रविवार, ३० मे, २०२१

"कृत्रिम हुशारी" / Artificial-Intelligence (AI)

माझ्या लहानपणी आम्ही नागपूरला राहात होतो आणि आमच्या घरी मागे पुढे भलं मोठं आंगण होत. त्या अंगणात एका मागून एक दोन मिठू आले होते. छोटं पिल्लू होत ते, ताबडतोब बाबानी एक पिंजरा आणला पहिल्या पोपटासाठी आणि त्याचं संगोपन सुरु झालं. काही दिवसांनी / महिन्यांनी दुसरा (मोठ्या आकाराचा) पोपट (करंट जातीचा) पण आला घरात. तर आमचा छोटा मिठू जो होता तो व्हरांड्यात टांगलेला असायचा. व्हरांडा स्वयंपाकघर आणि माझी झोपायची खोली ह्या मध्ये होता. सकाळी सकाळी आई मला आवाज द्यायची उठण्यासाठी, रोज, चुकता. तर ते ऐकून काही दिवसातच मिठू सुरु झाला कि तस्साच आवाज द्यायला. आणि अगदी जस्सा आईचा आवाज चढायचा तस्साच ह्या पट्ठ्याचा पण. आणि जर मी उठली नाही तर त्याची चोच पिंजऱ्यावर मारायचा, सगळ्या पिजऱ्यात अस्वस्थ होऊन खाली वर चकरा मारायचा. थोडक्यात काय त्याच्या आवाजांनी, कृतीने, अथक प्रयत्नाने मी वेळेत उठली पाहिजे. आईला (आईच्या घशाला) थोडा आराम मिळायचा.

कस्स कळायचं त्याला, कसं शिकला, हे सगळं, frequency, voice modulation etc. कोणास ठाऊक. एवढासा जीव पण फारच हुशार.

आपण आज सगळे "कृत्रिम हुशारी / AI" बद्दल बोलतो, शिकवण्याचा प्रयन्त करतो, आमच्या मिठू सारख्या छोट्याशा जीवाला काही शिकवावं लागलं नाही.

माझा भाऊ उत्कृष्ट आणि वैविध्य प्रकारच्या शिट्या मारायचा. बास, मग काय, मिठू रावांनी ते हि शिकून घेतलं होत. इतक्या शिताफीने आणि भावाच्याच स्टाईल ने थकता मारत राहायचा शिट्टया. अजिब रसायन होत आमचा मिठू म्हणजे.

मला जेव्हा कोणी विचारायचं कि "तुमच्या कुटुंबात किती जण राहतात?" तर मी म्हणायचे. आम्ही चार आणि "मिठू देशपांडे" पाचवा.

इतकं सगळं घडत असतांना आमचा करंट जातीचा पोपट मात्र कणभरही कधी काहीच शिकला नाही किंबहुना त्याचा स्वभावही नव्हता काही करण्याचा. म्हणजे फक्त वातावरण निर्मिती असली म्हणजे आजूबाजूचे सगळे शिकतातच असे नाही. तो मोठा पोपट छान दिलं ते खायचा, बाबांना चावला पण आहे, आणि शांत राहायचा.

छोट्या मिठूला जर काही कारणास्तव आदल्या रात्रीची पोळी दिलीच, तर साहेब ताबडतोब पायाने वाटी उलटी करायचे, आणि रिकामी वाटी वाजवायचे, निषेध आणि राग म्हणून. देवा. लिहावं तेवढं थोडंच आमच्या "मिठू देशपांडे" बद्दल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...