
बरं आज का अचानक हा विषय? सांगते सांगते..
माझ्या कडे काम करणाऱ्या मावशीनी दिलेलं हे नाव आहे माझ्या फ्रॉक लाईक ड्रेसेस ना. त्या नॉर्मल दिवसांमधे जेव्हा माझ्या कडे येत होत्या आणि कपड्यांच्या घड्या करायच्या तेव्हा म्हणायच्या "हा तंबू कशाला आणलाय? घडी करणं लई अवघड आहे... ई". ३ सलग दिवसांच्या मस्त सुट्ट्या झाल्या नंतर आज पुढील आठवड्याच्या तय्यारी ला लागले. कपडे इस्त्री करतांना ह्या "तंबू" शब्दाची प्रकर्षाने आठवण झाली कारण आजकाल घेर इतका असतो, कळ्या असतात आणि लांबी सुद्धा फार असते कुर्त्यांना. तो एक तंबू इस्त्री करायचा म्हणजे त्यात साधे सरळ आकाराचे ३-४ ड्रेस सहज इस्त्री होतील. पण विविधता हवीच, नाही का. आणि फॅशन करणं पण आवश्यकच आहे ना. त्या मुळे सध्या माझ्या कडे साधारणतः ४-५ तंबू आहेतच, जे मी आलटून पालटून घालते.
तर अशी हि माझी तंबू ची कहाणी साठा उत्तरी सफळ संपूर्ण.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा