तर त्याच असं झालं कि मी मुलांच्या शाळेत पालक सभेकरता गेले होते, बरोबर १७ वर्षांपूर्वी. पहिली होती मुलांची, नवीन मोठी शाळा, नवीन ऍडमिशन, अनोळखी शिक्षक, वर्गमित्र आणि बरेच काही. लकिली माझी दोघेही एकाच वर्गात होती. प्रत्येक महिन्याला एक अशी ती मिटिंग असायची आणि हि माझी पहिलीच मिटिंग आणि शिक्षकांसोबत पहिलीवहिली भेट. ऑफिस मधून अर्धा दिवस सुट्टी काढून पोचले मी शाळेत. माझ्या आधी काही आया आल्या होत्या आणि त्या टिचर भोवती गराडा करून उभ्या होत्या, बोलत होत्या. म्हणून मी थोडी थबकले दारातच वर्गाच्या. म्हटलं ह्या सगळ्यांचं होऊ दे मग आपण बोलू. पण तेवढ्यातच क्लास-टिचर च माझ्या कडे / दाराकडे लक्ष गेलं आणि अचानक त्या सुरु झाल्या, अर्थात इंग्लिश मधे "तुम्ही वेद च्या आई ना? मग जरा थांबाच, तुमच्याशी मला जरा महत्वाचं बोलायचं आहे". बापरे मला ८८ कोटी देव आठवले, म्हटलं काय झालं असेल? ह्यांनी मला ओळखलं कसं? देवा.
थोडा वेळ थांबले आणि मग थोडासा ओघ पालकांचा कमी झाला आणि ह्या सुरु झाल्या, पुन्हा इंग्लिश मधे "हे बघा तुमच्या वेद साठी एक माकडाची शेपूट विकत घ्या आणि लावा त्याला. सतत बेंच वर चढून ह्या खिडकीतून त्या खिडकीत चालत असतो, एका जागी अजिबात बसत नाही, असं खिडकीतून चालतात का मी शिकवतांना?, सगळ्या मुलांचं लक्ष विचलित करतो, कोणावर चुकून पडला म्हणजे?, किंवा तो पडला म्हणजे?, काय हे वागणं? सांगा त्याला समजावून", बापरे बाप, न श्वास घेता त्या अखंड बोलत होत्या थोड्याश्या तार सप्तकातच. मला काय करावं काही सुचलं नाही, वार्णिक बद्दल मी काहीच न विचारात तेथून सॉरी म्हणून पाय काढता घेतला. आज मला कोणी तरी "माकडाची आई" केलं होत ना, त्यामुळे मला हसू पण आवरत नव्हतं आणि त्या शिक्षिकेवर कीव पण येत होती. वेदच काय होणार ह्याची काळजी आणि त्याचवेळी वेद ला शिकवलेलं किती नावडते आहे हे हि स्पष्ट दिसत होत, देवा. त्याचं खिडकीतून चालणं डोळ्यापुढे आणून मला प्रचंड हसू पण येत होत, असो.
तर अशीही पहिल्या वर्गातली माझी पालक सभेची सुरवात, आज हि हसू फुटतंय लिहितांना. काय तो वेद, काय त्या शिक्षिका, काय ते शिकवण, मज्जाच मज्जा.
Listen to this story on YouTube video channel, pl click on:https://youtu.be/7lTENj1e5ic
Also find me on FB and Twitter.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा