माझ्या संपर्कातल्या सगळ्या मुली, काकू, मावशी, मामी ई. आहेत त्या घर-दार अगदी कुशलतेने सांभाळतांना मी बघितले आहे, अगदी लहानपणी पासूनच. माझ्या शेजारी राहणाऱ्या, मित्र-मैत्रिणीच्या आई ई. पैकी काही नोकरी करायच्या, बाकी घरुनच छोटेखानी व्यवसाय, तर बाकी होम मेकर होत्या.
पण कोणीही का असेना स्वयंपाकघर काही सुटलं नाहीच.
हा, आता थोडीशी परिस्थिती बदलतांना दिसते आहे.
तर ह्या सगळ्या स्त्री वर्गाने अनुभवलेला किंबहुना अनुभवलेले असे अनेक उन्हाळ्यातील स्वयंपाकाचे प्रसंग इथे प्रकर्षाने द्यावेसे वाटतात.
ह्या सगळ्या स्त्री वर्गा कडे एकतर स्वयंपाक घरात सिलिंग फॅन छोटेखानी असेल पण लावता येत नसेल कारण गॅस सुरु असतो स्वयंपाक करतांना, किंवा नसेल देखील. त्यामुळे ह्या सगळ्या स्त्रिया पंख्याची हवा आणि नो-हवा ह्या दोन्ही अवस्थेत उत्तम कामगिरी करतातच, गेले अनेक पिढ्या आणि अजूनही अनेक घरात हेच दृश्य आहे. पण तक्रार अजिबातच नाही हो. साधारणतः एक तास नक्कीच लागतो संपूर्ण स्वयंपाक व्हायला एका चौकोनी कुटुंबासाठी एका वेळेचा. त्यामुळेच कदाचित ह्या सगळ्या स्त्रीवर्गाला इतकी निकड भासत नाही पंख्याची नेहेमीच, त्या अस्वस्थ नक्कीच होत नाहीत जनरली, चुकून वीज गेली तर किंवा पंखा थोडा वेळ काही कारणासाठी बंद झाला तर. कारण त्यांची पंख्याच्या हवेशी पक्की दोस्ती झाली आहे आणि ती अनेक वर्षांपासून आहे, असला अतिउत्तम, नसला तरी अडत नाही, अडून चालणार देखील नाही.
घरच्या गॅस ची धग तशी छोटीशी तरीही उन्हाळ्यात नकोशी वाटणारी, हॉटेल मधे काम करणाऱ्यांची अजिबातच तुलना होऊ शकत नाही. तो एक वेगळाच विषय आहे आणि लिहिण्यासारखं सुद्धा.
हे सगळं जेव्हा मी माझ्या लेकाला सांगत होते तेव्हा साहेब काय म्हणाले ठाऊक आहे, इंडक्शन वापरायचा ना, पंखा पण लावता येईल आणि कूकिंग सहज होईल कारण ज्योत नसतेच त्याला, काही विझायची भानगडच नाही. काय मम्मा, कित्ती सोप्प आहे हे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा